‘…हेही उखडणे जमेल?’ हा अग्रलेख वाचला. वातावरण जाणूनबुजून तापवले गेले आहे, असेच दिसते. आर्थिक आघाडीवर अपयश आले की बेरोजगार तरुणांची माथी भडकवून त्यांना अशा प्रकारे तोडाफोडीचा आणि हाणामारीचा रोजगार दिला जातो पण त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. कायदा, सुव्यवस्था तेवढी बिघडते. शांतता, सलोखा भंग पावतो. अशा परिस्थितीत खासगी आणि परकीय गुंतवणूक येऊन औद्योगिक विकास होणार कसा? परिणामी ‘सब का साथ, सब का विकास, सब का प्रयास’ हे निव्वळ कागदावरचे घोषवाक्यच राहते.
स्वराज्याचा घास घेण्याच्या ईर्षेने दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी निर्णायक लढा दिला. शेवटी हतबल होऊन औरंगजेबाने दक्षिणेतच अखेरचा श्वास घेतला. त्या अर्थाने औरंगजेबाची कबर हे मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. मात्र ती कबर उखडून टाकण्याची भाषा करणाऱ्यांची इतिहासाची समज किती, असा प्रश्न पडतो. इतिहासातले वाद वर्तमानात उकरून काढून एकमेकांची डोकी फोडणे हे सुजाण समाजाचे लक्षण नाही. त्यातून आपणच आपले भविष्य अंधकारमय करून घेत आहोत, ही जाणीव असू द्यावी.
● डॉ. वि. हे. इनामदार, पुणे
अफजल खानाच्या कबरीचा धडा
‘…हेही उखडणे जमेल?’ हा अग्रलेख वाचला. औरंगजेब क्रूर शासक होता यात दुमत नाही. त्याचे महिमामंडन करणाऱ्यांना शिक्षा द्यायला भारतात न्यायालय आहे. शिवाजी महाराजांना संपविण्यासाठी आलेल्या अफजल खानाची कबर महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली तेव्हा शत्रू मेल्यानंतर वैर संपते, ही शिकवण त्यांनी दिली. भाजपने केलेल्या धार्मिक ध्रुवीकरणामुळे आज पुरोगामीसुद्धा प्रतिगामींविरोधात उघड बोलण्यास घाबरतात. हिंदू महासभा व बजरंग दल या संघटनांचे उद्दिष्ट काय आहे? रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्याोगधंदे, कृषी, सेवा, पायाभूत सोयीसुविधांसंदर्भात अनेक समस्या महाराष्ट्रात व देशात असताना ३०० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या माणसाची कबर उखडून काय साध्य होईल? हिंदूंचे दैनंदिन प्रश्न सुटतील? त्यांना रोजगार मिळेल? प्रत्यक्षात तर या मुद्द्यावरून उसळलेल्या दंगलींत निष्पाप लोक मारले जात आहेत. उखडायचेच असेल तर माणसातील अज्ञान उखडून भारतीय म्हणून एकत्र येऊन देशाचा विकास साधणे गरजेचे आहे.
● अरुण मते, विद्यार्थी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
ब्रिटिशकालीन इमारतीही पाडायच्या?
‘…हेही उखडणे जमेल?’ हा संपादकीय लेख वाचला. कटू घटनांचे स्मरण करून देणारे औरंगजेबाची कबर हे महाराष्ट्रातील एकमेव ऐतिहासिक स्थळ नाही. खरे तर ही कबर मराठेशाहीच्या शौर्य आणि धैर्याचेही प्रतीक आहे. औरंगजेब स्वराज्याला कधीही नमवू शकला नाही, मराठेशाहीला नेस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च संपला, तोही त्याच्या सिंहासनापासून आणि राजधानीपासून दूर, हेदेखील ही कबर अधोरेखित करते. आपल्याला गुलामीच्या दरीत ढकलणाऱ्या, आपली आर्थिक पिळवणूक करणाऱ्या आणि स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा हक्क हिरावून घेणाऱ्या इंग्रजांनी बांधलेल्या अनेक इमारती भारतात आहेत, मग त्याही पाडणार का? राजांच्या किल्ल्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि गड संवर्धनाची खोटी आश्वासने देणाऱ्या राज्यकर्त्यांचा कडेलोट करणार का? शिवस्मारकावरून लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या राजकीय नेत्यांचे काय? या सर्व प्रश्नांचीही उत्तरे प्रामाणिकपणे शोधावी लागतील. नेते त्यांच्या सोयीसाठी तोडफोडीचे राजकारण करत असतील, तर त्यात आपण सहभागी होण्याचे काय कारण?
● देवानंद माने, नवी मुंबई</p>
भारत खरोखरच धर्मनिरपेक्ष आहे का?
‘…हेही उखडणे जमेल?’ हा अग्रलेख वाचला. भारत देश खरोखरच धर्मनिरपेक्ष आहे का? धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तळागाळातील जनसामान्यांना समजला आहे का? हिंदू धर्म खरोखरच धोक्यात आला आहे का? हिंदुत्वाचा खरा अर्थ काय? ‘हिंदू राष्ट्र’ ही संकल्पना नेमकी काय आहे? असे अनेक प्रश्न पडतात. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा होऊन गेला. तरी आजही भारतीय संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होत आहे का? बहुतांश ठिकाणी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. याला जबाबदार कोण? सरकार, नागरिक की त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या स्वयंसेवी संस्था? सध्या देशातील परिस्थिती बघता (प्रामुख्याने महाराष्ट्रातील) धार्मिक मुद्द्यांवरून वाद निर्माण करणे महत्त्वाचे की गरिबी, बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर भर देणे महत्त्वाचे, असा प्रश्न पडतो.
● अमोल धुमाळ, भेंडा (अहमदनगर)
राजकीय माज उखडून टाका
‘…हेही उखडणे जमेल?’ हा अग्रलेख वाचला. औरंगजेब हा क्रूरकर्मा होता हे वादातीत आहे. क्रौर्याला धर्म नसतो. धर्माच्या आडून क्रूर कृत्ये करणारा औरंगजेब हा इस्लामचादेखील शत्रू होता, हे सच्चे मुस्लीमही मान्य करतील. अशा व्यक्तीला अनावश्यक प्रसिद्धी वा महत्त्व देऊन सामाजिक वातावरण गढूळ करणे ही फक्त राजकीय खेळी आहे. काही उखडूनच टाकायचे असेल तर तो राजकीय माज, भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता उखडून टाका. तीच महाराजांची योग्य सेवा ठरेल.
● बिपीन राजे, ठाणे
ऋण काढून सण पुरे!
‘गरजू बहिणींनाच लाभ’ (१८ मार्च) हे वृत्त वाचले. महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांसाठी आहे. या योजनेचा काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला. त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र गरजू महिलांनाच लाभ देण्यासाठी योजनेत सुधारणा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. प्रश्न असा आहे की, ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत, त्यांना आत्तापर्यंत दिलेल्या लाभासाठी कोण जबाबदार? करातून मिळालेल्या पैशांच्या उधळपट्टीचे उत्तरदायी कोण? अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित देशाच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा निर्धार केला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रानेही कंबर कसली आहे. पण २०४७ पर्यंत देशात आणि राज्यात महायुतीचेच सरकार असेल याची त्यांना खात्री आहे का? नसेल, तर अशा दूरच्या भविष्याविषयी दावे का केले जातात? राज्यावरील कर्ज आज गगनाला भिडलेले आहे. ते नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या जाणार आहेत का? किती दिवस सरकार ऋण काढून सण साजरे करणार?
● रमेश परचाके, कल्याण
भर उन्हात परीक्षांचा घाट
अलीकडे राज्य शासनाच्या वतीने सर्व अनुदानित आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना वार्षिक परीक्षांबाबतची एक सूचना आणि वेळापत्रक पाठवण्यात आले. त्यानुसार पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा आत्तापर्यंत होत आल्या तशा एप्रिलच्या पूर्वार्धाऐवजी उत्तरार्धात घेतल्या जातील. कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा पेपर घ्यावा, याचेही वेळापत्रक देण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार पहिली व दुसरीच्या परीक्षा २३ एप्रिलला सुरू होऊन २५ एप्रिलला संपणार आहेत, तर तिसरी ते नववीपर्यंतच्या परीक्षा विषयसंख्येनुसार ८ एप्रिल ते २५ एप्रिलदरम्यान होतील. या परीक्षांचे निकाल १ मे रोजी द्यावेत, असेही सरकारी आदेशात म्हटले आहे. असे आदेश देण्यापूर्वी काही बाबींचा विचार झाल्याचे दिसत नाही.
विद्यार्थ्यांना वाढलेल्या उन्हाचा त्रास सहन करत परीक्षा द्याव्या लागतील. परीक्षेचा निकाल १ मे रोजी दिला जावा, अशीही सूचना सरकारी परिपत्रकात आहे. २५ एप्रिलला संपलेल्या परीक्षेचा निकाल पाच दिवसांत देण्यासाठी शिक्षक आणि एकंदर शालेय यंत्रणा यांच्यावर प्रचंड ताण येईल, हे उघडच आहे. याचा उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शालेय शिक्षण हा जगण्याचा व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे, पण सुट्टीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका निभावते. शाळा आणि मुले दोघांनाही एप्रिलअखेरपर्यंत फक्त अभ्यासात जुंपून कोणाचा फायदा होईल? विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्याशी संवाद साधण्याऐवजी लहरीपणाने आदेश दिले जातात. जुळवून घेण्याव्यतिरिक्त त्यांच्या हाती काही उरत नाही.
● अवधूत डोंगरे, रत्नागिरी