डॉ. सतीश श्रीवास्तव
‘होमो सेपियन’ आणि ‘होमो डियस’ या जगप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आणि इतिहासकार युवाल नोआह हरारी यांचे ‘नेक्सस: ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क फ्रॉम द स्टोन एज टू एआय’ हे पुस्तक सध्या गाजते आहे. या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) मानव जातीसमोर उभ्या केलेल्या धोक्याची चर्चा जगभर सुरू झाली आहे. हा धोका कशा स्वरूपाचा आणि किती व्यापक आहे याची तपशीलवार चिकित्सा ‘नेक्सस’ मध्ये हरारी यांनी केली आहे. इतिहासातील आणि आधुनिक काळातील असंख्य उदाहरणे, संदर्भ आणि पुरावे देत मानवी अस्तित्वाचा भविष्यातील धोका ओळखणारे ‘नेक्सस’ हे पुस्तक आहे. ‘एआय’मुळे मानवी अस्तित्वाच्या खुणा पुसल्या जाऊ शकतात, हा केवळ कल्पनाविलास नव्हे. मानवी जीवनाला कशा प्रकारे धोका पोहोचू शकतो यासंबंधीची ही विज्ञानावर आधारित मीमांसा आहे. २०२३ मध्ये अमेरिका, ब्रिटन, चीनसह ३० देशांच्या सरकारांनी ब्लेकली घोषणापत्रात ‘एआय’ मुळे जाणता अजाणता महाभयंकर धोका उद्भवू शकतो हे मान्य केले आहे. हरारी यांच्या मते सोव्हिएत रशिया आणि त्याची अंकित राष्ट्रे व अमेरिका आणि इतर युरोपियन राष्ट्रे यांच्यामध्ये शीतयुद्धाच्या काळात ज्याप्रमाणे पोलादी पडदा (आयर्न कर्टन) होता त्याचप्रमाणे जगातील राष्ट्रांमध्ये नजीकच्या भविष्यकाळात सिलिकॉन पडदा (सिलिकॉन कर्टन) निर्माण होऊ शकतो. ‘एआय’च्या संशोधनातून अशी स्वयंचलित डिजिटल शस्त्रे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे जगाचा विध्वंस होऊ शकतो.
मानवी इतिहासात प्रथमच माणसाकडे असणारी सत्ता ‘एआय’ कडे हस्तांतरित झालेली आहे. कारण ‘एआय’आधारित स्वयंप्रज्ञा स्वत:च निर्णय घेऊ शकते. कॉम्प्युटर अल्गोरिदम जर माणसांसाठी निर्णय घेत असेल तर ती निश्चितच धोकादायक गोष्ट आहे असे हरारी म्हणतात. त्यातच, अनेक देशांमध्ये लोकानुरंजन करणाऱ्या नेत्यांचा उदय झालेला आहे. अशा नेत्यांच्या बाबतीत वस्तुनिष्ठ तथ्य किंवा सत्य असे काही नसते, तर ते जे सांगतील तेच सत्य असते. त्यांच्या दृष्टीने सत्ता हेच सत्य (पॉवर इज रिअॅलिटी) असते. लोकशाहीतील मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याऐवजी लोकानुरंजनातून सर्वशक्तिमान होण्याच्या प्रयत्नात वाढ झालेली आहे असे हरारी नमूद करतात. सत्ता मिळविण्यासाठी जेव्हा माहितीचा उपयोग केला जातो तेव्हा सत्य किंवा तथ्य भ्रमित करणारे असते. ‘सत्य’ म्हणवला जाणारा मजकूर हे ‘नेमके कुणाच्या बाजूचे सत्य’ आहे असा प्रश्न यातून निर्माण होतो हे स्पष्ट करून हरारी असा निष्कर्ष काढतात की दोन विचारधारांमधील संघर्ष हा प्रामुख्याने दोन माहितीजालांचा संघर्ष असतो. ‘होमो सेपियन’ याचा अर्थ ‘शहाणा माणूस’ असा होतो. परंतु या अभिधानास माणूस खरोखरच पात्र आहे काय असा सवाल हरारी विचारतात. गेल्या एक लाख वर्षाच्या इतिहासात माणसाने अनेक शोध लावले आणि इतर कुठल्याही प्रजातीपेक्षा श्रेष्ठ अशी ज्ञानात्मक सत्ता प्राप्त केली. स्पर्धा, युद्धे आंतरराष्ट्रीय तणाव, पर्यावरणाची हानी, सत्तालालसेतून निर्माण होणारी एकाधिकारशाही, मानवी अस्तित्वापुढे प्रश्न निर्माण करणारे तंत्रज्ञान असे अनेक प्रश्न जर निर्माण होत असतील तर माणूस शहाणा आणि ज्ञानी कसा म्हणता येईल. ‘नाझीवाद’ आणि ‘स्टॅलिनवाद’ अशी अलीकडची मानवी मूर्खपणाची उदाहरणे हरारी नमूद करतात. ग्रीक व रोमन साम्राज्यापासून अलीकडच्या काळातील निरंकुश सत्तेची अनेक उदाहरणे व दाखले देत हरारी हे स्पष्ट करतात की सत्ताकांक्षा असणारे लोक तंत्रज्ञानाला गुलाम बनून सर्वंकष सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. स्वाभाविकच यात मानवी मूल्यांची (स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची) आहुती पडते. वस्तूचा ब्रँड ज्याप्रमाणे तयार केला जातो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचाही ब्रँड माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञांकडून तयार केला जातो. समाजमाध्यमातील त्या व्यक्तीचे किंवा ब्रँडचे अनुयायी त्या ब्रँडच्या इमेजशी स्वत:ला जोडतात. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग दोन प्रकारे केला जातो हे हरारी स्पष्ट करतात. एक म्हणजे माहितीचा उपयोग करून सत्य जाणून घेणे. उदाहरणार्थ आरोग्य, औषधे, हवामान, अणु, रेणू इत्यादींची माहिती मिळविण्यासाठी आणि दुसरे म्हणजे लोकांवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी खोटी कथानके (फेक नॅरेटिव्ह) गोष्टी निर्माण करण्यासाठी!
हेही वाचा : लोक-लौकिक : लोचा आहे का मेंदूत?
‘नेक्सस’ च्या पाचव्या प्रकरणात लोकशाही आणि एकतंत्री राजवट याचे मूलगामी विवेचन करताना, दोन्ही राज्यपद्धतीमध्ये माहितीची वाहतूक कशी परस्परविरोधी असते याचा मागोवा हरारी घेतात. सत्ताधाऱ्यांकडची माहितीच निरंकुश आणि सर्वश्रेष्ठ अशी धारणा हुकूमशाहीत असल्याने, दुरुस्त करण्याची यंत्रणा हुकूमशाहीत नसते. याउलट लोकशाहीमध्ये माहितीचे वितरण करणारी आणि ती दुरुस्त करणारी यंत्रणा आपसूकच कार्यरत असते; कारण सरकारांशिवाय माहितीचे इतर अनेक स्राोत उपलब्ध असतात उदाहरणार्थ संसद किंवा सिनेटसारखी प्रतिनिधी गृहे, राजकीय पक्ष, न्यायालय, वृत्तपत्रे, सेवाभावी संस्था, दबावगट इत्यादी. त्यामुळे लोकशाहीत लोक स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. ही स्वायत्तता हे लोकशाहीचे मूल्य आहे. त्यात हस्तक्षेप केल्यास लोकशाहीचा आत्माच हरवतो आणि असे झाल्यास अनियंत्रित सत्ता अस्तित्वात येण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे ‘माहितीचे नियंत्रण करणारी आणि आपसूक दुरुस्तीची यंत्रणा नसणारी राज्य पद्धती म्हणजे हुकूमशाही’ अशी हुकूमशाहीची हरारी व्याख्या करतात. निवडणुका हा लोकशाहीचा एकमेव निकष नव्हे. जगातील अनेक हुकूमशहा लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत येतात, याची आठवण देऊन तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांचे एक वाक्य हरारी उद्धृत करतात- ‘‘लोकशाही ही एखाद्या ट्रामसारखी आहे. तुमचं इच्छित स्थळ आल्यावर त्यातून तुम्हाला उतरायचं असतं.’’
अश्मयुगात मानवांच्या टोळ्यांमध्ये माहितीचे चलनवलन सहज शक्य होते. शंभर ते हजारपर्यंत या टोळीमध्ये लोक असत. पंधराव्या शतकात छपाई तंत्रज्ञान आले आणि सोळाव्या शतकात वृत्तपत्रे प्रसिद्ध होऊ लागली. युरोप व अमेरिकेत लोकांची मते, इच्छा, अपेक्षा, विरोध निर्माण करण्याचे माध्यम निर्माण झाले. अर्थात तुलनेने वृत्तपत्र वाचणाऱ्यांचे प्रमाण त्या काळात कमी होते. मध्ययुगीन कालखंडात राजांच्या हाती निरंकुश सत्ता असली तरी लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. राजाचे प्रशासन ही कालापव्यय करणारी बाब होती. तसेच लोकांच्या प्रतिक्रिया राजापर्यंत पोहोचण्यासही बराच कालावधी लागत असे. प्रशासन करणे हे कठीण काम होते, यामुळे कर आणि सैन्य यावर त्या काळात अधिक लक्ष केंद्रित केले जात असे.
माहिती तंत्रज्ञानाची प्रेरक शक्ती संगणक आहे. मात्र संगणकीय प्रगतीच्या ‘एआय’ टप्प्यावर, स्वत: निर्णय घेतो आणि नवीन संकल्पनांची निर्मिती करणे या दोन महत्त्वाच्या मानवी शक्ती माणसाकडून ‘एआय’कडे गेल्या आहेत. गैरसमज पसरविणारे अल्गोरिदम यातून निर्माण झाले. यासाठी ते म्यानमार मधील फेसबुकवरील खोट्या बातम्यांचा दाखला देतात. सर्वाधिक चर्चा असणारी आणि बघितली जाणारी बातमी अल्गोरिदममुळे वारंवार बघण्यासाठी सुचविली जाते. यूट्यूब आणि गूगलचा वापर करताना हे नेहमी अनुभवास येते. म्हणजे काय बघायचे हे लोक नव्हे तर अल्गोरिदम ठरवते. समाजमाध्यमाचा वापरकर्त्यांनी अधिकाधिक काळ वापर केल्यास त्यांच्याबाबत अधिक माहिती गोळा करता येणे शक्य होते. या दृष्टीने लोकांना अधिकाधिक गुंतवून ठेवणारे अल्गोरिदम तयार केले जातात..
हेही वाचा : अन्वयार्थ : निर्दोषत्व सिद्ध व्हावे!
सर्व वित्तीय व्यवहारांचे अलीकडच्या काळात संगणकीकरण झालेले आहे. सर्व वित्तीय साधने डिजिटल झालेली आहेत. करांचे रिटर्न्स भरणे, तपासणे, कर भरणा हे सर्व संगणकाद्वारे होत आहे. त्रुटी असल्यास संगणकच निर्णय घेतो, म्हणजेच माणसांकडून माणसांकडे माहितीचे प्रसारण न होता ते संगणक ते संगणक असे होत आहे. माणसांच्या साखळीत २४ तास काम करणारा संगणक आता जोडला गेल्याने, माणसाच्या प्रत्येक व्यवहारावर आणि हालचालीवर लक्ष ठेवून माहिती गोळा करणेही संगणकाला शक्य झालेले आहे. माणसांवर नियंत्रण ठेवण्याचे अमर्याद अधिकार माणसाच्या नकळत संगणकाकडे जात आहेत.
महत्त्वाच्या सर्व विषयांवर मुक्त सार्वजनिक संवाद आणि त्यातून सहमती ही लोकतांत्रिक व्यवस्था आहे. परंतु सार्वजनिक हिताच्या चर्चेत आता मानवी नसलेल्या संसाधनाचा प्रवेश झालेला आहे. समाजमाध्यमांत ‘चॅट जीपीटी’चा कोलाहल वाढला आहे. २०१६ च्या अमेरिकेतील निवडणुकीत वीस दशलक्ष ट्विटस चॅट बॉटने निर्माण केलेले होते. अध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी अशी चर्चा होत असताना बहुसंख्य मते जर संगणकाद्वारे तयार होत असतील तर याचा परिणाम किती घातक होऊ शकतो याची कल्पना केलेली बरी. माणसा-माणसांच्या संवादाशिवाय आता ‘एआय’ संचलित यंत्राचाही सार्वजनिक क्षेत्रात आवाज असेल. ट्विटरवरील ‘बॉट’निर्मित रेडिमेड भाष्ये हे त्याचे उदाहरण आहे. यातून डिजिटल अराजक (डिजिटल अॅनार्की) निर्माण होऊ शकते. व्यक्तीची मते ‘एआय’बदलू शकतो. भरकटवणारी माहिती, खोट्या बातम्या यातून लोकशाही पद्धती धोकादायक वळणावर उभी आहे असे हरारींना वाटते. तर्क, विवेक, न्याय दूर सारून जर विद्वेष, खोटी माहिती पसरत असेल तर लोकशाहीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. यातून हरारी असा निष्कर्ष काढतात की जर लोकशाहीचा पराभव झाल्यास त्यास तंत्रज्ञान नव्हे, तर तंत्रज्ञान वापरणारा माणूस जबाबदार असेल.
‘एआय’च्या अमर्याद शक्यतांमुळेच ‘एआय’-संशोधनात जागतिक स्पर्धा सुरू आहे. जगावर अधिराज्य गाजवण्याच्या या स्पर्धेत अनेक राष्ट्रे सामील झालेली आहेत. अल्गोरिदम म्हणजे संगणकाकडून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी वापरण्यात येणारे क्रमबद्ध सूचनाक्रम. यासाठी विदा प्रचंड प्रमाणात लागते. ज्याच्याजवळ सर्वाधिक विदासाठा ते राष्ट्र जगावर प्रभुत्व गाजविणारे राहील, हे बहुतेक सर्व राष्ट्रांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे विदा वसाहतवादाला (डेटा कलोनिअॅलिझम) सुरुवात होऊ शकते. ‘एआय’वर आधारित अॅप्स तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात विदा आवश्यक असते. यामुळे विदा ‘चोरणाऱ्या’ समाजमाध्यमांवर अनेक देशांत बंदी घालण्यात आली आहे.
माणसांशी संबंधित प्रचंड विदा कॉम्प्युटर गोळा करेल. माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीचा कलही स्पष्ट करेल. परंतु तरीही कॉम्प्युटरला जग अचूकपणे कळेलच असे नाही. कारण माहिती म्हणजे सत्य नव्हे. (इन्फॉर्मेशन इज नॉट ट्रुथ) जी माहिती जमा होईल त्यातून एका नव्या जगाची निर्मिती होईल. आणि हे आभासी जगच माणसांवर लादण्याचा प्रयत्न होत राहील, ही हरारी यांची खरी चिंता आहे.
हेही वाचा : लोकमानस : ही नेहरूंचे धोरण पुढे नेण्याची वेळ
डिजिटलवर आधारित नोकरशाही (डिजिटल ब्यूरोक्रसी) ही आत्तापर्यंतची सर्वात शक्तिशाली आणि निर्दय नोकरशाही असेल, असे हरारी मानतात. माहिती तंत्रज्ञानातील प्रगती ही शहाणपणाकडे कमी आणि मूर्खपणाकडे अधिक जात असल्याची असंख्य उदाहरणे हरारी देतात. दोष माणसांचा नसून माहिती तंत्रज्ञानाचा आहे. दुष्काळ, साथीचे रोग, भूकंप यासारख्या आपत्तीच्या वेळी सत्तेचे केंद्रीकरण एक वेळ समजू शकते. परंतु माहितीच्या सत्तेचे केंद्रीकरण झाल्यास माणसाने स्वत: निर्माण केलेले हे मायाजाल माणसालाच भस्म करू शकते, याचा धोका जगाने आत्ताच ओळखला पाहिजे, असे हरारी कळकळीने सांगतात.
लोकप्रियता आणि चमत्कृतीजन्य कल्पनाविलास यांच्या पलीकडे जाऊन ‘एआय’चे नियंत्रण करण्याचे संघटित प्रयत्न जगातील सर्व देशांनी करणे आवश्यक आहे, हाच हे पुस्तक लिहिण्याचा प्रधान हेतू आहे असे प्रतिपादन हरारी करतात.
इतिहासात केवळ भूतकाळातील घटनांचा अभ्यास नसतो, तर या घटकांच्या बदलांचाही अभ्यास असतो. अश्मयुग ते आजचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असा हरारी यांच्या अभ्यासाचा व संशोधनाचा विस्तृत पैस आहे. विकासाच्या बदलांचे परिणाम मानवी समाजावर कसे झाले आणि त्यातून प्रगतीचे क्षेत्र मानवाने कसे पादाक्रांत केले याचा तपशीलवार आढावा संशोधनात्मक पद्धतीने हरारी यांनी घेतलेला आहे. ज्या कबुतराच्या संदेशामुळे पहिल्या महायुद्धात सैनिकांचे प्राण वाचले होते त्या शेर अॅमी या कबुतराचे प्रतीकात्मक चित्र पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. हरारी यांची भाषा अतिशय प्रभावी, ओघवती व पकड घेणारी आहे, हादेखील या पुस्तकाचा विशेष आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘न भूतो न भविष्यति’ असा धोका जेव्हा हरारी अधोरेखित करतात तेव्हा जगातील सबंध मानवी जातीच्या शहाणपणाची कसोटी पाहणारा हा काळ आहे असे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते.
‘नेक्सस: ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्फर्मेशन नेटवर्क फ्रॉम द स्टोन एज टू ए आय’
लेखक : युवाल नोआ हरारी,
प्रकाशक : पेंग्विन रँडम हाऊस
पृष्ठे : ४९२; किंमत : १०९९ रु.
satish.shree@gmail.com