मुंबई (बातमीदार) – ‘आम्ही जसे पक्ष फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा’ या मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून प्रतिसाद मिळू लागला असून गेल्या २४ तासांत ठिकठिकाणच्या शंभरावर शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थी फोडण्यात यश मिळाले आहे. काही उत्साही शिक्षकांनी पळवलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन थेट गुवाहाटी व सुरत गाठले असून हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती खास या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या शिक्षण खात्याच्या नियंत्रण कक्षातून आज देण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था कमी विद्यार्थीसंख्येमुळे बिकट झाली आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पाटलांनी शनिवारी जळगावमध्ये बोलताना सुचवला होता. त्याला राज्यभरातील शिक्षकांकडून लगेच प्रतिसाद मिळाला.
जळगावमधील काही शिक्षकांनी एकत्र येत नामवंत इंग्रजी व खासगी अनुदानित शाळांमधील ५० विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरून उचलले व एका बसमध्ये भरून जवळच्या सुरतमध्ये नेले. पाटलांना हे कळताच त्यांनी पक्षफोडीच्या वेळी तेथे निर्माण झालेल्या ओळखीचा आधार घेत या सर्वांची राहण्याची व्यवस्था केली. शाळा व्यवस्थापन तिथे पोहोचू नये म्हणून शिवसैनिकांची एक तुकडीही तिथे पाठवण्यात आली. ही माहिती मिळताच संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागांतील शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थी फोडायला सुरुवात केली. हे कळताच इंग्रजी व खासगी शाळांनी त्यांच्या इमारतीभोवती ‘बाउन्सर’ तैनात केले. त्यांना गुंगारा देत विद्यार्थी पळवण्याचे हे प्रकार दिवसभर सुरूच होते. सिल्लोडला शिक्षक व बाउन्सर यांच्यात यावरून चकमक उडाली. यात तीन शिक्षक किरकोळ जखमी झाले. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हस्तक्षेप केल्यावर तेथील तणाव निवळला. या घटनाक्रमाची दखल घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी खात्यात एका नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून शिक्षकांना कुठलीही अडचण आल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. ‘चाळीस बुके (पुस्तके व वह्या) एकदम ओके’ असे या मोहिमेचे नामकारण केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
ठाण्याच्या ग्रामीण भागातील काही शिक्षकांनी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फोडून थेट गुवाहाटी गाठले. त्यांना तिथे नेण्यासाठी हवाई व्यवस्था कुणी केली हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था पक्ष करेल, असे जाहीर केले. सरकारी मराठी शाळा वाचल्याच पाहिजेत असे म्हणत या पळवापळवीला मनसेने समर्थन जाहीर केले असून शिक्षकांना काही त्रास झाल्यास त्यांनी तातडीने स्थानिक मनसैनिकांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. दरम्यान यावरून राज्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे धास्तावलेल्या इंग्रजी व खासगी शाळांच्या संचालकांनी एकत्र येत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत या पळवलेल्या विद्यार्थ्यांना ‘गद्दार’ घोषित करा असा सल्ला दिला. ज्या विद्यार्थ्यांना पळवण्यात आले त्यांचे पालक चिंतेत आहेत असे वृत्त समोर येताच ठिकठिकाणच्या शिवसैनिकांनी त्यांचे बोलणे करून देण्यासाठी पुढाकार घेतला. माझा मुलगा आनंदात आहे, असे एका पालकाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. यासंदर्भात पाटील यांच्याशी संपर्क साधला असता विनोदाने केलेल्या वक्तव्याचा इतका सकारात्मक परिणाम दिसून येईल असे वाटले नव्हते. या माध्यमातून सरकारी शाळांची स्थिती चांगली होईल व फोडाफोडीच्या कृत्यांनाही प्रतिष्ठा मिळेल असा दावा त्यांनी केला. शेवटी राज्याचे हित महत्त्वाचे असेही ते म्हणाले.