परमार्थाच्या पहिल्या पायरीपासूनच आपल्यातील विसंगतींचा अनुभव येऊ लागतो. कधी आपल्यातील अवगुण तीव्रपणे जाणवतात तर कधी त्या अवगुणांच्या प्रभावाने भौतिकाच्या विचारांचं काहूरही माजतं. एक सधन बाई श्रीमहाराजांकडे येत. त्यांच्या वाडय़ात अनेक भाडेकरू होते आणि त्या भाडय़ातूनही त्यांना उत्पन्न होत असे. श्रीमहाराजांना त्या म्हणाल्या, ‘‘महाराज एखाद्या व्यावहारिक गोष्टीचा विचार करायला बसले तर त्याला धरून असे व्यावहारिक विचार आपसूक येतात. पण नामाला बसले की नामाचेच विचार येत नाहीत. उलट व्यवहारातले विचारच थैमान घालतात.’’ श्रीमहाराजांची खुबी अशी की आलेल्या माणसाला पटकन उमगेल असे त्याच्याच व्यवहारातले उदाहरण देऊन ते नामाची महतीच सांगायचे. प्रथम नामाचा अभ्यास चिकाटीने करीत असल्याबद्दल महाराजांनी बाईंचे कौतुक केले. नंतर ते म्हणाले, ‘‘आपण नामाला बसलो म्हणजे आपल्या शरीरातील षड्रिपूंच्या सहा बिऱ्हाडांना नोटीस मिळते. त्या भाडेकरूंना असे वाटते की हे शरीर जर नामाला लागले तर आज ना उद्या आपल्याला बिऱ्हाडाची जागा रिकामी करावी लागेल. ज्याच्या हाती भाडय़ाची रीतसर पावती असते त्याच्याकडून जागा परत मिळविणे व्यवहारातही किती कठीण असते हे तुम्ही जाणताच. जागेसाठी न्यायालयात गेले तरी निकाल बहुतेकवेळा भाडेकरूच्याच बाजूने होतो. व्यवहारात जर हा अनुभव येतो तर या सहा भाडेकरूंच्या हाती जन्मोजन्मीच्या आपल्या भाडय़ाच्या पावत्या असताना ते गुण्यागोविंदाने जागा रिकामी करतील, हे कसे शक्य आहे? त्यांना नोटीस पोचली की, आपल्याला जागा रिकामी करावी लागू नये म्हणून ती सहाहीच्या सहाही बिऱ्हाडे तुम्हाला नामापासून परावृत्त करण्यासाठी बंड करून उठतील. जेव्हा तुम्ही प्रपंचाचे काम करता तेव्हा त्यांना काहीच भीती नसते. म्हणून ती शांत असतात. सहाही जणांनी बंड पुकारले म्हणजे मनात विचारांचे काहूर माजणारच. त्याला उपाय असा की विचारांचे काहूर माजले म्हणजे या सहाही बिऱ्हाडांना नोटीस पोचून ती घाबरली आहेत, अशी खूणगाठ बांधावी. या जाणिवेनं मनास हुरूप येईल. तसेच नेटाने नाम घेत जावे, नाम घेता घेता पुढे विचारांचे काहूर आपोआप कमी होईल..’’ तेव्हा नामानं आपल्यातलेच अवगुण आपल्याला उमगतात. कधी ते लपून राहतात आणि मनात उलटसुलट विचारांचं काहूर माजवून देतात. तरीही नाम आणि स्मरण नेटानं चालवावं. श्रीमहाराजांनी एके ठिकाणी म्हंटलं आहे की, ‘‘पापवासना कोणाच्या मनात येत नाहीत? पण त्या वासनेला बळी पडतो तो माणूस हीन बनतो. सर्वसाधारण माणूस विवेक वापरून कुकर्म घडू देत नाही. ज्याच्या मनात भगवंताबद्दल वासना येतात तो चांगला माणूस होय. भगवंताच्या नामस्मरणानं हळूहळू वाईट वासना क्षीण होतात व भगवंत हवा असे वाटू लागते. ते वाढत गेले म्हणजे सत्त्वाची वाढ होते व अखेर वासना नष्ट पावते.’’ (हृद्य आठवणी, क्र. २२२) नामाचा खरा सहवास जेव्हा घडू लागतो तसतसं आपल्यातील वाईटाचंही दर्शन होऊ लागतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा