समग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून, त्या वस्तूच्या एकाच बाजूचं चित्र रंगवतो म्हणून चित्रं आभासी, फसवी ठरतात. या आरोपाला क्युबिझमने खोडून काढले. क्युबिझमने एकाच चित्रात वस्तूची विविध बाजूंनी दिसणारी रूपं एकत्रितपणे रंगवली.
स्वत:चं डोकं आपल्या मानेवर सावरून इकडेतिकडे पाहता येतंय, नजर स्थिर झालीय, बोललेल्या शब्दाला (त्याचं नाव) प्रतिसाद देऊ शकतं, देतं. अशा लहान बाळाबरोबर आपण, मोठी माणसं अनेक वेळेला ‘लपाछपी’चा खेळ खेळतो. आपण आपला चेहरा स्वत:च्या हाताने बाळासमोर झाकून घेतो, बाळाला हाक मारतो, म्हणतो कुठं गेलं बाळ, दिसतं का नाही? हे सगळं बाळाला कळतंच असं नाही, पण बाळाचं नाव घेतल्यानं त्याचं लक्ष वेधलं जातं, ते आपल्याकडे बघतंय असं लक्षात येताच, त्याच्या डोळ्यांसमोर आपला हातामागे लपलेला चेहरा बाहेर काढतो, हसतो, म्हणतो, अरे, हे काय (बाळाचं नाव) दिसलं रे दिसलं रे दिसलं.
मग बाळ हसतं, हा दृश्य-अदृश्याचा खेळ पुन:पुन्हा खेळलं की बाळ खिदळू लागतं. बाळ हा खेळ बराच वेळ खेळू शकतं, पण काही वेळाने आपणच थकून जातो.sam01आपण जसजसं मोठं होत जातो तसतसं, लहान बाळाप्रमाणे आपण, एकदा-दोनदा पाहिलेली, माहीत असलेली गोष्ट पुन:पुन्हा फार काळ पाहू शकत नाही. एकच वस्तू, अनुभव पुन:पुन्हा पाहण्यात आपल्याला रस वाटत नाही, मजा येत नाही.
परिणामी कधी तरी या माहीत असलेल्या वस्तूच्या अनुभवाच्या एखाद्या बारकाव्याबद्दल आपल्याला शंका येते, तो बारकावा कसा आहे, असा प्रश्न पडतो आणि असंही वाटू लागतं की, हा बारकावा आपण कधी पाहिलाच नाही. मनात अस्वस्थता निर्माण होते व माहीत असलेली गोष्ट पुन्हा पाहून तिचं समग्र ज्ञान, अनुभव आपण घ्यायचा प्रयत्न करू लागतो.
पाहिलं नाही, नीट-समग्रपणे पाहिलं नाही म्हणून समजलं नाही, ज्ञान मिळालं नाही, यामुळे गेली हजारो र्वष आपण अस्वस्थ होत आलो आहे. त्यावर उपाय, पाहण्याच्या पद्धती शोधतोय. या अस्वस्थेकडे, त्याच्या इतिहासाकडे, त्याच्या उत्क्रांतीशी संबंधित कारणांकडे जरा पाहू.
आपण मानव उत्क्रांत झालेले प्राणी आहोत. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपल्याला शेतीचा शोध लागण्याआधी, अन्नासाठी आपण प्राण्यांच्या शिकारीवर अवलंबून होतो. आपल्या सभोवतालचं पर्यावरण व त्यात जिवंत राहण्यासाठी आपण केलेली धडपड यामुळे आपल्या शरीररचनेत अनेक बदल होत गेले.
उत्क्रांतिशास्त्र असं सांगतं की, जे प्राणी शिकारी असतात त्यांचे डोळे त्यांच्या कवटीमध्ये समोरच्या बाजूला असतात. कारण दोन्ही डोळ्यांचा एकाच दिशेने, एकाच वेळी वापर करून शिकाऱ्याला सावजाचा नेम घ्यायचा असतो, घेता येतो. आपण मानव हे शिकारी प्राणी होतो, आहोत. परिणामी आपले डोळे आपल्या कवटीच्या समोरच्या बाजूला आहेत.
याउलट ज्या प्राण्यांची शिकार होते. उदा. हरीण, त्यांचे डोळे त्यांच्या कवटीच्या दोन बाजूंना, कडांना असतात ज्यामुळे त्यांना जवळजवळ १८० अंशाच्या कोनातला परिसर न्याहाळता येतो, दबा धरून बसलेल्या शिकाऱ्याचं भान येतं.
डोळ्यांच्या रचनेमुळे आपण कुठचीही गोष्ट पाहताना अगदी सहजपणे पाहण्याचा कोन, बाजू या गोष्टी आपल्या अनुभवाचा भाग बनतात, त्यावर प्रभाव पाडतात. आपण एका वेळी, एकाच बाजूने, ठरावीक कोनातूनच वस्तूंना पाहू शकतो. ही आपल्या दृष्टीची एक मर्यादा आहे. आपण कमिलियन या रंग बदलणाऱ्या सरडय़ाप्रमाणे एकाच वेळी, वेगवेगळ्या दिशांना आपले डोळे फिरवू शकत नाही किंवा मधमाशी, घरमाशीप्रमाणेसुद्धा आपल्याला दिसत नाही. कदाचित डोळ्यांची रचना यामुळेच समग्र पाहणं ही खोलवरची इच्छा आपल्यात निर्माण झाली असेल.
समग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून, त्या वस्तूच्या एकाच बाजूचं चित्र रंगवतो म्हणून चित्रं आभासी, फसवी ठरतात. त्यांच्यातून ज्ञान, परिपूर्ण ज्ञान प्राप्त होत नाही. वस्तूचं सर्व बाजूंचं चित्रण एकाच वेळी चित्रात होत नसल्याने चित्रातून वस्तूचं ज्ञान होत नाही, असा त्याचा सूर होता. प्लेटोच्या या आरोपाला क्युबिझमने खोडून काढले. क्युबिझमने एकाच चित्रात वस्तूची विविध बाजूंनी दिसणारी रूपं एकत्रितपणे रंगवली. प्लेटोला जो समग्र दृष्टिकोन अपेक्षित होता तो क्युबिझममध्ये काही प्रमाणात प्राप्त व्हायला लागला.
आपण या वेळेला क्युबिझमचा अभ्यास करण्याकरिता म्हणून केलेलं तसंच क्युबिझमने प्रेरित होऊन केलेली कलाकृती पाहू या. ती ब्रिटिश चित्रकार डेव्हिड हॉकनी याने केलेलं फोटो मोन्टाज आहे. डेव्हिड हॉकनी याने sam03आयुष्यभर आपल्याला जग कसं दिसतं व आपण ते कसं रंगवतो याचा अभ्यास केला. त्यामुळे पस्र्पेक्टिव्ह व क्युबिझम यांचा अभ्यास करणं हे आलंच! हा अभ्यास करताना आपल्या पाहण्याचा वस्तुनिष्ठपणे विचार करण्याकरिता त्याने कॅमेराचा वापर केला व एकाच दृश्याचे असंख्य फोटो काढून फोटो मोन्टाज, कोलाज बनवली. त्यात दोन प्रकारची मोन्टाज होती. एका प्रकारात तो एका दृश्यासमोर उभं राहून हळूहळू मान, नजर फिरवत, दृश्याचे फोटो काढून ते जोडून दृश्य तयार केलं. यात त्याला हे दाखवायचं होतं की, आपल्याला एखादं दृश्य दिसतं ते आपण प्रत्यक्षात किती तुकडय़ा-तुकडय़ांनी नजर व मान फिरवून पाहत असतो.
दुसऱ्या प्रकारची फोटो मोन्टाज ही क्युबिझमचा अभ्यास, प्रेरणा आहे. सोबतचं चित्र पाहा. त्यात अगदी स्पष्टपणे आपल्याला खुर्ची दिसते. खुर्चीची ओळख पटली? फोटो मोन्टाज नीट पाहा. खुर्ची जरा विचित्र दिसत नाहीये? पुढचे पाय खूप जवळ आणि मागचे पाय जरा दूर खूप फाकलेले!
जसं कोलाज अनेक तुकडय़ांनी एक चित्र बनतं तसंच हे फोटो मोन्टाज पोस्टकार्ड साइजच्या अनेक फोटो प्रिंटने बनलं आहे. प्रत्येक फोटो काढताना डेव्हिड हॉकनी खुर्चीच्या सर्व बाजूंनी फिरला आहे. प्रत्येक स्वतंत्र छायाचित्रात खुर्चीचे ठरावीक भाग वेगळ्या बाजूने, वेगळ्या कोनातून पाहिले आहेत. तरीसुद्धा या सर्व प्रिंट्स एकत्र आल्यावर खुर्चीसारखी प्रतिमा तयार होतेय हीच गंमत आहे. अशा प्रकारे मोन्टाज बनवल्यामुळे आपलं या खुर्चीकडे पाहणं कधी संपतच नाही. पुन:पुन्हा ती पाहत राहतो. हीच क्युबिझमने निर्माण केलेली गंमत आहे. त्यांनी एखादी गोष्ट पाहायला लागणारा काळ हा अमर्यादित करून टाकला. पस्र्पेक्टिव्ह असलेल्या चित्रात आपण जवळ ते दूर हे अंतर एकदा पाहिले की, आपल्याला बघण्यासाठी जास्त काही उरत नाही. क्युबिझममध्ये मात्र आपण वेगवेगळ्या कोनांतून वस्तू पाहतच राहतो.
‘काळ’ ही गोष्ट पाहण्याशी संबंधित झाली की, पाहणं समग्र होऊ लागतं. म्हणूनच आपण म्हणतो की, ‘किती वेळ पाहिलंस’ वगैरे.. यामुळेच क्युबिझमने चित्र, शिल्प, साहित्य, सिनेमा आदींचं स्वरूप बदललं. साहित्य, सिनेमा आदीत जे एका क्रमात कथा सांगण्याची पद्धत होती ती नाहीशी होऊन कथेतील अनेक पात्रांचं जीवन समांतर कथन करणारी, भूत ते वर्तमान किंवा फक्त वर्तमानकाळातील कथन बदलून गेलं. कथा, त्यातले प्रसंग हे विविध पात्रांच्या, काळाच्या परिमाणातून पाहिले जाऊ लागले. सिनेमात फ्लॅशबॅक आला.. इमारतींचाही विचार करताना समोरची आणि मागची बाजू असा साधा विचार नाहीसा झाला. इमारतीच्या आतील व बाहेरील अवकाशातील संबंध, खेळ वाढला.
पण ही समग्रता फक्त पाश्चात्त्य देशातील कलाकृतींमध्ये आहे असं नाही. वारली चित्रकलेतही या समग्रतेचं दर्शन घडतं. म्हणूनच वारली चित्रांत जमिनीवरून घरांच्या आत-बाहेर एकाच वेळी दिसतं आणि जणू काही पर्वतावरून किंवा आकाशातून आपल्या पाडय़ाकडे, वाडय़ाकडे व त्यातील माणसं, त्यांची घरं, पाळीव- जंगली प्राणी, निसर्ग या सगळ्यांकडे एका व्यापक दृष्टीने एकाच वेळी पाहिलं जातं. वारलींची ही समग्र दृश्यं जी त्यांच्या जीवनानुभवाचा भाग आहे ती फारच थोडय़ांना त्यांच्या चित्रांत दिसते. नाही तर तिची नक्षी झाली नसती.

*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.

kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
women crafting paper stars during her stay in a mental hospital
हस्तकलेनी दिली जगण्याची उभारी! मानसिक रुग्णालयात वेदनेचे कलेत झाले रुपांतर; पाहा व्हायरल VIDEO
फसक्लास मनोरंजन
painting show woman in the Byzantine period
दर्शिका: बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं…?
young Chennai photographer was cheated for 13 lakh after being lured for shoot in Pune and Goa
‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील छायाचित्रकाराची फसवणूक, महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला
Grandmother funny dance video goes viral on social media trending video
VIDEO: “आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही स्वतःच्या थाटात जगायचं”; आजीचा मनमुराद डान्स, हटके स्टाईल पाहून तम्हीही पोट धरुन हसाल
m f hussain painting controversy
एम. एफ. हुसेन यांच्या हिंदू देवतांच्या कलाकृती वादाच्या भोवऱ्यात; नेमके प्रकरण काय?

Story img Loader