‘असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास..’ ही तुकोबाची उक्ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न मूळच्या ऑस्ट्रियाच्या पण न्यू यॉर्कमध्ये स्थायिक झालेल्या एम. एम. ऑथरेफर या वाचनवेडय़ाने करायचा ठरवला. त्यातून मार्च १९९९मध्ये ‘कम्प्लिट रिव्ह्य़ू’ (http://www.complete-review.com) या संकेतस्थळाचा जन्म झाला. इंग्रजीत होणारे अनुवाद, अभिजात पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या, गद्यलेखन, नाटक आणि कविता या विषयांवरील पुस्तकांची परीक्षणे, फारशा बातम्यांमध्ये न आलेल्या इंग्रजी ग्रंथव्यवहारातील घडामोडी असे या संकेतस्थळाचे स्वरूप आहे. वर्तमानपत्रे, विविध नियतकालिके यांतील बातम्या आणि लेख यांच्या आधारे चालवले जाणारे हे संकेतस्थल अल्पावधीत लोकप्रिय झाले. मग ऑथरेफर यांनी ११ ऑगस्ट २००२ रोजी ‘लिटररी सलून’ (http://www.complete-review.com/saloon) हा ब्लॉग सुरू केला. इंग्रजी ग्रंथव्यवहारातील बित्तबातमी देणारा हा ब्लॉग पाहता पाहता ग्रंथप्रेमींच्या अनिवार्य व्यसन झाला. महाजालावर उपलब्ध होणाऱ्या बातम्या, लेख, आकडेवारी यांची थोडक्यात माहिती देऊन त्यांची सविस्तर लिंक दिली जात असल्याने ग्रंथप्रेमींची मोठी सोय झाली. या ब्लॉगमुळे जागतिक ग्रंथविश्वाची खबरबात समजायला मदत होते. त्यामुळे त्याला भेट देणाऱ्या दैनंदिन वाचकांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. इंग्रजीत खरे तर टाइम्स लिटररी सप्लिमेंट, पॅरिस बुक रिव्ह्य़ू, पब्लिशर्स वीकली अशी अनेक नियतकालिके ग्रंथजगताची हालहवाल सांगतात. त्यांची कैक वर्षांची समृद्ध परंपरा आहे. पण तरीही त्यांच्यामागून आलेल्या या संकेतस्थळाने आणि ब्लॉगने त्यापेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली आहे. संकेतस्थळावर वर्षभरात जवळपास २५० पुस्तकांची परीक्षणे प्रकाशित होतात, पण ब्लॉगवर मात्र रोज कितीतरी बातम्या प्रकाशित होतात. केवळ ग्रंथविश्वाला वाहिलेले एखादे वर्तमानपत्र असावे, तसाच हा काहीसा प्रकार आहे. त्यामुळे घरबसल्या जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडणाऱ्या बुकबातम्या जाणून घेता येतात. या असिधाराव्रताची नुकतीच तपपूर्ती साजरी झाली आहे.
ग्रंथविश्वाच्या बित्तंबातमीची तपपूर्तीं
‘असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास..’ ही तुकोबाची उक्ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न मूळच्या ऑस्ट्रियाच्या पण न्यू यॉर्कमध्ये स्थायिक झालेल्या एम. एम. ऑथरेफर या वाचनवेडय़ाने करायचा ठरवला.
First published on: 16-08-2014 at 03:46 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complete review com 12 years of book review