अमेरिकेचं अर्थकारण कोणत्या टप्प्यावर उभं आहे याचं भान राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा यांना येत गेलं, त्याची ही कथा.. स्तिमित करणारे तपशील आणि ते मांडायची कादंबरीय शैली यामुळे हे पुस्तक कमालीचं वाचनीय झालं आहे.
महासत्तेचं नेतृत्व करणं म्हणजे नक्की काय? या महासत्ता प्रमुखाच्या एका आततायी कृतीनं जगबुडी होऊ शकते किंवा बुडणारं जग वाचू शकतं. अशा वेळी या अध्यक्षाला काय काय माहीत असावं लागतं? म्हणजे लष्करी बाबतीत ते एका अर्थानं सोपं. हा आवडीचा, तो नावडीचा, अमुक शत्रू किंवा तमुक कुंपणावरचा. ही वर्गवारी बऱ्याच अंशी सुलभ. हे विषय सर्वार्थाने मोठे. पण ते समजून घेणं तितकं कठीण नाही. त्यात बऱ्याचदा आपापल्या भूमिका बनलेल्या असतात. प्रश्न असतो तो ज्याविषयी अनिश्चितता आहे, भूमिकेचे दोन रस्ते आहेत आणि कोणत्या रस्त्यानं गेलं की काय होईल याचा अंदाज नाही.. अशा प्रश्नांच्या हाताळणीत. असे प्रश्न अर्थातच आर्थिक असतात. त्यातली समस्या ही की उपलब्ध पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडला आणि काही बरंवाईट झालं तर दुसरा पर्याय निवडायला हवा होता.. असं सांगणारे वाट पाहात असतात. त्यात जर काळ अस्थिरतेचा असेल तर पंचाईत अधिकच.
ही अवस्था अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांची झाली होती. तीसुद्धा निवडून यायच्या आधीच. म्हणजे बराक ओबामा पहिल्या निवडणुकीला सामोरे जायच्या आधी रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश यांची राजवट होती. त्यांनी इराक, अफगाणिस्तान वगैरेंशी युद्ध करून देशाला कर्जबाजारी करून ठेवलं होतं. त्याच वेळी अमेरिकेच्या रिझव्र्ह बँकेचे- म्हणजे फेडचे- त्या वेळचे प्रमुख अॅलन ग्रीनस्पॅन यांनी आर्थिक विकास वेगाने व्हावा, लोकांनी मजा करत राहावी, भरपूर खरेदी करावी म्हणून कर्जावरील व्याजांचे दर कमीकमी करायचं धोरण पत्करलं. युद्धामुळे खर्चात वाढ झालेली आणि बुश यांच्याकडून करकपात होत असताना ग्रीनस्पॅन यांनी व्याजकपात करून पैसा अधिकच खेळता राहील याची व्यवस्था केली. तेव्हा अमेरिकी अर्थव्यवस्थेचा- त्यातही घरबांधणी व्यवसायाचा- फुगा चांगलाच फुगला. तो फुटण्याची वेळ आणि अध्यक्षीय निवडणुकांचा काळ हा योग चांगलाच जुळून आला.
तर या निवडणुकीच्या रिंगणात डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी बराक ओबामा प्रयत्नात. या उमेदवारीसाठी समोर आव्हान तगडय़ा हिलरी क्लिंटन यांचं. त्यांच्या तुलनेत ओबामा अगदीच अननुभवी. क्लिंटनबाईंच्या व्यक्तिमत्त्वामागे व्हाइट हाऊसमधील वास्तव्य काळाची भर पडलेली. परत सोबतीला बिल क्िंलटन यांच्यासारखा यशस्वी अध्यक्ष. आणि यातलं काहीही ओबामा यांच्या पाठीशी नाही. अशा परिस्थितीत मुळात ओबामा यांच्यापुढे आव्हान होतं ते हिलरी क्लिंटन यांना हरवून डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्याचं. ती मिळाल्यानंतर पुढे मग रिपब्लिकन पक्षाचा जो कोणी असेल त्याच्याशी झुंज. ही कसोटी दमसास पाहणारी आणि समोर डोकावू लागलेल्या आर्थिक संकटाच्या खुणा.
‘कॉन्फिडन्स मेन : वॉल स्ट्रीट, वॉशिंग्टन अँड द एज्युकेशन ऑफ प्रेसिडेंट’ या रसाळ पुस्तकाची सुरुवात या टप्प्यावर होते. ते लिहिलंय रॉन सस्किंड यानं. हा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’साठी काम करणारा पत्रकार. अमेरिकी अध्यक्षांच्या प्रशासकीय कारभाराचं वार्ताकन हा त्याचा विषय. तगडा लेखक. अगदी पुलित्झर पारितोषिक विजेता. धाकटय़ा जॉर्ज बुश यांच्या कारकिर्दीवर त्यानं विपुल लिहिलं. त्यातूनच बुश ते ओबामा व्हाया आर्थिक संकट या प्रवासाकडे तो आकर्षित झाला असावा. हा प्रवास त्यानं अगदी जवळून पाहिला. दैनंदिन बातमीदारीसाठी आवश्यक तेवढं वापरलं गेल्यावर उरलेला ऐवज हा पुस्तकाचा आहे हे त्याला दिसत होतं. त्यामुळे तो पुन:पुन्हा या विषयाकडे येत राहिला. व्हाइट हाऊसमधले ज्येष्ठ कर्मचारी, क्लिंटन, ओबामा यांच्या संघातले मार्गदर्शक अशा दोनशेहूनही अधिक जणांशी बोलून, त्याची व्यवस्थित मांडणी करून त्यानं या पुस्तकाची रांगोळी काढली. तपशिलाने भरगच्च असलेली. म्हणजे हाती मजकूर नाही आणि केवळ शब्दांच्या रेघोटय़ा मारत रांगोळी भरणं आपल्याकडे होतं तसं नाही. स्तिमित करणारं डिटेलिंग आणि ते मांडायची कादंबरीय शैली यामुळे पुस्तक कमालीचं वाचनीय झालं आहे. ज्याला या राजकारणात काडीचाही रस नाही त्यालाही त्यातील उत्कंठा पानांमागून पानं खेचत नेते इतकं रसरशीत. मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यात (पहिले ते अर्थकारण, १९ ऑक्टोबर) एका बुकअपमध्ये नील आयर्विन या लेखकाच्या ‘द अल्केमिस्ट : इनसाइड द सीक्रेट वर्ल्ड ऑफ सेंट्रल बँकर्स’ या पुस्तकाचा परिचय दिला होता. तो वाचून आंतरराष्ट्रीय बँकिंगमध्ये आदरानं ज्यांचं नाव घेतलं जातं अशा एका स्नेहींनी कळवलं, ते वाचलंयस तर ‘कॉन्फिडन्स मेन’ही वाचायला हवं. हे असं सांगणाऱ्याची उंची माहीत असल्यामुळे निमूटपणे हे पुस्तक शोधायला लागलो. पण आपल्याकडे ते आलेलं नाही. त्यामुळे अॅमेझॉनवरनं त्याची किंडल आवृत्ती घेतली आणि त्या पुस्तकात अडकत गेलो.
तर त्याची सुरुवातच होते निवडणुकांच्या धामधुमीत. निवडणुकीची हवा तापलेली आहे. ओबामा आणि क्लिंटन आपापल्या परीनं शर्थ करतायत. चित्र असं की हिलरी यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास नक्कीच. त्यांची कामगिरी ओबामा यांच्यापेक्षा किती तरी उजवी. निवडणुकीसाठी आवश्यक तो निधी जमवण्याचा भाग म्हणून दोघेही निधी संकलन मोहिमांत व्यग्र. असाच एक भोजन समारंभ बँकर मंडळींनी आयोजित केलेला, ओबामा यांच्यासाठी. या बैठकीत एक जण सहज बोलता बोलता ओबामा यांना सांगून जातो, आपण एका आर्थिक संकटाच्या तोंडावर उभे आहोत. ओबामा त्याच्याकडे बघतात. चेहरा नोंदवून ठेवण्यासाठी. या बैठकीत बाकी सगळ्यांचा प्रयत्न परिस्थिती किती छान छान आहे, हेच दाखवण्याचा. बैठक संपते. सगळेच आपापल्या कामाला लागतात. ओबामांची प्रचार मोहीम सुरू होते. बँकर्स त्यांच्या त्यांच्या गुहांत शिरतात.
पुढे काही महिन्यांनी पहिल्यांदा आगामी आर्थिक संकटाच्या पाऊलखुणा दिसायला लागतात. त्या क्षणापासून ओबामा यांच्या प्रचारांत बँका, आर्थिक संकट वगैरे मुद्दे यायला लागतात. त्याच वेळी हिलरी क्लिंटन यांच्या सभांत या सगळ्याचा काही गंधही नसतो. किंवा असला तरी त्या ते दाखवत नाहीत. नंतर आणखी काही आठवडय़ांनी हे संकट अधिकच गंभीर व्हायला लागतं कारण बँकांची गृहर्कज बुडायला लागतात. ग्राहक आणि कर्जदार बँका यांच्यात संघर्ष उडू लागतो. कारण घरांच्या किमती कोसळतात. ज्या घरासाठी १० लाख डॉलर्स ज्यांनी मोजले होते त्या घरांची किंमत एकदम सहा-सात लाख डॉलर्सवर येते. मग हे ग्राहक बँकांना सांगू लागतात कर्जाची पुनर्रचना करा.. आम्ही पहिल्या कर्जाची परतफेड करणार नाही.. तुम्ही आम्हाला फसवलंय.. बँकांचं प्रचंड नुकसान होऊ लागतं आणि अशा वातावरणात एक बँक अधिकारी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त पंचतारांकित हॉटेलात कुटुंबासमवेत भोजन समारंभात रंगलेला असतो. रात्रीची वेळ. त्याचा फोन वाजतो. बँकर मंडळींना रात्रीबेरात्री सहसा फोन येत नाहीत. त्यामुळे जरा त्रासूनच हा फोन घेतो. दुसऱ्या बाजूला असतात बराक ओबामा.. तू मागे एका बैठकीत आर्थिक अरिष्टाचा अंदाज वर्तवला होतास.. त्याच्याविषयी मला बोलायचंय.. आहे का वेळ तुला? साक्षात ओबामांचा फोन. सांगायला जातो की वाढदिवस आहे वगैरे. पण त्याला कळतं विषय महत्त्वाचा आहे. तो बाहेर जातो आणि मोकळेपणानं ओबामांशी बोलतो. ऐकून घेतात ते. शेवटी म्हणतात.. तू माझ्या अर्थसल्लागार पथकात का येत नाहीस? हा सर्दच..
इथून पुढे कथानक मग चढतच जातं. ओबामा हे हिलरी क्लिंटन यांना मागे टाकून उमेदवारी मिळवतात. अध्यक्षीय निवडणूकही जिंकतात. मग अर्थसल्लागार लॅरी समर्स, अर्थमंत्री टिमथी गेटनर अशा एकापेक्षा एक महत्त्वाच्या पात्रांचा नाटय़प्रवेश होतो आणि कथा रंगतच जाते. रॉनमधला लेखक जाणवतो कुठे? तर या सगळ्या किचकट विषयातले नाजूक आणि क्लिष्ट गुंते तो सहजपणे आपल्यासमोर मांडत जातो तेव्हा. आणि मुख्य म्हणजे अख्ख्या विषयाचं चांगल्या अर्थानं त्यानं कादंबरीकरण केलंय. ते करताना काही प्रमाणात लेखकाचं म्हणून असलेलं स्वातंत्र्य त्यानं घेतलं आहे, हे उघड आहे. पण जिवंत आणि अत्यंत प्रभावशाली अशा व्यक्तींविषयी असं लिहायला धैर्य तर लागतंच पण त्याहीपेक्षा अधिक गृहपाठ पक्का असावा लागतो. तो अर्थातच रॉन याचा पक्का आहे. इतका की ही अध्यक्षाची शिकवणी जाता जाता आपल्यालाही बरंच काही शिकवून जाते. अध्यक्षांविषयी आणि लेखनाविषयीदेखील.
कॉन्फिडन्स मेन : वॉल स्ट्रीट, वॉशिंग्टन अँड द एज्युकेशन ऑफ प्रेसिडेंट : रॉन सस्किंड,
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स (किंडल आवृत्ती),
पाने : ८९६, किंडल आवृत्ती किंमत : ७.१८ डॉलर्स.
रॉन सस्किंड, अमेरिकन लेखक आणि पुलित्झर पारितोषिक विजेते पत्रकार . ‘अ होप इन द अनसीन’, ‘प्राइस ऑफ लॉयल्टी’, ‘द वन पर्सेंट डॉक्ट्रिन’, ‘द वे ऑफ द वर्ल्ड’ ही पुस्तके प्रकाशित.
राष्ट्राध्यक्षाची शिकवणी
अमेरिकेचं अर्थकारण कोणत्या टप्प्यावर उभं आहे याचं भान राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा यांना येत गेलं, त्याची ही कथा..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-12-2013 at 02:22 IST
मराठीतील सर्व बुक-अप! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confidence man