सेलिब्रेटींनी कसे व कुठे बोलावे याचे संकेत असतात. स्वत:च्या आकंठ प्रेमात बुडालेल्या शाहरुख खानने ते पाळले नाहीत आणि मनस्ताप भोगण्याची वेळ त्याच्यावर आली. ‘बीइंग खान’ या शीर्षकाखाली त्याने इंग्रजी साप्ताहिकात लेख लिहिला. तो नंतर आंतरराष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झाला. हा लेख अत्यंत चलाखीने लिहिलेला आहे. आजच्या पिढीची भाषा त्यामध्ये वापरलेली आहे. मुस्लीम असणे म्हणजे काय याची उथळ चर्चा त्यामध्ये आहे. अर्थात शाहरुखचे एकूण वागणे-बोलणे उथळ असल्यामुळे तीच उथळता या लेखात उमटली तर नवल नव्हे. तो धर्माच्या पलीकडील, प्रेमाच्या प्रदेशात जाऊ इच्छितो आणि त्याच वेळी मुस्लीम म्हणून असलेल्या ओळखीलाही कवटाळू पाहतो. शाहरुखच्या देहबोलीत नेहमी डोकावणारी द्विधा मन:स्थिती या लेखातही दिसते. मुस्लीम म्हणून त्याला मिळत असलेल्या वागणुकीचा यामध्ये उल्लेख आहे. त्यातही अमेरिकेत मिळालेली वागणूक शाहरुख तपशिलात सांगतो आणि भारतातील अनुभवांबद्दल संदिग्ध भाषा वापरतो. मुस्लीम म्हणून क्वचित मिळत असलेल्या वागणुकीवरून तो दुखावला आहे व ती दुखरी नस त्या लेखात स्पष्टपणे दिसते. ही दुखरी नस असल्यामुळेच आणि ती नस दाखविणारा स्वत: खान असल्यामुळेच हा लेख आंतरराष्ट्रीय दैनिकालाही प्रसिद्ध करावासा वाटला. ‘बीइंग खान’ या शीर्षकातूनच हा हेतू स्पष्ट होतो. शाहरुखच्या हे लक्षात आले नसेल असे अजिबात म्हणता येणार नाही. ते जाणण्याइतकी धूर्तता त्याच्याकडे नक्की आहे. शाहरुखच्या लेखातील ही दुखरी नस पकडून भारतावर शेरेबाजी करण्याचा भोचकपणा पाकिस्तानने केला. शाहरुखला सुरक्षा पुरवा, असे पाकिस्तानने सांगितले. त्याला भारताने तिखट उत्तर दिले असले तरी पाकिस्तानच्या या आगाऊपणामुळे शाहरुखची पंचाईत झाली. त्याला घाईघाईत खुलासा करावा लागला. कारण पाकिस्तानप्रेमी नायक बॉलीवूडच्या बारीवर यश मिळवू शकत नाही व शाहरुखला धंदा बरोबर समजतो. त्याने केलेल्या खुलाशात भारतातील निधर्मी व्यवस्थेची भरभरून स्तुती केली आहे. ‘बीइंग खान’ या लेखातही शाहरुखने भारताबद्दल अनुदार उद्गार काढलेले नाहीत. भारतीयांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. पण त्याच्या लेखातील आपल्याला सोयीस्कर ठरणारी वाक्ये पाकिस्तानने उचलली आणि शाहरुखची पंचाईत करून टाकली. लेखाच्या सुरुवातीलाच शाहरुख पडद्यावरील व रोजच्या आयुष्यातील अनेक प्रतिमांबद्दल बोलला आहे. आपण लिहीत असलेल्या शब्दांवरून वाचणाऱ्यांच्या मनात कोणत्या प्रतिमा निर्माण होतील याची कल्पना शाहरुखला असणारच. शब्दांची ही ताकद लक्षात घेऊन त्याने लिहायला हवे होते. लेखाबद्दल खुलासा करताना त्याने जी भाषा वापरली त्याच भाषेत मूळ लेख लिहिला असता तर त्याचा आधार घेऊन भारतावर वार करण्याची संधी पाकिस्तानला मिळाली नसती. मात्र तशा भाषेतील लेख आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजविताही आला नसता. तो सेन्सेशनल झाला नसता व त्यातून योग्य तो मेसेजही गेला नसता. आणि पाकिस्तानने नाक खुपसले नसते तर शाहरुखने खुलासाही केला नसता. भारताने त्याला सर्वकाही दिले आहे. अभिनयाच्या मानाने त्याचे बरेच जास्त कौतुकही झाले. पैसाही भरपूर मिळाला. मध्यमवर्गातून पुढे येऊन बॉलीवूडच्या शिखरावर विराजमान होण्याचे भाग्य त्याला भारतातच मिळाले. हे सर्व तो एका बाजूला मान्य करतो, मात्र त्याच वेळी मुस्लीम म्हणून येणाऱ्या तुरळक अनुभवांमुळे अस्वस्थ होतो आणि ही अस्वस्थता जगाच्या व्यासपीठावर पोहोचवितो. रोज रोज नव्हे तर क्वचितच येणाऱ्या अशा अनुभवांचे सार्वत्रिकीकरण करणे योग्य नव्हते. शाहरुखने ते केले व जगभरातील चाहत्यांचा विरस केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा