तळकोकणात राष्ट्रवादी आणि राणे समर्थक यांच्यात काही महिन्यांपासून चालू असलेले बंड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पेटून उठले आहे. आघाडीचे उमेदवार नीलेश राणे यांचा प्रचार करणार नाही, अशी ताठर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्वच कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे या सर्व घटना घडत आहेत. ही ताठर भूमिका १०० टक्के योग्यच आहे हे काही गोष्टींचा विचार करता स्पष्ट होईल. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सिंधुदुर्गात मूळ काँग्रेस आणि राणे समर्थक काँग्रेस असे दोन भाग झाले. यामध्ये राणे समर्थक काँग्रेसने आघाडीचा किती धर्म पाळला हे सिंधुदुर्गातील जनतेला चांगलेच माहीत आहे. ज्या वेळी दीपक केसरकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या जोरावर सावंतवाडी शहराचा कायापालट केल्यानंतर त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि आमदारही झाले. यामध्ये शरद पवारांची त्यांना पूर्ण ताकद मिळाली हे ते जाहीरपणे मान्य करतात. हळूहळू त्यांनी आपल्या नियोजनबद्ध कामाच्या जोरावर जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीची ताकदही वाढवली, त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला; परंतु हे सर्व समर्थक काँग्रेसला परवडणारे नव्हते म्हणूनच त्यांनी त्यांच्या विरोधात कारस्थाने चालू केली. केसरकरांचा सर्वतोपरी कसा पाडाव होईल हेच बघितले जाऊ लागले. जिल्ह्य़ातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये समर्थक काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशाच लढती होऊ लागल्या. नंतर राष्ट्रवादीचे निवडून आलेले सदस्य फोडणे, त्यांच्या कामांना मंजुरी नाकारणे यांसारखी कृत्ये आरंभत त्यांची चोहोबाजूंनी कोंडी आणि अपमान चालू केला. या सर्व प्रकाराला विरोध म्हणून दीपक केसरकरांनी येणारी लोकसभा निवडणूक राणेंच्या दहशत प्रवृत्तीविरोधात मी लढवणार हे जाहीर केले होते.
या सर्व प्रकारांमुळे राष्ट्रवादी पक्षाची आणि कार्यकर्त्यांची कशा प्रकारे कोंडी होत आहे याची वारंवार कल्पना केसरकर व कार्यकर्त्यांकडून शरद पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात येत होती. त्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्य़ामध्ये येऊन यावर तोडगा काढावा आणि आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे, अशी याचना करण्यात येत होती; परंतु वरिष्ठ नेत्यांनी याला केराची टोपली दाखवली, कारण त्यांना त्यांच्या वरच्या पातळीच्या तडजोडी मोडायच्या नव्हत्या.
जिल्ह्य़ातील सामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला नाही म्हणूनच ही वेळ आली आहे. ज्या वेळी जिल्ह्य़ातील स्वत:च्याच पक्षातील कार्यकत्रे यावर तोडगा काढण्याची विनंती करत होते तेव्हा या नेत्यांना वेळ मिळत नव्हता; परंतु आता चारच दिवसांत शरद पवार, अजित पवार यांसारख्या वरिष्ठ नेत्यांना कसा काय वेळ मिळाला? याचा अर्थ तुमच्या कार्यकर्त्यांनी काय काढावा? तुम्हाला नारायण राणेंसोबत समझोता करायचा आहे आणि जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी तुमच्याच पक्षासाठी जिवाचे रान केले, रक्ताचे पाणी केले, अशा कार्यकर्त्यांची किंमत शून्य असा अर्थ.
या नेत्यांना प्रश्न असा आहे की, ज्या राणे समर्थकांनी सिंधुदुर्गात तुमचा पक्ष आहे कुठे, असे वारंवार विचारले, राष्ट्रवादी संपवणारी भाषा केली, त्यांना आत्ताच दीपक केसरकर आणि राष्ट्रवादी का आठवते? कारण त्यांना फक्त आपल्या मुलाचाच विजय पाहिजे.. तुमच्या पक्षाबद्दल त्यांना काहीही किंमत नाही. अशांसाठी तुम्ही तुमच्याच प्रामाणिक, सुसंस्कृत आणि तुमच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या आमदाराला जाहीर सभेत ‘अवदसा आठवली’ असे संबोधलात हे कितीसे योग्य आहे? अशी टीका करण्याआधी तुम्ही तुमच्या इतिहासात डोकावे.
शरद पवार यांना पंतप्रधान पदाचे डोहाळे असताना थेट सोनिया गांधींवर परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करून पक्षप्रमुखालाच डिवचले होते आणि पक्षाचेच दोन भाग केले होते. उलट केसरकरांनी पवारांचा आणि पक्षाचा आदर ठेवून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मग ‘अवदसा’ कोणाला आठवली? पवार यांना की केसरकरांना हे जनतेला दिसून आलेय. असो. थोडक्यात पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्तीची हत्या केली आहे हे मात्र नक्की.
– भरत माळकर, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा