कॉ. गोिवदराव पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोहोंच्यावरील हल्ल्यांत ‘सकाळी चालायला जाताना हल्ला होणे.. हल्लेखोरांचे मोटारसायकलवरुन येऊन गोळ्या झाडणे..’ हे साम्य आहेच. शिवाय दोघेही भारतीय संविधानातील लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समाजवाद इ. मूल्ये जोपासण्याचे आयुष्यभराचे व्रत घेतलेले कार्यकत्रे होते. साहजिकच ज्यांना ही मूल्ये समाजात रुजणे मान्य नाही, अशा शक्तींनीच त्यांच्यावर हल्ला केला असणार अशी शक्यता वर्तवली जाणे स्वाभाविक आहे. त्यांचे चारित्र्य पाहता वैयक्तिक हितसंबंध वा हेवेदाव्यांमुळे हे हल्ले झाले असणे अजिबात शक्य नाही.
दाभोलकरांचे खुनी १८ महिने झाले अजून सापडले नाहीत, तेवढय़ात कॉ. पानसरेंवर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यांनी व आरोपींना पकडण्यात येत असलेल्या उशीरामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता व संताप आहे, त्यामुळेच जागोजागी होणाऱ्या निदर्शनांत सद्य सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. आजचे केंद्रातले व राज्यातले सत्ताधारी हे रा. स्व. संघाला निष्ठा असणारे आहेत. संघ आज जाहीरपणे काहीही बोलत असला तरी संविधानातील वर उल्लेख केलेल्या मूल्यांचा व दाभोलकर-पानसरेंच्या कार्याचा कायम विरोधक राहिला आहे. संघाची छत्रछाया असलेल्या विविध कट्टरपंथी िहदुत्ववादी संघटना व त्यांचे नेते यांची अलिकडची वक्तव्ये व कारवाया यांना जोर आला आहे. वर आपलेच सरकार आहे, ही भावना त्यामागे आहे. त्यामुळे पुरोगामी कार्यकर्त्यांचे सरकार व संघपरिवार यांवरील टीकास्त्रही स्वाभाविक आहे.
तथापि, अशा टीकास्त्राचा नीटसा बोध न होणारे, मात्र अशा हल्ल्यांना मनापासून विरोध असलेले खूप लोक समाजात आहेत. निदर्शकांच्या घोषणा/भाषणे ऐकून त्यांना कळत नाही, अशा निदर्शनांत सहभागी व्हायचे की नाही. पुरोगामी जनसंघटनांतही असा नीटसा बोध न होणारे वा संघीय विचारांपकी काही बाबी पटणारे लोक असतात. दाभोलकर-पानसरेंवर हल्ला करणाऱ्या शक्तींची ताकद कमी करावयाची असेल तर नीटसा बोध न होणारे तसेच विरोधी शक्तींच्या काही बाबी पटणारे हे जे लोक आहेत, त्यांचे शिक्षण गरजेचे आहे. सौहार्दाने त्यांच्याशी संवाद वाढविणे आवश्यक आहे.
बनचुक्यांवरचा हल्ला त्यामुळे सौम्य करायचा असे अजिबात नाही. मात्र या दोन्ही गोष्टी समांतरपणे चालू ठेवणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार निदर्शनांचे दोन प्रकारही करता येऊ शकतात. एक पूर्ण कठोर असू शकतो. परंतु दुसरा प्रकार हा समाजाच्या विवेकाला आवाहन करणारा व असे हल्ले मानवतेला लांच्छनास्पद व लोकशाहीला घातक आहेत यावर भर देणारा असावा.
अशारीतीच्या हल्ल्यांनंतर मतभेद असलेले तथापि पुरोगामी छावणीतले हे लोक एकत्र निदर्शने करतात. पुढे हा निदर्शनांचा जोर ओसरतो व प्रत्येकजण आपापल्या तंबूत परत जातात. संघ परिवारातल्या संघटना-व्यक्ती ज्या रीतीने परस्परपूरक राहतात व वेळ आल्यास एकत्र होतात (उदा. मोदींना निवडून आणण्यासाठी प्रयत्न किंवा रामजन्मभूमी आंदोलन व दरम्यान बरेच काही). या परस्परपूरकतेत त्यांची ताकद आहे. तशी ताकद उभारण्यासाठी पुरोगामी मंडळींनी अशी परस्परपूरकता साधायला हवी. त्यासाठी स्वतला लवचिक व समावेशक करायला हवे. मतभेद संवादी चच्रेत ठेवून आपल्यातले सामायिकत्व शोधले पाहिजे. या सामायिकातूनच एक सहमतीची भूमिका ठरविली पाहिजे व कार्यक्रम आखला पाहिजे. ही लांब पल्ल्याची मोहीम आहे. रास्वसंघाने त्यांची मोहीम १९२५ साली सुरू केली. त्याला अलीकडे फळे येऊ लागली. पुरोगामी शक्तींना इतका नाही तरी दीर्घकाळ हा एकजुटीचा प्रयोग चालवावा लागेल. ‘संघपरिवारा’ला आव्हान देणारा सशक्त ‘संविधान परिवार’ उभारण्यात उशीर वा कसूर न करणे, हा दाभोलकर-पानसरेंवरील हल्ल्यांचा बोध आहे.
शेतकऱ्यांनीही आबांचा विश्वास सार्थकी लावला!
भारतीय स्टेट बँकेच्या नोकरीत होतो तेव्हा तासगाव येथील बदलीच्या काळात, तासगावजवळील सावर्डे नावाच्या गावात आर. आर. पाटील ऊर्फ आबांच्या एका कार्यकर्त्यांकडे गेलो असताना बोलण्याच्या ओघात, माझी आबांशी अद्याप भेट झाली नसल्याचे त्याला समजले. योगायोगाने त्याच दिवशी आबा त्या गावातील एका घरी सांत्वनासाठी येणार होता. तो कार्यकर्ता मला बळेबळेच तिथे घेऊन गेला. थोडय़ाच वेळात आबा आले. महाराष्ट्राचा एवढा गृहमंत्री, पण ना लवाजमा, ना सुरक्षाकडे. सोबत फक्त दोन-तीन पोलीस. आबांचे भेटीचे प्रयोजन संपल्यावर माझी ओळख करून देण्यात आली. माझं गाव कोणतं, घरी कोण असतं आदी जुजबी गप्पा झाल्यावर आबा म्हणाले, ‘‘साहेब! आमच्या भागातील ही सर्व शेतकरी मंडळी साधी, कष्टाळू व प्रामाणिक आहेत. गेली काही र्वष दुर्दैवानं निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकली आहेत. त्यांना पुन्हा उभं राहण्याची संधी द्या. बँकेमार्फत आर्थिक मदतीचा हात पुढे करा. तुमचा एकही पैसा बुडणार नाही याची ग्वाही मी देतो.’’आबांच्या प्रत्येक शब्दातून शेतकऱ्याची वेदना बोलत होती. आणि खरेच, शेतकऱ्यांनी बँकेच्या विविध योजनांना सकारात्मक प्रतिसाद देत, बँकेचा एकही पैसा न बुडवता कर्जाची प्रभावीपणे परतफेड करून आबांचा विश्वास सार्थकी लावला.
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सत्ता आणि अर्थकारणाचे प्रमुख केंद्र. बँकांकडून विविध कर्जे मिळवण्यासाठी इथे राजकारणी मंडळीचे दबावतंत्र सुरू असते. परंतु आबा मात्र याला अपवाद होते. कधीतरी त्यांचा फोन यायचा. ‘‘माणूस पाठवतोय. होतकरू व प्रामाणिक आहे. तुमच्या नियमांत बसत असेल तरच त्याचं काम करा’’ या विनंतीत दबाव किंवा दुराग्रह नसून एखाद्याचे भले व्हावे ही कळकळ असे.
महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद भूषविलेल्या आबांचे अंजनी गावातील राहते घरदेखील त्यांच्या साधेपणाची साक्ष देणारे, अगदी तुमच्याआमच्या घरांसारखेच साधे. एकाच चौकात इतर घरांना खेटून असलेल्या या त्यांच्या घराभोवती ना मोकळी जागा, ना कंपाउंड वॉल, ना दिमाखदार गेट. घराच्या व्हरांडय़ात पहाऱ्याला एक पोलीस, एवढाच काय तो फरक दिसे.
– संजीव बर्वे, रत्नागिरी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा