सोनिया गांधी यांच्या जीवनकहाणीतील निवडक भाग घेऊन, त्याचा वापर स्वत:च्या पुस्तकासाठी करण्याचं एका स्पॅनिश पत्रकारानं ठरवलं आणि त्याप्रमाणे, २००८ सालीच त्याचं ‘एल सारी रोयो’ हे पुस्तक प्रकाशितही झालं. या पत्रकाराचं नाव याविएर मोरो (स्पेलिंगनुसार नामोच्चार : जेविएर). हे पुस्तक काही भारतात प्रकाशित झालं नव्हतं, आणि गेली अनेक र्वष त्याचा इंग्रजी अनुवाद कोणत्याही देशातून झालेलाच नसल्याने, हे स्पॅनिश पुस्तक भारतीयांपर्यंत पोहोचण्याचा संभव नव्हता. पण ‘द रेड सारी’ हे इंग्रजी भाषांतर ‘ग्रूपो प्लानेटा’ या प्रकाशकानं २६ ऑगस्ट २०१४ रोजी ‘ई-बुक’ स्वरूपात आणलं आणि तेव्हापासून अमेझॉन.इन या (भारतात विक्री करणाऱ्या) संकेतस्थळावर ते हळूहळू खपू लागलं.

१ जानेवारी २०१५ ही या पुस्तकाच्या भारतीय छापील आवृत्तीची (प्रकाशक : रोली बुक्स) प्रकाशन-तारीख होती. म्हणजे गेला पंधरवडाभर ते पुस्तक भारतीय बाजारात उपलब्ध आहे.
तरीही, हे पुस्तक अचानक बातम्यांमध्ये आलं ते काही इंग्रजी वृत्तपत्रांनी अचानक जणू काही ‘हे पुस्तक आता लवकरच येणार’ असा शोध लागल्याच्या थाटातील बातम्या १६ आणि १७ जानेवारीच्या अंकात दिल्या, त्यामुळे! एक खरं की, तामिळनाडूतील पेरुमल मुरुगन प्रकरणाला रा. स्व. संघाची फूस असल्यामुळे भाजपची झालेली पंचाईत सोनिया गांधींबाबतच्या या पुस्तकाची बातमी- पंधरा दिवसांनी का होईना- छापली गेल्यामुळे चुटकीसरशी सुटली! आता चर्चा आहे ती, काँग्रेसने हे पुस्तक कसं दाबायचा प्रयत्न केला, ‘अघोषित बंदी’च कशी लादली, याची. पण हे आरोपसुद्धा सुमारे वर्षभरापूर्वी- १४ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रकाशित झालेल्या मुलाखतीत (मुलाखतकार : अद्वैता काला) खुद्द मोरो यांनीच केले होते. वर्षभर थांबलेली ती चर्चाही आत्ताच अचानक सुरू झाली.
हे झालं राजकारण. पुस्तकप्रेमींना या साऱ्या नाटय़ानंतर पडलेला प्रश्न अगदी साधा आहे : जे ई-पुस्तक भारतात सत्ताबदल झाल्यानंतर (ऑगस्ट २०१४) ‘रेड सारी- अन्नॉव्हेल’ – म्हणजे कादंबरी- या नावानं मिळत होतं, त्याच्याच छापील भारतीय आवृत्तीचं नाव ‘रेड सारी- अ ड्रामाटाइज्ड बायोग्राफी ऑफ सोनिया गांधी’ असं कसं काय? कादंबरी आणि ‘नाटय़मय चरित्र’ हे शब्द समानार्थी आहेत का? नाटय़मय चरित्राला कादंबरीच म्हणा, असा कोणाचा ‘आदेश’ होता?

Story img Loader