साहित्यातील नोबेल पारितोषिकाच्या आधी आणि नंतर एक ठरावीक चर्चा-गुऱ्हाळ सुरू राहते. गेल्या आठवडय़ाभरापासून हारुकी मुराकामी आणि गुगी वा थिओंगो यांचा गजर टिपेला असतानाच, नोबेल निवड समितीवरील एका सदस्याने अमेरिकन साहित्याची उणीदुणी काढत अमेरिकीद्वेषाची २१ वर्षांची परंपरा उघड केली.
फ्रेंच कादंबरीकार पॅट्रिक मोदियाने यांना यंदाचे साहित्याचे नोबेल जाहीर होण्याच्या आदल्या दिवशीच नोबेल पुरस्कारांच्या साहित्य निवडसमितीच्या होरास एंगढाल या सदस्याने एका मुलाखतीमध्ये ब्रिटिश-अमेरिकी साहित्य ‘लेखन कार्यशाळा’, ‘शिष्यवृत्त्या’ यांच्या बॅटरीवर चालत असल्याची खिल्ली उडवली. याच सदस्याने २००८ साली अमेरिकन साहित्याच्या तथाकथित मागासपणावर भाष्य करून मोठा वाद ओढवून घेतला होता. अमेरिकन साहित्य एकाकी पडले असून ते अनुवादात तसेच साहित्यात प्रभावशाली प्रक्रियेत कमी पडत असल्याचा शोध तेव्हा त्यांनी लावला होता. आता त्यात लेखन शिष्यवृत्तीवरच्या टीकेची भर पडल्याने पुन्हा एकदा स्वीडिश अकादमीच्या ‘अमेरिकीद्वेष्टे’पणाचा नमुना जगजाहीर झाला आहे.
आज जगभर गुणवत्तेइतक्याच महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सुसज्ज व्यापारी क्लृप्त्यांनी अमेरिकन साहित्याचा व्यवसाय विस्तारला आहे. त्याद्वारे सहज उपलब्ध होणाऱ्या अमेरिकीन साहित्यातील ‘सौंदर्यस्थळे’ परिशीलनाची सवय अस्तित्वात असलेल्या वाचक प्रजातीला झाली आहे. ‘न्यूयॉर्कर’, ‘न्यू यॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘हार्पर्स’, ‘अटलांटिक’, ‘जीक्यू’, ‘व्हॅनिटी फेअर’ ही जगभरातील वाचकांसाठी लोकप्रिय वैचारिक व्यासपीठे अमेरिकन आहेत. जगभरातील साहित्य, साहित्यिक व्यवहाराचा धांडोळा घेण्यासाठी ही वैचारिक व्यासपीठेच कारणीभूत ठरत आहेत. याशिवाय ‘लाँगफॉर्म’, ‘लाँगरिड्स’सारख्या संकेतस्थळांद्वारे साहित्य-पत्रकारिता-विचारव्यवहारांचे विश्वरूपदर्शन घडत आहे. या अमेरिकन व्यासपीठांशी बांधल्या गेलेल्या आजच्या अमेरिकेतर पिढीला नोबेल समितीने अमेरिकेला पुरस्कारांपासून लांब ठेवण्याबाबत केलेल्या विधानांमधील विसंगती हास्यास्पद आहे.
थोडा इतिहास
साहित्याच्या नोबेल पुरस्कारांसाठी लेखक, भाषातज्ज्ञ, विचारवंत आदी १८ जणांच्या निवडसमितीद्वारे २१० साहित्यिकांची यादी केली जाते. यातील ३६ नावे दर वर्षी नवी असतात. निवडसमितीची प्रक्रिया गुप्तपणे होते आणि गेल्या दहा वर्षांमध्ये साहित्य पुरस्कारावर सट्टा खेळला जात आहे. दर वर्षी या सट्टेबाजाराची नोबेल निवड समिती थट्टा करते. गेली पाच वर्षे सट्टेबाजारात सर्वात आघाडीवर असलेला लेखक पराभूत होतो आणि अज्ञात वा विशिष्ट मर्यादेत वाचल्या गेलेल्या साहित्यिकाला पुरस्कार दिला जातो.
थोडा वर्तमान
शिष्यवृत्ती आणि लेखकाला मिळणाऱ्या आर्थिक साहाय्यामुळे अमेरिकन साहित्य मागे पडले असून ‘सर्जनशील लेखना’च्या कार्यक्रमांमुळे ब्रिटिश-अमेरिकन साहित्य बरबाद झाल्याचा दावा नोबेल निवड समितीच्या सदस्याने केला आहे. मात्र आजच्या समांतर अमेरिकन साहित्यामध्ये आघाडीवर असलेल्या सर्व नावांच्या लोकप्रियतेमागे कुठल्या ना कुठल्या शिष्यवृत्तीचा अथवा लेखन कार्यक्रमांचा मूलाधार आहे. १९७०-८०च्या दशकात गॉर्डन लीश या ‘कॅप्टन फिक्शन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ‘एडिटिंग’ कौशल्यामुळे सेलिब्रेटीपदाची मान्यता प्राप्त झालेल्या संपादकाचे एक स्कूल आज साहित्य जगतावर राज्य करीत आहे. रेमण्ड काव्र्हरपासून अॅमी हेम्पेल, बेन मार्कस ही कथासाहित्यावर राज्य करणारी मंडळी त्याने घडविलेले लेखक आहेत. चक पाल्हानिकपासून ते कॉल्म मॅक्केन, जॉर्ज सॉण्डर्स, जेनिफर एगान या साहित्यिकांना घडविण्यामध्ये शिष्यवृत्ती आणि लेखन कार्यक्रमांचाच आधार आहे. आपल्याकडे मराठीत अशा लेखन शिष्यवृत्ती आणि कार्यक्रम नसल्यामुळे आपले साहित्य मागे असल्याचे अनेक लेखक मान्य करतात. या लेखन कार्यक्रमांमुळे प्रत्येक विद्यापीठाची असलेली स्वतंत्र समृद्ध मासिके तेथे लेखनव्यवहार वाढवत आहेत. शेकडय़ांनी निघणारी मासिके, कथास्पर्धा आणि लेखन कार्यक्रम यांच्यातून निव्वळ अमेरिकनच नाही, तर आफ्रिकी आणि आशियाई लेखकांना झळकविण्याचे कार्य होत आहे. नो व्हायोलेट बुलावायो ही झिम्बाब्वेची गेल्या वर्षी बुकरच्या अंतिम यादीत दाखल झालेली लेखिका असो किंवा ‘लॉरी राजा’ या कथेसाठी ‘पुशकार्ट’ हे मानाचे कथा पारितोषिक मिळविणारी माधुरी विजय ही भारतीय लेखिका असो. नायजेरियाचा ‘ई. सी. ओसोंडू’ किंवा ए. इगोनी बॅरेट हा लेखक असो, या साऱ्यांना अमेरिकन शिष्यवृत्तीमुळे जगभर झळकण्याची संधी मिळाली आहे.
थोडे भविष्य
अमेरिकन साहित्य माध्यमांनी लोकप्रिय केलेल्या अमेरिकेतर लेखकांवर नोबेलची साहित्य पुरस्कार निवडसमिती कसा सूड उगवते, याचे उदाहरण जपानी लेखक हारुकी मुराकामी यांना पुरस्कारापासून डावलण्यात सातत्य राखल्यामुळे स्पष्ट होते. गेल्या आठवडय़ापासून ‘गार्डियन’ अथवा महत्त्वाच्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून घेण्यात आलेल्या जगभरच्या वाचककौलामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेल्या मुराकामी आणि केनियाच्या गुगी वा थिओंगो यांच्याऐवजी वाचककौलासोबत सट्टाबाजारात पिछाडीवर असलेल्या पॅट्रिक मोदियानो यांना पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कारासाठी ग्राह्य़ धरलेले कुठल्याही लेखकाच्या साहित्यदर्जा आणि त्यांनी करून ठेवलेल्या कार्याबाबत शंका घेता येणे शक्य नाही, मात्र आज वाचक ज्याला सर्वश्रेष्ठ मानतात, त्याला स्वीडिश पुरस्कार समिती ठरवून डावलते, असे चित्र गेल्या दहा वर्षांत या पुरस्कार समितीने निर्माण केले आहे. त्यामुळेच इस्रायलच्या अमोस ओझ, झेक रिपब्लिकचे मिलान कुंदेरा या अमेरिकेने गौरविलेल्या, जगभरात सारख्याच प्रमाणात लोकप्रिय असलेल्या साहित्यिकांना नोबेल लाभू शकले नाही. दर वर्षी अनपेक्षित नावाद्वारे साहित्यप्रेमींना धक्का देण्याचे तंत्र नोबेलने विकसित केले आहे. प्रचंड प्रसारयंत्रणेमुळे चित्रपट, मालिका, जगण्याची-विचार करण्याची पद्धती यांचे अमेरिकेने जगभर वसाहतीकरण केले आहे अन् यापुढेही हे वसाहतीकरण अधिकच गडद होत जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर नोबेल समितीचा जगजाहीर अमेरिकीद्वेष पुढील काळात या पुरस्काराची विश्वासार्हता कमी करणार हे नक्की.
नोबेलची वाद‘गाथा’
साहित्यातील नोबेल पारितोषिकाच्या आधी आणि नंतर एक ठरावीक चर्चा-गुऱ्हाळ सुरू राहते. गेल्या आठवडय़ाभरापासून हारुकी मुराकामी आणि गुगी वा थिओंगो यांचा गजर टिपेला असतानाच, नोबेल निवड समितीवरील एका सदस्याने अमेरिकन साहित्याची उणीदुणी काढत अमेरिकीद्वेषाची २१ वर्षांची परंपरा उघड केली.
First published on: 11-10-2014 at 04:30 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial prize the nobel prize