पोराबाळांना हाताशी धरून, सांभाळून, सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकत निम्मा रस्ता ओलांडावा आणि करंगळी पकडलेल्या एखाद्या पोराने भोकाड पसरून मागच्या दुकानातल्या एखाद्या वस्तूसाठी हट्ट धरून बसून राहावे, दुसऱ्या पोरानं बाजूच्या दुकानाकडे बोट दाखवत पुढे ओढावे आणि दोन्ही बाजूंनी ये-जा करणाऱ्या गाडय़ांच्या कर्कश भोंग्यांचे त्रासलेले आवाज कानात घुमू लागताच बापाने कानावर घट्ट हात दाबून धरावेत.. भर रस्त्यात, चारचौघांच्या समोर पोरांनी सुरू केलेल्या दांडगाईकडे रागाने पाहणाऱ्या लोकांच्या नजरा चुकवत कसाबसा रस्ता ओलांडावा आणि पोरांची समजूत काढण्यातच पुरता वेळ वाया घालवावा, अशी एखाद्या बापाच्या नशिबी येणारी अवघड अवस्था राजकारणातही उद्भवली तर?.. ज्या मुलांवर शिस्तीचे, संस्कृतीचे आणि समंजसपणाचे संस्कार केले, त्या मुलांनीच चारचौघांसमोर घराचे वासे मोजायला सुरुवात केली, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी बिचाऱ्या बापाची जी दमछाक होईल, तशी दमछाक सध्या भाजपमध्ये सुरू आहे. ‘भाजप’ नावाचा एक बाप मुलांच्या हडेलहप्पी वागण्यामुळे त्रस्त झाला आहे. एका मुलाच्या ‘स्वयंभू’पणामुळे समोरच्यांकडून सोसाव्या लागणाऱ्या निंदेचे प्रहार चुकविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त सुरू असतानाच दुसऱ्या मुलाने नवे त्रांगडे करून अडचणीत भर घालावी आणि चुकांवर पांघरूण घालण्यासाठी धडपड करण्याची वेळ यावी, असे काहीसे या बापाचे झाले आहे. नरेंद्र मोदींमध्ये राजनाथ सिंहांना भावी पंतप्रधान दिसतो, म्हणून आपल्या गळ्यातली मानाची माळ त्यांनी मोदींच्या गळ्यात चढविली तेव्हा भावंडांचे प्रेम पाहून या बापाला आनंदाचे भरते आले होते. पण त्याच क्षणी या घरात भाऊबंदकीचे वारे सुरू झाले. मोठेपणाचा मान मिळावा, अशा अपेक्षेने रुसलेल्या अडवाणींची समजूत काढण्यासाठी पळापळ सुरू असतानाच, यशवंत सिन्हांनी मोदींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. भाऊबंदकीच्या कलहात दमलेल्या या बापाची कीव येऊन संघाने समजुतीचे चार शब्द सुनावल्यानंतर सारे काही सुरळीत सुरू झाल्यासारखे वाटत असतानाच, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पुन्हा अडवाणींना सर्वोच्च नेतेपद बहाल करणारी पोस्टर लावत, मोदींच्या नेतृत्वाला मध्य प्रदेशात स्थान नाही, असाच जणू संदेश दिला. भांडणे आणि रुसवे-फुगवे मिटवून सगळ्या मुलांनी ‘एकश: संपत’ करून रांगेत उभे राहावे यासाठी बापाची केविलवाणी धडपड सुरू झाली, तर उंचीनुसार उभे राहायचे, कर्तृत्वानुसार उभे राहायचे, की वयानुसार हा प्रश्न पुढे आला. उंचीनुसार उभे राहायचे असेल, तर गोतावळ्यातल्या कुणाची उंची किती यावर वाद होतील या भीतीने बापाला ग्रासले, तोच अडवाणींच्या ज्येष्ठत्वाचा आणि कर्तृत्वाचा झेंडा फडकवत शत्रुघ्न सिन्हा यांनी नवा पेच उभा केला. राष्ट्रीय, उपराष्ट्रीय, प्रादेशिक, निमप्रादेशिक, प्रांतीय, उपप्रांतीय आणि स्थानिक अशी ‘सामूहिक नेतृत्वा’ची वीण बांधायचे या बापाने तेवीस वर्षांपूर्वी ठरविले, तेव्हा त्यामध्ये आपणच गुरफटून जाऊ, अशी कल्पनादेखील त्याच्या मनाला शिवली नव्हती. ‘एकचालकानुवर्तित्वा’चा ‘संघीय बाज’ बदलून सामूहिक नेतृत्वाचा झेंडा घरावर फडकू लागताच, पक्षाच्या ‘एकमुखी’पणाला असा छेद जात असल्याने या बापाला धाप लागली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा अडचणीतूनच आता सत्तेकडे जाणारा रस्ता पार करायचा आहे. पण साऱ्या पोरांनी हट्टाला पेटून हवे ते मिळेपर्यंत भोकाड पसरले, तर पोरांची समजूत काढण्यात रस्ता पार करायचेच राहून जाईल, ही भीती आता ‘दमलेल्या बापा’ला छळते आहे.