माहिती तंत्रज्ञानामुळे माणूस बुद्धिमान झाला की मठ्ठ? माणसातील सर्जनशीलता वाढत आहे की कमी होत आहे? काही तरी वेगळे करून पाहण्याचे मानवाचे वैशिष्टय़ माहितीच्या महापुरात वाहून जात आहे का? मार्क पेगल यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत.
पृथ्वीवरील प्राण्यांमध्ये आपण स्वत:ला हुशार समजतो. तसे आपण आहोतही. तंत्रज्ञानातील अद्भुत उत्पादने पाहता माणसाच्या हुशारीवर कोणी प्रश्नच करणार नाही. आपल्या हुशारीतून माणसाने इतका गुंतागुंतीचा संसार उभा करून ठेवला आहे की त्यातील समस्यांवर मात करण्यासाठी त्याला अधिक हुशारीची गरज लागणार आहे. मात्र आता तो अधिक हुशार होत आहे की अधिक मठ्ठ?
माणसातील हुशारी ही चीज काय आहे ते आधी समजून घेतले पाहिजे. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे असे आपण समजतो. पण ही बुद्धी सर्व माणसांमध्ये सारख्या प्रमाणात वाटलेली नाही. खऱ्या अर्थाने बुद्धिमान माणसे मोजकीच आहेत व होती. बुद्धिमान माणसे कमी असूनही मनुष्यजातीने पृथ्वीवर साम्राज्य कसे प्रस्थापित केले? याचे एक कारण म्हणजे बुद्धिमान व्यक्ती कमी असल्या तरी त्यांचे अनुकरण करणाऱ्या हुशार व्यक्तींची मनुष्यजातीत कमी नाही. बुद्धीला अनुकरणाची जोड मिळाल्यामुळे माणूस श्रेष्ठ होऊ शकला.
उत्क्रांतीमध्ये माणूस वरचढ कसा ठरला हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. विज्ञानाने उभा केलेला माणसाचा इतिहास सामर्थ्यांबरोबर कच्चे दुवेही स्पष्ट करतो आणि आजच्या घडीला त्याच्याकडील सामर्थ्यांपेक्षा या कच्च्या दुव्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. त्यानंतर ७० ते ८० कोटी वर्षांनी पृथ्वीवर एकपेशीय बॅक्टेरियांचे जीवन निर्माण झाले. पुढील तब्बल दोन अब्ज वर्षे या एकपेशीय बॅक्टेरियांचा व्यवहार सुरू होता. त्यानंतर ५० कोटी वर्षांनी बहुपेशीय बॅक्टेरिया आले, आणखी पन्नास कोटी वर्षांनी झाडे निर्माण झाली. झाडांनंतर ५० कोटी वर्षांनी प्रथम सरपटणारे प्राणी आणि त्यानंतर काही कोटी वर्षांनी सस्तन प्राण्यांची निर्मिती झाली. यातून पुढे माणूस निर्माण झाला तो सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी.
पृथ्वीच्या जन्मापासूनच्या साडेचार अब्ज वर्षांपैकी गेली दोन लाख वर्षे, म्हणजे ०.०१ टक्का इतकाच अत्यल्प काळ माणसाला मिळालेला आहे. तरीही या दोन लाख वर्षांत आणि त्यातही गेल्या पाचशे वर्षांत इतकी विलक्षण झेप माणसाने कशी घेतली?
दुसऱ्याचे अनुकरण करण्याच्या क्षमतेमुळे असे या प्रश्नाचे उत्तर आहे. ‘सोशल लर्निग’ असे याला म्हणतात. एखादी गोष्ट फायदेशीर आहे हे लक्षात आले की माणूस त्याचे त्वरित अनुकरण करतो. त्या अनुकरणामध्ये स्वत:ची भर घालीत ती वाढवीत नेतो. अन्य प्राण्यांमध्ये ही क्षमता नाही. दुसऱ्याचे पाहून ते काही गोष्टी शिकत असले तरी त्यामध्ये भर घालणे त्यांना शक्य होत नाही. झाडाची बारीक फांदी मुंग्यांच्या वारुळात घुसवून चिम्पांझी मुंग्या पकडतात किंवा अक्रोडसारखी फळे दगडावर फोडतात. पण कित्येक कोटी वर्षे ते या गोष्टी एकाच पद्धतीने करीत आहेत. मुंग्या पकडण्याचा दुसरा मार्ग त्यांना सुचला नाही. माणसानेही फळे प्रथम दगडावरच फोडली, पण काही हजार वर्षांतच वॉल मार्टसारखी दुकाने निर्माण केली. अन्य प्राणी व माणसातील क्षमता कशा वेगळ्या आहेत हे यावरून लक्षात येईल.
माणसाचे वैशिष्टय़ हे की केवळ डोळे व वाचा या दोन साधनांनी तो सहज दुसऱ्याची कामाची पद्धती समजून घेतो व लगेच त्याचे अनुकरण करू शकतो. अनुकरण केले की नवी गोष्ट शिकण्याचा वेळ वाचतो. नवनिर्मितीसाठी धडपड करावी लागत नाही. चिम्पांझींना नवी गोष्ट लवकर सुचत नाही आणि एखाद्या चिम्पांझीला ती सुचली तरी अन्य माकडांना त्याचे अनुकरण सहजतेने साधत नाही. ‘सोशल लर्निग’चे कौशल्य त्यांच्याकडे नसल्याने ते आहेत तिथेच राहतात.
याचा अर्थ असा की पृथ्वीवर मनुष्यजात यशस्वी ठरली कारण ‘कॉपी’ करण्यात आपण उस्ताद आहोत. फायदा दिसला की आपण चटकन त्याचा कित्ता गिरवितो आणि असे कित्येक कित्ते गिरवीत बघता बघता एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करतो. आपण हुशार आहोत तो कॉपी करण्यात. नव्या गोष्टी शोधण्यात नाही. नवी गोष्ट एखाद्यालाच सुचते. ती फायद्याची आहे असा वास लागला की पाहतापाहता त्याचे कित्ते माणसांकडून गिरविले जातात. आपण मुख्यत: अनुकरण करणारे आहोत. अनुकरणामुळेच आपल्या प्रगतीचा वेग वाढला.
कॉपी करण्यातील उपयुक्तता उत्क्रांतीत सिद्ध झाली असली तरी या हुशारीची दुसरी बाजूही समजून घेण्याची वेळ आता आली आहे. अनुकरण करीत भरभर शिकत जाणारा माणूस प्रथम टोळ्या करून राहत होता. टोळ्यांचे पुढे समाजात रूपांतर झाले. मात्र या समाजांचा परस्परांशी विशेष संपर्क होत नव्हता. पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत अनेक समाजांना पृथ्वीवरील अन्य समाजांची माहितीही नव्हती. छोटय़ा टोळ्यांमध्ये एखादा बुद्धिमान असे. पण टोळी लहान असल्यामुळे त्याचे अनुकरण करणाऱ्यांची संख्या मोजकीच असे. समाजातही परस्परसंपर्क कमी असल्यामुळे गटागटांत काही नवीन गोष्टी शोधल्या गेल्या तरी त्याचे अनुकरण मुख्यत: त्या गटापुरतेच असे. दुसऱ्या समाजाशी संपर्क आला की परस्परांकडून चांगल्या गोष्टी अभावितपणे उचलल्या जात. मात्र त्याचे प्रमाण फारच कमी होते.
पृथ्वीवरील विविध समाजांचा एकमेकांशी आणि समाजातील विविध गटांचा परस्परांशी अतिशय थोडा संपर्क येत असल्यामुळे प्रत्येक समाजाला व गटाला अनेक गोष्टी स्वतंत्रपणे विकसित कराव्या लागत. कल्पक, बुद्धिमान माणसांची त्या वेळी गटागटांना गरज होती.
मात्र संपर्काचे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर परिस्थिती बदलली. आज प्रत्येक गटासाठी स्वतंत्र उपक्रमशील व्यक्तीची गरज राहिलेली नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कल्पकता आज जगभर सहज जाते. तीही अत्यंत कमी वेळात व कमी खर्चात. गुगल व फेसबुक ही साधने हे काम लीलया करतात. संगणकामुळे आज कोणतीही गोष्ट विशिष्ट समाजापुरती मर्यादित राहिलेली नाही. तिचे अनुकरण करणे जगाला शक्य झाले. आज सर्वच बाबतीत जगात सारखेपणा येत चाललेला दिसतो. कला, संगीत, आहार, निवास, कपडे, औषधे, चालीरीती हे सर्व काही सारखे-सारखे होऊ लागले आहे. सहजसुलभ झालेला संपर्क व चटकन अनुकरण करण्याची माणसाची क्षमता यामध्ये या सारखेपणाचे मूळ आहे. हा संपर्क नसल्यामुळे पूर्वी कल्पकता होती, त्यातून येणारी विविधता होती. आता यशस्वी गोष्टींचा कित्ता गिरवून यश मिळविण्याचा सोपा मार्ग सर्वजण वापरतात.
ब्रिटनमधील रीडिंग विश्वविद्यालयातील उत्क्रांतीशास्त्राचे प्राध्यापक व रॉयल सोसायटीचे फेलो मार्क पेगल यांना ही स्थिती भयावह वाटते. तंत्रज्ञानामुळे माणूस स्वत:मधील कल्पकता, वेगळेपणा संपवीत चालला आहे व तो फक्त कित्तेबहाद्दर होत आहे. रोजच्या व्यवहारातील लहान-मोठय़ा समस्यांवरही आपण स्वत:हून उत्तरे शोधणे बंद केले. विचार करणे बंद केले. कारण आज प्रत्येक प्रश्नावर आयती उत्तरे तयार आहेत. ‘आज्ञाधारकांचा कळप’ असे आज मनुष्यजातीचे स्वरूप झाले आहे. स्वत:पासून सुरुवात करून आजूबाजूला नजर टाकली तर विचारांपासून आचारापर्यंत प्रत्येक बाबतीत आपण कसे कित्तेबहाद्दर झालो आहोत याची असंख्य उदाहरणे सापडतील. यामुळे आयुष्य सोपे झाले असले तरी आपल्या क्षमता क्षीण होत चालल्या आहेत. गुगल व फेसबुकने वैचारिक क्रांती केलेली नाही तर विचार करण्याची क्षमता मंदावत नेली आहे. या तंत्रज्ञानामुळे मनुष्यजात अधिकाधिक जवळ येत चालली आहे हे खरे असले तरी जवळ येण्यामुळेच माणसांतील उपक्रमशीलता, कल्पकता आटत चालली आहे. गुगलमुळे माहिती अतोनात मिळत असली तरी त्यामुळे माणूस बुद्धिमान झालेला नाही तर अधिकाधिक विचारशून्य होत चालला आहे.
मानवजातीवर परिणाम घडवून आणील अशी कोणती कल्पना तुम्ही पुढे आणली आहे, असा प्रश्न पेगल करतात तेव्हा फक्त असामान्य व्यक्तींकडून अशी अपेक्षा करता येते, सामान्यांकडून नाही, असे उत्तर त्यावर देता येते. मग आजूबाजूच्या व्यक्तींना कॉपी करावीशी वाटेल असे तुम्ही काय केले आहे, हा पेगल यांचा दुसरा प्रश्न आहे. लहानशा समूहावर प्रभाव टाकील इतकी कल्पकता दाखविणारेही कमी झाले आहेत हे पेगल यांना यातून सुचवायचे आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या अशा किती प्रश्नांवर आपण स्वत:हून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे? घर घेताना, लग्न करताना, गाडय़ांसारखी मोठी खरेदी करताना, नोकरी शोधताना आपण स्वतंत्र विचार करतो की आजूबाजूच्या कळपाबरोबर जातो? रोज आपण अनेक उद्योग करतो, पण ते का करतो, याची चाचपणी स्वत:शीही कधी करीत नाही. स्वतंत्र बुद्धी चालविण्याचा आळस आपण करतो, कारण आजूबाजूला आयती उत्तरे तयार असतात. आता गुगलमुळे तर उत्तरांचा कोषच आपल्या हाताशी आलेला असतो. मात्र यामध्ये आपली बुद्धी मठ्ठ होत जाते हे लक्षात येत नाही.
मानवी जीवन जितके जटिल होत आहे तितकी स्वतंत्र विचार करणाऱ्या व्यक्तींची गरज वाढली आहे. दुर्दैवाने अशा व्यक्तीच आता कमी होत चालल्या आहेत. पुढील काळात तंत्रज्ञानामुळे त्या आणखी कमी होतील. इतकेच नव्हे तर स्वतंत्रपणे बुद्धी चालविण्याची मानवी मेंदूची क्षमता तंत्रज्ञानाने कमी होत जाईल. पृथ्वीवरील माणसात सर्वत्र सारखेपणा आल्यामुळे आयुष्यातील विविधता आणि त्यातून मिळणारा आनंद याला आपण पारखे होत जाऊ. खरे तर सध्याच्या मॅकडोनाल्ड संस्कृतीत आत्ताच हा आनंद आपण गमावत चाललो आहोत.
माणसात स्वतंत्र बुद्धी आहे आणि अनुकरणाची ताकदही आहे. मुळात निसर्गातच या दोन शक्ती आहेत आणि त्या दोन्ही शक्ती निसर्ग प्रभावीपणे वापरतो. आपण मात्र आळशी झाल्यामुळे फक्त अनुकरणप्रिय होत आहोत. माहिती तंत्रज्ञानाच्या या धोक्याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे. बुद्धी स्वतंत्रपणे चालविण्यात मानवी पुरुषार्थ आहे, कित्ते गिरविण्यात नाही.
आकलन : कॉपीबहाद्दर
माहिती तंत्रज्ञानामुळे माणूस बुद्धिमान झाला की मठ्ठ? माणसातील सर्जनशीलता वाढत आहे की कमी होत आहे? काही तरी वेगळे करून पाहण्याचे मानवाचे वैशिष्टय़ माहितीच्या महापुरात वाहून जात आहे का? मार्क पेगल यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत.
First published on: 18-12-2012 at 04:25 IST
मराठीतील सर्व आकलन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Copymaster