पुणे विद्यापीठासारख्या देशातील एका नामांकित विद्यापीठात विद्यार्थ्यांना अभ्यास न करता केवळ पैसे देऊन आपले गुण बदलून मिळू शकतात, ही वस्तुस्थिती शिक्षण क्षेत्रात बेचैनी पसरवणारी आहे. विशेषत: परदेशी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांचे गुण वाढवून देणाऱ्यांमध्ये जेव्हा विद्यापीठातील उपकुलसचिव पदावरील व्यक्ती गुंतल्या असतील, तर त्याचा अर्थ पुणे विद्यापीठात सारे काही आलबेल नाही, असाच होतो. त्यातही आश्चर्याचा भाग म्हणजे या गुण वाढवण्याच्या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या सत्यशोधन समितीमधीलच एक सदस्य या गुण वाढवण्याच्या जाळ्यातील प्रमुख आरोपी ठरला आहे. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी त्यासंबंधी केलेले भाष्य असे की, या व्यक्तीबाबत यापूर्वी अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नव्हत्या. ते खरेही असेल. परंतु विद्यापीठासारख्या परीक्षांच्या कारखान्यात जर अंतिम निकालाचा कागद हवा तसा बनवून मिळत असेल, तर राज्यातील अन्य विद्यापीठांत असे घडत नसेल, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. विद्यार्थी परीक्षेला बसला की बहुतेकदा त्याच्या अवगुणांनी त्याला कमी गुण मिळतात. मग तो पुनर्मूल्यांकनासाठी आग्रह धरतो. असा अर्ज केल्यानंतर त्याची उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जाते आणि आधीच्या परीक्षकांनी जर कुचराई केली असेल, तर त्यात दुरुस्ती केली जाते. सामान्यत: अशा पुनर्मूल्यांकनात गुणांमध्ये फार मोठा फरक पडत नाही. परदेशातून भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. विशेषत: तिसऱ्या जगातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय शिक्षण अधिक मौल्यवान समजले जाते. महाराष्ट्रात तर शिक्षणाच्या सोयी-सुविधा खासगी शिक्षण संस्थांनी इतक्या मोठय़ा प्रमाणावर निर्माण केल्या आहेत, की त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची अक्षरश: झुंबड उडते. पुण्यासारख्या शहरात शिकण्यासाठी आल्यानंतर शिक्षणबाह्य़ गोष्टींच्या आकर्षणामुळे अभ्यासातील लक्ष उडायला फारसा वेळ लागत नाही, असा अनुभव अनेकदा येतो. पुणे विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणात सापडलेल्या या विद्यार्थ्यांचे पत्ते चुकीचे आणि खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ संबंधित शिक्षण संस्था त्याबाबत फारशा आग्रही नसतात आणि पोलिसांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, असा होतो. अभ्यास न करता पीएच.डी.ची पदवी पोस्टाने घरपोच पाठवणारी विद्यापीठे भारतात खंडीभर आहेत.  मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे परदेशीयांसाठी शिक्षण हा व्यवहाराचा मामला बनतो. शिक्षण घेऊन शक्यतो येथेच राहण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणात दिसते. अशा स्थितीत परदेशी विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्याची आणखी एक जबाबदारी पोलिसांना पार पाडणे आवश्यक ठरते. विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देणे यासाठी आवश्यक असते, की त्यामुळे येथील शिक्षणाच्या दर्जाबद्दल जगात वेगळा संदेश जाता कामा नये. प्रचंड प्रमाणात पैसे देऊन प्रवेश मिळवायचा आणि त्यानंतर पैसे देऊनच गुण वाढवून घ्यायचे, हे जर इतके सुलभ असेल, तर जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही, याबद्दल हळहळ करण्याचेही खरे तर कारण नाही. दर्जेदार शिक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या विद्यापीठाने याबाबत दक्षता घेणे आवश्यकच आहे, मात्र पोलिसांनी काळजीपूर्वक या प्रकरणाची तपासणी केली, तर भविष्यात असे प्रसंग टाळता येऊ शकतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा