तो अभ्यासात यथातथाच. दहावी-बारावी झाला कसाबसा. पुढे  अभ्यासात काही जीव रमेना त्याचा. काही तरी उद्योग करायला हवा, असं त्याच्या मनानं घेतलं. उद्योग सुरूही केला. आणि आता? याची एकटय़ाची खासगी श्रीमंती जवळपास ९०० कोटी डॉलर आहे आणि ती वाढतच आहे.. का?
काळानुसार सर्वच बदलतं. तसंच आटपाट नगरही आता बदललंय. देश झालाय आता त्या नगराचा. पण हा बदल बाहय़ांगाचाच आहे. म्हणजे भौगोलिक वगरे. बाकी सगळं तसंच आहे. म्हणजे नियमापेक्षा ओळखीपाळखीनं काम होणं, जॉर्ज ऑर्वेल म्हणायचा तसा सगळे समान असले तरी काहींनी अधिक समान असणं आणि एकंदरच व्यवस्थेपेक्षा व्यक्ती मोठा असणं.. वगैरे वगरे. आटपाट नगरात तसं होतं. आता आटपाट देशात असं आहे.
तर या आटपाट देशात एक शाकाहारी कुटुंब होतं. पश्चिमेकडच्या राज्यात राहणारं. कपडालत्त्याचा व्यवसाय होता त्याचा. तो अधिक जोमानं चालावा, मागणी वाढावी यासाठी कुटुंबाचा आकारही मोठा होता. तब्बल सात मुलं होती त्या कुटुंबाला. त्यातला हा मधला. अभ्यासात यथातथाच. दहावी-बारावी झाला कसाबसा. पदवीलाही प्रवेश घेतला त्यानं, पण या अभ्यासात काही जीव रमेना त्याचा. काही तरी उद्योग करायला हवा, असं त्याच्या मनानं घेतलं. खरं तर व्यवसायाची कौटुंबिक परंपरा होतीच, पण त्याला त्यात रस नव्हता. आपण काही तरी वेगळं करावं असं त्याला वाटत होतं.
आटपाट देशात वेगळं काही करायचं असेल त्यांनी महानगरीच्या आश्रयाला जायची प्रथा होती. त्यानं ती पाळायची ठरवलं. तो या महानगरीत आला. त्याला लक्षात आलं आपल्या अनेक गाववाल्यांच्या हातीच महानगरीचं नियंत्रण आहे. त्यांच्याच हाती सगळी सूत्रं आहेत. नाही म्हणायला त्या महानगरीवर भूमिपुत्रांचा हक्क सांगणाऱ्यांचा एक समूह होता, पण यथास्थित चारापाणी दिल्यावर हे भूमिपुत्रवाले गप्प गुमान बसतात, हेही त्यानं ताडलं. मग याच महानगरीत त्यानं आपला नवा व्यवसाय शोधला. हिऱ्यांचा. दूर परदेशातनं पलू न पाडलेले दगड आणायचे आणि त्याला पलू पाडून त्यातून चमचमता हिरा घडवायचा हा या महानगरीतला मोठा व्यवसाय. तो करायची वेळ या महानगरीवर आली कारण आटपाट देशातले अनेक दगड परदेशात गेले आणि तिथे पलू पाडून घेत हिरे म्हणवते झाले. त्यामुळे आटपाट देशाला तशी हिऱ्यांची कमतरताच भासत होती. ती यानं ताडली आणि लगेच त्या जगाला आपलंसं केलं. इतकं की, वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी हा लखपती झाला. आता त्याच्या घरच्यांनाही कळून आलं त्याचं कौशल्य. त्यामुळे मग मोठय़ा भावानं त्याला सांगितलं, परत मायगावी ये.. नवीन व्यवसाय सुरू करू आपण. हा मग गेला परत आपल्या गावी.
नवाच व्यवसाय सुरू केला त्यानं. पॉलिविन्याल क्लोराईड.. म्हणजे पीव्हीसी.. आयात करू लागला हा. कारण त्या वेळी प्लॅस्टिक वस्तूंना चांगलीच मागणी वाढू लागली होती. त्यात पीव्हीसी हा मुख्य घटक. तोच हा आयात करू लागला. धो धो धंदा वाढला त्याचा. ही वाढ इतकी होती की त्याला कंपनीच काढावी लागली. कंपनी काढल्यावर त्याच्या व्यवसायस्वप्नांना पंख फुटले. मग त्यानं गावच्या सरकारशी करार केला. त्याच्या राज्यात बंदर नव्हतं. हा सरकारला म्हणाला, आपण बंदर बांधू या.. तुम्ही थोडे पसे घाला, मी थोडे घालतो. सरकारला असे उद्योग आवडतातच. ते हो म्हणालं. मग यानं बंदर बांधायला घेतलं. मोठ्ठंच्या मोठ्ठं बंदर. नंतर हा सरकारला म्हणाला, तुमचे पसे घेऊन टाका.. बंदर माझ्या नावावर करा. तेही झालं मग. हा मग वीज तयार करू लागला. खाणी खणू लागला.
मग याच्या आयुष्यातला खरा योगायोग सुरू झाला. त्याच्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या आणि मग असाच त्याच्यासारखा धडाडीचा नेता मुख्यमंत्री झाला. त्या वेळी खरं तर हा कोणीही नव्हता. एक आपला उद्योजक. अनेकांमधला एक. त्या वेळी त्याच्याच राज्यातले, त्याचे भाषाबंधू आटपाट देशातले सगळ्यात धनवान म्हणून गणले जायचे. त्यांच्यासमोर तर हा किस पेड की पत्ती. त्यांच्या संपत्तीपेक्षा याची संपत्ती ५०० टक्क्यांनी कमी होती. ते दोघे भाऊ नव्या मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जायचे. हा म्हणाला आपण का नाही. त्यानं अनेक खटपटी लटपटी केल्या आणि अखेर मुख्यमंत्र्यांच्या आतल्या गोटात प्रवेश मिळवलाच.
तेव्हापासून त्याचा भाग्योदय सुरू झाला तो झालाच. नंतरच्या १२ वर्षांत याच्या कंपनीच्या समभागांच्या दरात कितीने वाढ झाली असावी? चक्क ८५ पटींनी. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्या कंपनीचा त्या वेळी १ रुपयाचा समभाग आता ८५ रुपयांवर गेला आणि खरी गंमत ही की या काळात सर्वच बाजार वाढत होता, असंही नाही. याचा अर्थ बाजाराच्या वाढीच्या सरासरी गतीपेक्षा याची गती किती तरी अधिक होती. या काळात बाजाराची वाढ झाली आठ पटीनं, तर हा वाढला ८५ पटीनं. आता काही म्हणतील आटपाट देशातल्या कुडमुडय़ा भांडवलशाहीचा त्याला फायदा झाला. त्याला काही अर्थ नाही. कारण ही कुडमुडी भांडवलशाही इतरांसाठीही इतकीच कुडमुडी होती, पण त्यांना नाही जमलं असं यश मिळवणं. तेव्हा याचं कौतुक आवश्यक तिथं करायलाच हवं. ही कौतुकाची वेळ आटपाट देशात आता वारंवार येणार होती.
कारण याचा मित्र ते राज्य सोडून साऱ्या आटपाट देशाचाच मुख्य होणार होता. आटपाट देशात या मुख्याला पंतप्रधान म्हणतात. तोच आता याचा मित्र होणार म्हणजे साक्षात वरदा लक्ष्मीच घरी धुणीभांडी करायला येण्यासारखंच की. तसंच झालं. याच्या मित्राचं नाव आटपाट देशाचा प्रमुख म्हणून जाहीर झालं तेव्हापासून याच्या कंपनीच्या समभागाची अशी घोडदौड सुरू आहे की विचारू नका. त्यानंतर वर्षभरात याच्या कंपनीचा समभाग तब्बल ३०० टक्क्यांनी वाढला. इतकी वाढ साधणं देशातल्या भल्याभल्या कंपन्यांनाही जमलं नाही. अर्थात जे भल्यांना जमत नाही ते वाटेल त्या मार्गानं करून दाखवणं हेच तर आटपाट देशातल्या बडय़ांचं वैशिष्टय़ होतं. तेव्हा हा त्यापेक्षा वेगळा कसा निपजणार?
आणि मग पुढे ठरल्याप्रमाणं याचा मित्र आटपाट देशाचा खरोखरच पंतप्रधान झाला. मग काय विचारायचीच सोय नाही. मतमोजणीचा दिवस ते याचा स्नेही पंतप्रधान झाला तो दिवस या काळात याची संपत्ती थेट २६ टक्क्यांनी वाढली. ही वाढ इतकी होती की तोपर्यंत देशातल्या महाश्रीमंत गणल्या जाणाऱ्या उद्योगपती बंधूंनाही त्यानं एकटय़ानं मागे टाकलं, म्हणजे फक्त वाढीच्या वेगात. म्हणजे त्यांची श्रीमंती फक्त १७ टक्क्यांनी वाढली. याची २६ टक्क्यांनी. आता या दोघांतलं अंतर अशाच वेगानं कमी होतंय. याची एकटय़ाची खासगी श्रीमंती जवळपास ९०० कोटी डॉलर आहे आणि ती चांगल्याच जोमानं वाढतीये.
त्यात झालं असं की आटपाट देशाच्या पंतप्रधानपदी बसल्यावर नवे पंतप्रधान जिकडे जातील तिकडे याला बरोबर न्यायला लागले. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया.. नव्या पंतप्रधानांना हिंडण्याची खूपच आवड. पंतप्रधानपदी निवड व्हायच्या आधीही ते िहडत होते. तेव्हा यानं मदत केली होती आपलं विमान देऊन. त्याची परतफेड पंतप्रधान याला बरोबर नेऊन करतायत अशी कुजबुज राजदरबारात ऐकू येते हल्ली. ते काहीही असो. हा इतका वाढला हे त्यापेक्षा महत्त्वाचं.
याच्या स्नेह्य़ाचं नाव आटपाट देशाच्या प्रमुखपदासाठी जाहीर झालं तेव्हापासून तो पंतप्रधानपदी प्रत्यक्ष बसला त्या कालावधीत याची मालमत्ता तब्बल ४०० पेक्षा अधिक टक्क्यांनी वाढली. पंतप्रधानपदाचं नाव जाहीर झालं तेव्हा ती १९० कोटी डॉलर इतकी होती. पुढच्या काही महिन्यांत ती ९०० कोटी डॉलर इतकी झाली. संपत्तिशास्त्रातील अंकगणितींच्या मते दिवसाला अडीच कोटी डॉलर इतक्या वेगानं याची संपत्ती वाढत गेली.
हा वेग अचंबित करणारा खराच. कारण आटपाट देशातल्या सव्वाशे कोटींपकी ८० कोटी जनतेचं उत्पन्न दिवसाला २ डॉलर इतकंदेखील नाही.
म्हणून तर आटपाट देशातले बहुसंख्य नागरिक अडाणी आहेत आणि हा आहे..?
आता याचंही उत्तर माहीत नसेल तर त्यांना अडाणी नाही तर काय म्हणणार?
गिरीश कुबेर

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता