‘बॅरिस्टरचं करट’ या डॉ. हिंमतराव  बावस्कर यांच्या  आत्मचरित्राच्या मराठीत गेल्या आठ वर्षांत आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्यानंतर आता ते इंग्रजीमध्ये प्रकाशित झालं आहे. कोकणातील एका सामान्य कुटुंबातल्या मुलाचा संघर्ष, त्याची जिद्द आणि जागतिक पातळीवर मान्यता पावलेलं संशोधन याची ही कहाणी आहे. डॉक्टरकीची पदवी मिळाली की, बरीच मंडळी दवाखाना टाकतात किंवा सरकारी वा अन्य रुग्णालयांमध्ये नोकरी करतात. पण त्यातील फार थोडे लोक जाणीवपूर्वक ग्रामीण भागात काम करण्याचा निर्णय घेतात आणि त्यातलेही आणखीन थोडे लोक स्वतंत्र संशोधन करतात. डॉ. बावस्करांनी या दोन्ही गोष्टी केल्या. रायगड जिल्ह्य़ातील महाड या ठिकाणी दवाखाना चालवतानाच विंचूदंशावर संशोधन केलं. त्याला जगभर मान्यता मिळाली. त्याची ही कहाणी.
या पुस्तकाची इंग्रजी भाषा मराठीसारखीच प्रवाही आहे. कारण हे भारतीय इंग्रजी आहे. त्यामुळे त्यात एक प्रकारचा अनौपचारिकपणा आहे. साधं, सोपं लिहिलं तर ते अधिक परिणामकारक ठरतं, याचा अनुभव हे इंग्रजी पुस्तक वाचताना येतो. कारण मुळात हिंमतराव यांचा जीवनानुभव प्रत्ययकारी आहे. तो त्यांनी पोटतिडिकीने सांगितला असला तरी त्यात कुठलाही आक्रस्ताळेपणा नाही. उलट आपल्या दारिद्रय़ाविषयी काहीशी आत्मीयता आणि त्याकडे पाहण्याचा खिलाडू दृष्टिकोन आहे. कोकणी माणसाच्या स्वभावाचा बेरकीपणा ठायी ठायी प्रत्ययाला येतो.
हे रूढ प्रकारातलं आत्मचरित्र नसून ते एकप्रकारचं कार्यचरित्र आहे. आत्मचरित्र हे लेखकानं तटस्थपणे लिहिलेलं स्वत:चंच चरित्र असतं असं म्हणतात, त्याचा प्रत्यय इथे येतो.
हिंमतराव यांचं विंचूदंशावरील संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारलं जाऊनही त्यांना कधी युरोप-अमेरिकेची भुरळ पडली नाही की, आपण आता मोठय़ा शहरात स्थायिक होऊन प्रकाशझोतात राहावंसंही वाटलं नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर ते वाखाणलं जातं, त्याची कशी योग्य कदर केली जाते, याची ही कहाणी आहे. परदेशी न गेलेल्या माणसाचा हा ‘स्वदेश’ म्हणूनच वाचण्यासारखा आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग  हिंमतरावांबद्दल म्हणतात, ‘आय अ‍ॅडमायर नॉट ओन्ली युवर स्ट्रगल, बट ऑल्सो युवर लाइफ’. थोडक्यात सांगायचं तर अप्रतिम असं हे पुस्तक आहे.
बॅरिस्टर्स ब्रॅट : डॉ. हिंमतराव साळुबा बावस्कर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे,
पाने : ३०१,   किंमत : ३५० रुपये.