परीक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांना पदवी देणाऱ्या विद्यापीठीय शिक्षण संस्कृतीमध्ये पैसे घेऊन गुण वाढवणे किंवा टेबलाखालून व्यवहार करून प्रवेश देणे असे प्रकार आता पुरेसे रुजलेले आहेत. पुणे विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांना गुणपडताळणीमध्ये गुण वाढवून दिल्याच्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नुकतीच अटक करण्यात आली. त्याही वेळी असेच म्हटले गेले की, हे प्रकरण बाहेर आले नसते, तर गेली अनेक वर्षे असे व्यवहार चालू राहिले, तसेच याहीपुढे घडत राहिले असते. आता या सगळ्यावर कडी ठरणारी घटना नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंबाबत घडली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज करताना दाखल केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. एखाद्या कुलगुरूवरच पद मिळवण्यासाठी लांडय़ालबाडय़ा केल्याचा आरोप होणे आश्चर्यकारक आहे आणि कुलगुरूंची निवड करणाऱ्या यंत्रणेबद्दलही प्रश्न निर्माण करणारे आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपाल काम पाहत असतात. राज्याच्या उच्च शिक्षणातील व्यावहारिक, व्यवस्थापकीय आणि तांत्रिक बाबींसाठी कुलपतींचाच शब्द अंतिम मानला जातो. कुलगुरूच्या निवड प्रक्रियेची सारी जबाबदारी ही कुलपती कार्यालयाकडेच असते. असे असताना कुलगुरुपदासाठी पात्र उमेदवार निवडताना त्याबाबतची योग्य ती शहानिशा झाली नाही, की त्याबाबत टाळाटाळ करण्यात आली, असे अनेक प्रश्न आता निर्माण होतील. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यापीठांचे स्थान महत्त्वाचे असते आणि त्या संस्थेच्या प्रमुखपदी नेमणूक करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू विलास सकपाळ यांच्याबाबतही असे काही घडले का, ते आता पोलीस तपासात उघड होईल. त्याच विद्यापीठातील माजी प्राध्यापक सुनीलकुमार मिश्रा यांनी याबाबत मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नंतर मिश्रा यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांचे म्हणणे असे की, कुलगुरू सकपाळ यांनी अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे. नागपूर खंडपीठाने याबाबत पोलिसांना अधिक तपास करण्याचे आदेश दिल्याने आता त्याचा पहिल्यापासून तपास सुरू होईल. न्यायालयाने तपासाचे आदेश दिले याचा अर्थ सकपाळ दोषी ठरले असा होत नसला, तरी या प्रकरणात काही काळेबेरे असण्याची शक्यता त्यातून दिसून येते. त्यामुळे कुलगुरुपदावरील व्यक्तीच्या अशा वर्तनाचे शिक्षण क्षेत्रावर बरेवाईट परिणाम होणे स्वाभाविक ठरते. जेव्हा समाजात अध्यापकाबद्दलचा आदर कमी होतो, तेव्हा तो रसातळाला जायला लागतो. ज्ञान देणाऱ्या व्यक्तीच्या ज्ञानाबद्दल आणि अधिकाराबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आदराची भावना निर्माण होण्यासारखे त्याचे वर्तनही असावे लागते. गेल्या काही दशकांत अध्यापकांबाबतचा हा आदर उणावत चालल्याचे चित्र दिसते, त्याला अध्यापकांचे वर्तनही कारणीभूत आहे. शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा दृष्टिकोनही नकारात्मक असल्यामुळे असे घडते, असा युक्तिवाद केला जात असला, तरी त्यात फारसे तथ्य नसते. विद्यार्थ्यांसाठी अध्यापकच जगातील ज्ञानाची दारे उघडून देत असल्याने त्याने आपले वर्तन आणि चारित्र्य याबाबत जागरूक असणे आवश्यक असते. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंबाबत अशी तक्रार होणे आणि त्याबाबत तपासाचा आदेश देणे या गोष्टी शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वच घटकांना आत्मपरीक्षणासाठी उद्युक्त करणाऱ्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा