‘केसरी’चे माजी संपादक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे निकटचे स्नेही व ‘जडण-घडण’ मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांचा  विशेष लेख..
डॉ. गोखले सरांविषयी बोलायचं किंवा लिहायचं म्हटलं तर प्रश्न येतो, की त्यांच्या समाजकार्याबद्दल लिहावं की पत्रकारितेविषयी? आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील त्यांच्या प्रदीर्घ कामगिरीविषयी लिहावं, की त्यांच्या शब्द लालित्यानं मोहवणाऱ्या अभ्यासू लेखणीबद्दल लिहावं? अगदी आजन्म पुणेकर असूनही समोरचा माणूस हरभऱ्याच्या झाडासह पुढचे काही दिवस कोसळून पडावा अशा शब्दांत त्यांनी केलेल्या प्रशंसेबद्दल सांगावं, की कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन ती आपल्याला अपेक्षित अशाच पद्धतीनं सोडवण्याच्या त्यांच्या थक्क करून सोडणाऱ्या कौशल्याबद्दल लिहावं? डॉ. गोखले सर हे असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं.
औपचारिक सभांपर्यंत आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमापासून ते एखाद्या कार्यशाळेपर्यंत प्रत्येक ठिकाणी बोलताना गोखले सर त्या त्या विषयाशी संबंधित एखादा नवा मुद्दा सांगून जायचे. त्यांच्याशी गप्पा मारणं म्हणजे एका संपूच नये अशा वाटणाऱ्या मैफलीत गेल्यासारखंच असायचं. पुण्यातल्या गल्लीबोळापासून ते न्यूयॉर्कपर्यंतचे अनेक संदर्भ, व्यक्तिरेखा, घटना, प्रसंग, साहित्य, कला, संगीत या साऱ्याचं ते वेगळंच मिश्रण असायचं. पण त्या वेळी हमखास प्रश्न पडायचा, की या मैफलीचं संयोजन सांभाळतानाच अनेक विसंगत व्यक्ती आणि त्यांचे टिपिकल विक्षिप्त सूर याचा गोखले सर कसा बरं मेळ घालत असतील? पुढे त्याबद्दलचं कुतूहल कधी तरी होणाऱ्या गप्पांमध्ये जागं व्हायचं आणि ते पुन्हा काही गमतीदार गोष्टी सांगायचे. आबालवृद्धांशी बोलताना, त्यांच्यात वावरताना त्या त्या वयानुसार समोरच्या माणसाशी समरसून जात बोलण्याची कला, पण त्याच वेळी एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आवश्यक तेवढा दाखवावा लागणारा अलिप्तपणा या साऱ्याचं एक जबरदस्त रसायन म्हणजे गोखले सर. अशा मोठय़ा माणसांच्या मनाचे तळ लागणे कठीणच,  पण तो तळ शोधण्याचा प्रवासही खूप आनंददायी असू शकतो.
बालवीरांच्या चळवळीतून काम करणाऱ्या गोखले सरांना लहानपणापासूनच दीन-दुबळे, अपंगांविषयी, प्राण्यांविषयी जवळीक वाटायची. चिमणीसाठी कागदाचं घरटं कर, पावसात भिजलेलं कुत्र्याचं पिलू घरी आण इथपासून ससे, हरिण पाळणाऱ्या गोखले सरांनी मुंबईतल्या चेंबूरमधील ‘बेगर्स होम’चा अधीक्षक असताना काय करावं? चक्क एक अजगर घरात आणून ठेवला.
सरकारी नोकरीच्या चौकटी त्यांना मानवेनात. नंतर ‘कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम’  (कास्प) ही स्वयंसेवी संस्था सुरू केली. भारतातील सुमारे ३० हजार मुलामुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी या संस्थेनं केलेलं कार्य फार महत्त्वाचं आहे.  अपंग मुलांसाठी गोखले सरांनी एक प्रार्थना लिहिली होती. कविहृदय आणि मातृहृदय या कवितेत एकरूप झाल्याचाच आपल्याला प्रत्यय येईल. त्यांनी लिहिलेली ही कविता अशी आहे :
हे देवाधिदेवा,
माझ्या अपंग मुलांना स्वातंत्र्याचे पंख दे!
कितीही प्रयत्न केला तरी
माझ्या मतिमंद मुलांच्या बुद्धीवर पडलेल्या बेडय़ा
तुटत नाहीत; माझ्या मूकबधिर मुलांच्या विचारांना
शब्दांचे पंख फुटत नाहीत,
आक्रंदनाला स्वरच फुटत नाहीत :
उद्गारांच्या अभावी त्यांचा कोंडमारा होतो आहे;
त्यांना शब्दांचे वरदान दे!
माझ्या अंध मुलांना प्रकाशाची शलाका दे!
निदान त्यांना शिक्षणाचे महाद्वार उघडून दे,
ज्यांच्या ज्यांच्या हातापायांत
अपंगतेच्या बेडय़ा आहेत
त्यांना मुक्तीचे वरदान दे,
माझ्या अपंग मुलांना स्वातंत्र्याचे पंख दे!
‘टाटा’मधील समाजसेवकाची पदवी, काशी विद्यापीठातून डॉक्टरेट, समाजकल्याण खात्यातील नोकरी, भारत सरकारचे समाजकल्याण सल्लागार या प्रवासानंतर मग मात्र गोखले सरांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठे खुणावू लागली.
 आंतरराष्ट्रीय समाजविकास महामंडळ, युनायटेड नेशन्स, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र, आंतरराष्ट्रीय कुष्ठनिर्मूलन संघटना या व्यासपीठांवरून त्यांनी आबालवृद्धांचा प्रश्न सोडवण्याकरिता आयुष्यभर काम केलं. जगातील ७०हून अधिक देशांचा त्यांनी प्रवास केला. ‘केसरी’चं संपादकपद भूषवतानाच अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांना त्यांनी विविध प्रकारे साहाय्य केलं.
मराठी आणि इंग्रजी भाषेत त्यांनी ४०पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले.  गोड वाणी, सृजनशील लेखणी आणि माणसांचा स्नेह सांभाळण्याचं व्यसन असलेले गोखले सर म्हणजे हजारो व्यक्ती आणि अनेक संस्थांचा ‘आधार’ होता.  त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!

Story img Loader