क्रिकेट हा पूर्वी सभ्य गृहस्थांचा खेळ मानला जात होता. आता हा खेळ पैसेवाल्यांचा व सौदेबाजांचाच खेळ झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट क्षेत्रात गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात पैशाचा ओघ सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे (आयसीसी) साऱ्या क्रिकेटवर राज्य केले जाते. आयसीसीला विविध स्पर्धा, स्पर्धाच्या प्रक्षेपणाचे हक्क, स्पर्धाचे प्रायोजकत्व आदी विविध मार्गाने जेवढे उत्पन्न मिळते त्यापैकी निम्म्याहून जास्त उत्पन्न भारतामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सामन्यांद्वारे मिळते. असे असूनही गेली अनेक वर्षे आयसीसीवर भारताची मक्तेदारी नव्हती. आपण जर जास्त उत्पन्न मिळवून देतो तर आयसीसीवर आपल्याला जास्त अधिकार मिळायला पाहिजेत, असा शोध नुकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन व त्यांच्या सहकाऱ्यांना लागला. साहजिकच त्यांनी आपल्याला आयसीसीवर जास्त प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असा तगादा लावला. आयसीसीच्या अध्यक्षपदावर भारतीय संघटकाची नियुक्ती करण्याबाबत ज्या दोन देशांनी प्रामुख्याने विरोध केला होता, त्याच इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या संघटकांशी हातमिळवणी करीत श्रीनिवासन यांनी नुकतीच आपली मागणी मान्य करून घेण्यात यश मिळविले आहे. नवीन बदलांनुसार भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या तीन देशांचे आयसीसीवर वर्चस्व राहणार आहे. आयसीसीच्या विविध योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व सामन्यांची कार्यक्रम पत्रिका ठरविण्याचे अधिकार या तीन देशांना मिळणार आहेत. त्यातही आयसीसीचे अध्यक्षपद श्रीनिवासन यांच्याकडे राहणार असल्यामुळे हम करे सो कायदा अशी त्यांना सत्ता मिळणार आहे. पाकिस्तान, श्रीलंका व दक्षिण आफ्रिका तसेच काही प्रमाणात बांगलादेश यांनी नवीन बदलास तीव्र विरोध दर्शविला.  पाकिस्तान व श्रीलंकेच्या प्रतिनिधींनी ठरावाच्या वेळी मतदानावर बहिष्कार घातला. ऑस्ट्रेलियात कॅरी पॅकर याने आयपीएलसारखीच स्पर्धा आयोजित केली होती. त्या वेळी खुद्द ऑस्ट्रेलियातील काही ज्येष्ठ खेळाडूंबरोबरच अनेक संघटकांनी विरोध केला होता. मात्र गेल्या सहा वर्षांमध्ये भारतात आयपीएल स्पर्धा अतिशय जोशात सुरू आहे. त्यामध्ये अनेक देशांचे खेळाडू भाग घेण्यासाठी बािशग बांधूनच बसलेले असतात. दीड-दोन महिन्यांमध्ये कोटय़वधी रुपयांची कमाई होत असेल तर ती कोणाला नको आहे? हे लक्षात घेऊनच आयसीसीवरील भारताच्या मक्तेदारीस फारसा विरोध केला गेला नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, ज्यांच्याकडे आयसीसीची खुर्ची जाणार आहे, ते खरोखरीच किती प्रामाणिक आहेत हीच शंकास्पद बाब आहे. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांच्यावर सट्टेबाजीचे आरोप ठेवण्यात आले आहेत. ज्या वेळी गुरुनाथ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्या वेळी श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी झाली होती. त्यांनी आपल्या जावयावरील आरोपांबाबत कानाडोळा केला आणि आता त्याच श्रीनिवासन यांच्याकडे केवळ भारताच्या नव्हे तर साऱ्या क्रिकेट जगताची सूत्रे दिली जात आहेत. केवळ भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या तीन देशांचे नव्हे, तर आयसीसीशी संलग्न असलेल्या सर्व सदस्य देशांना क्रिकेटच्या विकासाकरिता भरघोस मदत केली जाईल, पक्षपातीपणा केला जाणार नाही, असे श्रीनिवासन यांनी सांगितले आहे. सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जण तसेच सांगत असतो, मात्र खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे असतात असे नेहमी घडत असते. आयसीसीवरील सत्तेचा उपयोग क्रिकेटमधील अनागोंदी, सट्टेबाजी व स्पॉटफिक्सिंग आदी अपप्रवृत्तीं रोखण्यासाठी केला गेला तर खऱ्या अर्थाने त्यांचे राज्य सुराज्य होईल.  

Story img Loader