संदर्भ लक्षात आले की कलाकृती ‘कळते’, ‘उमगते’, ‘वाचता येते’ अशा विश्वासानं ‘कलाभान’ वाढत राहणार, पण संदर्भ पुन्हा संस्कृतीवर अवलंबून असतात, ‘सांस्कृतिक संदर्भा’ची चौकट कलेमागे असते.. यातलं सांस्कृतिक भान आपल्याला असतं ते कसं असतं?
सांस्कृतिक संदर्भ म्हणजे संस्कृतीनं आपल्याला माहीत करून दिलेल्या गोष्टी, पण मग संस्कृती म्हणजे? ‘हीच आपली संस्कृती आहे’ असं कुणी तरी ठासून सांगत असतं, ते मुळात सांगावं का लागतं. आणि कितीही ठासून सांगितलं तरी पटतं का? ‘संस्कृती म्हणजे हेच’ असं सांगणाऱ्यांवर आक्षेप घेण्याची ही जागा नव्हे, पण अमुकच म्हणजे संस्कृती असं तालिबान्यांना किंवा खोमेनींना जितकं छान ठरवता आलं, तितकं प्रत्येकाला ठरवता वा ठरवून तश्शीच संस्कृती पाळता येत नाही, हे प्रत्येकालाच जाणवत असणार. आपल्याला आपापल्या संस्कृतीचे साधारण नकाशे माहीत असतात, त्या खुणांवरनं आपण फिरलोही असलो तर ‘फरसाणाचं दुकान’ किंवा ‘पब’ हे कुठकुठल्या गल्ल्यांमध्ये आहेत, मॉल जर सुरू झालाच तर तो या नकाशावरल्या कोणत्या ठिकाणी सुरू होऊ शकेल, हे आपल्याला माहीत असतं.. म्हणजे साध्या शब्दांत असं की, संस्कृतीच्या विविध शक्यता आपल्याला माहीत असतात. अशा किती शक्यता जाणवतात, यावर सांस्कृतिक समृद्धी अवलंबून असते. किंवा, संस्कृतीचा एक अर्थ म्हणजे त्या-त्या प्रदेशातल्या, त्या-त्या काळातल्या एकंदर जगण्याच्या शक्यता. काही शक्यता दुरावतात, काही नव्यानं येतात. बऱ्याच शक्यता तपशील बदलून जुन्याच राहतात, वगैरे सगळं आपल्याला माहीत असतं त्यामुळे ‘आपली आणि आत्ताची’ संस्कृती म्हणजे काय, याचा आपापला विचार आपण करू शकतो.
कलाकारांशी आणि कलेशी संस्कृतीचं नातं गुंतागुंतीचं असतं, हे कलेचा इतिहास तर आपल्याला सांगतोच, पण ते नातं असं गुंतागुंतीचं असणं, हाही आपला एक ‘सांस्कृतिक संदर्भ’च असतो. सरळ जात-धर्माचा उल्लेख करून केशवसुत ऊर्फ कृष्णाजी केशव दामले ‘ब्राह्मण नाही, हिंदुहि नाही, न मी एक पंथाचा’ म्हणतात, त्याहीपुढे ‘मळय़ास माझ्या कुंपण पडणे अगदी मला न साहे’ असं- मळय़ातून भाज्या चोरून नेणाऱ्यांना एक प्रकारे मुक्तद्वारच देणारं विधान करतात, हे आपणा महाराष्ट्रीयांना, (केशवसुतांचा आदर करणारा आणि त्यांच्या स्मारक-घराची वाखाणणी करणारा समाज, अशी ओळख असूनसुद्धा) कसं पटलेलंच नाही, हे आपल्या आजच्या संस्कृतीकडे निरनिराळय़ा कोनांमधून पाहिल्यावर कळतं. जुन्या कलाकारांऐवजी त्यांच्याहीपेक्षा जुने जीवनद्रष्टे (मराठी कवींचं उदाहरण ताणायचं झाल्यास, तुकाराम) आपल्याला आजघडीला सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचे वाटतात. सर्व कलाकारांना हे जीवनद्रष्टय़ा भाष्यकाराचं, तत्त्वज्ञाचं स्थान आपण देणार नसतोच, ती निवड पुन्हा ‘संस्कृती’ची सर्वसदस्य समितीच करत असते.
आपण संस्कृतीच्या या सर्वसदस्य समितीचे जन्मसिद्ध सदस्य आहोत. हे आपणा प्रेक्षकांना, श्रोत्यांना, वाचकांना माहीत असतं; तसंच- पण अनेकदा त्यापेक्षा जास्त तीव्रतेनं- कलाकारांनाही माहीत असतं. मग यापैकी अनेक जण बंडखोरी बिंडखोरी करतात.. काही जण ‘बंडखोरी म्हणजे कला नव्हे,’ असं निक्षून सांगू पाहतात, पण या सर्वातून दोन गोष्टी खऱ्या ठरतात : पहिली, कलेचा आधुनिक इतिहास (ज्या आधुनिक इतिहास-पद्धतींत आधुनिक, आधुनिकोत्तर आणि प्राचीनही कला येते, ती अभ्यासपद्धत) ‘कला म्हणजे निर्णय’ अशाही अर्थानं कलेकडे पाहात असल्यामुळे त्या अर्थानं बंडखोरीमागचा निर्णय कला म्हणून पहिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे, संस्कृतीचं पालन करण्याच्या हेतूनं जी कृती होते, ती कला म्हणून पाहिली जाण्यापेक्षा संस्कृती म्हणून पाहिली जाते.
व्यक्तिवाद आणि समूहवाद यांच्यातला हा फरक आहे, असंही लक्षात येईल. समूह काही तरी ‘मानणारा’ असल्याखेरीज बनतच नाही. मग हे सामूहिक मानणं म्हणजे संस्कृतीचा भाग बनतं. समूहाच्या बाहेर राहिलो तरी बेहत्तर असं समजून जे काम करतात आणि वर लौकिक यशसुद्धा मिळवतात, ते कलाकार असोत वा नसोत, त्यांना स्वत:चं ‘सांस्कृतिक समितीवरलं जन्मसिद्ध सदस्यत्व’ लक्षात आलेलं असतं.
आपल्यापैकी अनेक जण या टप्प्यावर आहेत. त्यांना ‘अमुक म्हणजेच संस्कृती’ असं कुणी सांगायला गेलं तर ऐकून घ्यायचं नि सोडून द्यायचं, हे जमतं. हे असं नीट जमणाऱ्या लोकांपैकी सर्वाधिक लोक आज चाळिशीच्या आसपास आहेत. आपले सांस्कृतिक प्राधान्यक्रम आणि प्रश्न काय आहेत, याची व्यक्तिगत जाणीव असलेले लोक!
एन एस हर्षां असेल ४२ किंवा ४३ वर्षांचा. गेली दहाएक र्वष तरी तो प्रथितयश म्हणून ओळखला जातोय, कुणा कलासमीक्षकानं त्याला ‘तत्त्वचिंतक कलावंत’ वगैरे म्हणून झालंय, लिलावातली बोली सव्वा कोटी
हर्षांच्या ज्या दोन कलाकृती इथं आहेत, त्यापैकी एक काही हजार सामान्यजनांनी मुंबईच्या भरचौकात (काळा घोडा) पाचच वर्षांपूर्वी पाहिलेली आहे. विमान आहे मोठ्ठं- मिराज विमान. त्याच्या खाली जो त्रिकोणी भाग बनवलाय त्यावर झोपलेल्या माणसांच्या आकृती आहेत (हर्षांला छानपैकी माणसासारखा माणूस काढता येतो, स्केचिंगची सवय ना!) ही माणसं कुठं झोपलीत? फलाटावर किंवा देवळाच्या मांडवात, असंच वाटत होतं पाहून. मध्ये ठेवलेल्या मिराज विमानावर कोणालाही काहीही लिहिण्याची म्हणा, चितारण्याची म्हणा, मुभा ठेवली होती हर्षांनं. कापडी आहे.. त्यावर बऱ्याच जणांनी देशप्रेमाचे संदेश लिहिले, कुणी नुस्त्या सह्य़ा केल्या, कुणी दोन नावांमध्ये बदाम टाकले. यासाठी खास मार्कर पेनं ठेवली होती, तीन रंगांची आणि विमानाच्या कापडावर छान लिहिलं जायचं.
हे कापड खादीचं होतं. मिराज विमान आणि खादी. दोघांची सांगड. हर्षांच्या संस्कृतीत.
समूहवादी लोक, माझ्या व्यक्तिवादी कलेकडे कसे बघतात, हा हर्षांपुढला सांस्कृतिक प्रश्न. मग कधीकधी तो प्रश्न हर्षां सोडवूनच टाकतो. ‘समजायला सोप्पी’ वगैरे भासणारी आणि खूप मनुष्याकृती असलेली चित्रं काढतो, पण त्या चित्रांमध्ये असं काही तरी असतं की, हर्षां इतरांनाही विचार करायला लावत असणार. शिलाईयंत्र ही आज ‘गारमेंटच्या गाळय़ां’मध्येच अधिक दिसणारी वस्तू झालीय. अशी खूप पायमशिनं हर्षां एकाच चौकटीत चितारतो आणि म्हणतो की, हे सगळे जण मिळून रात्रीचं आकाश आणि त्यापलीकडलं घनगर्भ अवकाश एकत्र धरून ठेवताहेत.. किंवा अशीच खूप मशिनं आणि त्यावर स्वत:चंच बूड स्थिर नसलेले, हवेनं उडून जाणारे लोक कसे झाडं शिवू पाहातायत असं काहीच्याबाही तो सांगतो.
तो काय सांगतोय, हे चित्रातून नीट ऐकू येतं. सगळ्यांनाच ‘वाचता’ येतं हे चित्र.
पण ते चित्र आणखी शंभर वर्षांनी, २००९ सालाबद्दल आणि त्याआधी हर्षां वाढला त्या ४० वर्षांबद्दल काय सांगणार आहे? ते जे सांगेल, तो आपल्या काळाचा सांस्कृतिक प्रश्न असणार, जर त्या वेळी नीट वाचू शकले लोक, तर!
सांस्कृतिक? म्हणजे?
संदर्भ लक्षात आले की कलाकृती ‘कळते’, ‘उमगते’, ‘वाचता येते’ अशा विश्वासानं ‘कलाभान’ वाढत राहणार, पण संदर्भ पुन्हा संस्कृतीवर अवलंबून असतात, ‘सांस्कृतिक संदर्भा’ची चौकट कलेमागे असते.. यातलं सांस्कृतिक भान आपल्याला असतं ते कसं असतं?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-06-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व कलाभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultural means