क्रिकेट वर्तुळात खडूस खेळाडू बऱ्याचदा पाहायला मिळतात, पण खेळपट्टी बनवणाऱ्या क्युरेटरला मात्र क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंच्या मनानुसार वागावे लागते, तो खडूस असूच शकत नाही, असे काही जणांना वाटत होते. पण कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचे क्युरेटर प्रबिर मुखर्जी मात्र याला अपवाद ठरले आहेत. पहिल्या दिवसापासून खेळपट्टी फिरकीला पोषक असायला हवी, असा हट्ट सध्या भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी करत होता. पहिल्या दोन्ही सामन्यांत त्याचे हे हट्ट पुरवलेही गेले, पण १९८५ पासून ईडन गार्डन्सची खेळपट्टी बनवणाऱ्या मुखर्जी यांनी याला विरोध केला आणि ते प्रकाशझोतात आले. गेली २७ वर्षे मुखर्जी ईडन गार्डन्सची खेळपट्टी सांभाळत आहेत. या कालावधीत बरेच कर्णधार येऊन गेले; पण कोणीही कधीही मुखर्जी यांच्या विरोधात तक्रार केली नाही, कारण त्यांनी प्रत्येक वेळी फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही मदत करणारी खेळपट्टी बनवली होती. धोनीने हट्ट केल्यावर मात्र मुखर्जी यांचा पारा चढला. मुखर्जी ऐकत नसल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांना हटवण्याचा घाट घातला.  बीसीसीआयच्या या निर्णयावर मुखर्जी चांगलेच रागावले. २७ वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला एका गोष्टीवरून दूर करण्याचा निर्णय त्यांना पटला नाही. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे मुखर्जी दुखावले गेले आणि स्वाभिमानी मुखर्जीनी एका महिन्याची वैद्यकीय रजा घेतली. रजा घेताना ‘हा माझा अपमान आहे’ असे म्हणत ते तावातावाने निघून गेले. त्यानंतरही मुखर्जी यांच्यावर बीसीसीआयचा दबाव सुरूच होता. खेळपट्टीबाबत वक्तव्य केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची बीसीसीआयने त्यांना धमकी दिली, पण मुखर्जी हे घाबरले नाहीत आणि त्यांच्यापुढे नमलेही नाहीत. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हे त्यांच्या बाबतीत पाहायला मिळाले. कारण त्यांनी मांडलेली बाजू ही प्रामाणिक आणि सत्याची होती. हे प्रकरण चिघळते आहे, हे पाहून अखेर बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी मुखर्जी यांचा राग शांत करून त्यांना पुन्हा एकदा कामावर बोलावले. मुखर्जी यांच्या जागी अन्य कोणी असले असते तर क्रिकेट मंडळ, देशाचा कर्णधार जे सांगत आहेत, ते निमूटपणे केले असते, पण मुखर्जी यांना स्वत:वर, स्वत:च्या कामावर विश्वास कायम  आहे,  त्यामुळेच ते आपल्या मतावर ठाम राहिले आणि अखेर विजय त्यांचाच झाला.

Story img Loader