श्रीगोंदवलेकर महाराज दोन मेच्या प्रवचनात काय सांगतात, ते पुन्हा पाहू. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काहीतरी उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल. यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे, तर दुसरे थोडे सूक्ष्म आहे. शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते आणि त्यांना हाकलताही येते. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागेल. शेताला कुंपण घालून गुरेढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधे वगैरे टाकून, कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत रहावे लागते. म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते. हाच नियम परमार्थातही लागू आहे. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे. शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे. शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे. अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंतचे काम झाले.’’ या परिच्छेदात अत्यंत खोलवर निर्देश करणारी रूपकं आहेत आणि तो बोधही अत्यंत व्यापक आहे. नियमांचं बोट पकडून उपासना करता करता आपण अलगद प्रपंच आणि परमार्थ या दुपदरी रस्त्यावरच आलो आहोत. प्रथम नेम करणारे आपण या दोन्ही गोष्टींत अर्थात प्रपंच आणि परमार्थात वाटचाल करीत असतो. इथे श्रीमहाराज उपासनेला शेताची उपमा देतात. गुराढोरांनी ते फस्त करू नये म्हणून प्रपंचाचे कुंपण घालायला सांगतात आणि कीड लागून शेत नष्ट होऊ नये म्हणून राख, शेण, औषधांची फवारणी करायला सांगतात. ही सर्वच रूपकं आहेत आणि त्यांना व्यापक अर्थही आहे. गुरंढोरं म्हणजे काय? तर सामान्य मूलभूत वासना. या देहवासनाच आहेत. देहाला धरून आहेत. आहार, निद्रा, मैथुन अशा या अनेक वासना आहेत. तहान लागली की पाणी प्यायल्यावर तहान शमते. इतकी या वासनांची पूर्ती खरेतर अल्पावधीत होते. एक गोष्ट मात्र आहे की या वासना पटकन शमत असल्या तरी वारंवार उत्पन्नही होतात आणि त्या वारंवार शमल्या की शांतही होतात. त्यांची पूर्ती सहज साधावी यासाठी ज्याला आपण स्थूलपणे प्रपंच म्हणतो, तो निर्माण झाला आहे. त्यात विशेष असा की हा प्रपंच जसा एका बाजूने साधकाच्या सामान्य वासनांची पूर्ती करून त्याला उपासनेसाठी वाव देतो त्याचबरोबर त्या प्रपंचात राहूनच आपल्या स्वभावातील खाचाखोचा, त्रुटी, उणीवांचा तपास त्याला पटकन करता येतो. आपल्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर किती आहे याचा शोध प्रपंचातच वेगाने लागतो आणि ते विकार आवरण्याचा अभ्यासही प्रपंचातच करायला बराच वावही असतो.
२६. प्रपंचाचं कुंपण
श्रीगोंदवलेकर महाराज दोन मेच्या प्रवचनात काय सांगतात, ते पुन्हा पाहू. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काहीतरी उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल.
First published on: 05-02-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dailychores compound