हल्लीच्या नृत्यस्पर्धाच्या लाटेत आचार्य पार्वतीकुमार हे नाव खूपच प्राचीन वाटलं म्हणूनच त्यांच्याविषयी कुतूहल जागृत झालं. एके दिवशी सकाळीच त्यांचं घर शोधत ग्रँट रोड इथल्या घराची बेल वाजवली. नृत्यातला ‘ग’ सुद्धा माहीत नसलेला मी, आरदयुक्त भीतीनं माझ्या येण्याचं प्रयोजन सांगताक्षणी कोणतेही आढेवेढे न घेता ओळखीच्या शिष्याशी बोलल्याप्रमाणे ते माझ्याशी गप्पा मारत भूतकाळात रमून गेले.
कोकणातल्या मालवण इथल्या कट्टा गावातून मुंबईच्या परळमधल्या कामगार वस्तीत स्थायिक झालेलं महादेव कांबळी कुटुंब. या गिरणी कामगाराच्या पोटी जन्माला आला एक अलौकिक कलाकार-गजानन कांबळी. अर्थात प्रसिद्ध नृत्ययोगी आचार्य पार्वतीकुमार! गजाननाला शिक्षणात रुची नसली तरी दिवसभर चाळीतली मुलं जमवून नकला करण्यात तो हुशार ! एक दिवस वृत्तपत्रातल्या नृत्याच्या पोझेस पाहून त्यानं एक नृत्य बसवलं. ते नृत्य त्यानं गणेशोत्सवात सादर केलं. लोकांना ते खूप आवडलं. एक दिवस गजानन मित्राच्या संगतीनं गुरू रविकांत आर्य यांच्याकडे कथ्थक शिकायला लागला. पण तालाबरहुकूम पावलं नाचवणं काय चेष्टा आहे? तालाची गती वाढवणं काही जमेना आणि कथ्यक तर सोडवेना. तालाची संगती जमली आणि नृत्याचा खजिना हाती लागल्याचा आनंद गजाननाच्या चेहऱ्यावर उमटला. अशातच एकेदिवशी त्यांची ओळख झाली भरतनाटय़म् शैलीचे मास्तर चंद्रशेखर पिल्लई यांच्याशी. गरिबीत दिवस ढकलणाऱ्या गजाननाकडे भरतनाटय़म् शिकण्यासाठी पसे कुठे होते? त्याची कुचंबणा पाहून गुरू रविकांत आर्य यांनी त्याला कथ्थकच्या शिकवण्या मिळवून दिल्या. भरतनाटय़म् शिकण्याची सोय झाली पण तीही अपुरी. खूप दिवसांनी क्लासला आलेल्या गजाननाला मास्तरांनी न येण्याचं कारण विचारलं, पण ते खोटं वाटून मास्तरांनी त्याला बदडलं. एक चांगला नृत्य शिकणारा मुलगा गरिबीमुळे येऊ शकत नसल्याची जाणीव त्यांना झाली. क्लास संपायच्या वेळी पाच रुपयांची नोट हातावर सरकवत गुरूंनी त्यांना क्लासला आवर्जून यायला सांगितलं. गुरू- शिष्य नात्याचं हे अनोखं उदाहरण !
भरतनाटय़म्चं मूळ म्हणजे संस्कृत श्लोक. जेमतेम शिकलेल्या गजाननाला ते अवघडच होतं. पण नृत्याच्या वेडानं झपाटलेल्या गजाननाला युक्ती सापडली. ट्रामच्या तिकिटामागे शिकवलेला श्लोक लिहून सकाळपासून रात्रीपर्यंत पाठ करायचा सपाटा त्यानं लावला. कठीण भरतनाटय़म् आता सोपं झालं. नृत्यातली त्याची प्रगती पाहून त्याच्या मित्रांनी त्याचं नामकरण केलं पार्वतीकुमार !
भरतनाटय़म्चे धडे गिरवत असताना त्यांच्यातला संशोधक जागा झाला. १३ व्या शतकातल्या या नृत्यशैलीच्या संशोधनानं त्यांना झपाटलं. तामिळनाडूतलं तंजावूर म्हणजे कलेचं माहेरघर ! पुरातन काळापासून शिल्प, काष्ठ, शास्त्र आणि संगीत इत्यादी कला इथे पराकोटीला पोहोचल्या होत्या. चौल आणि नायक राजांनंतर गादीवर आलेल्या भोसले वंशीय राजांच्या काळात या सर्व कला बहरल्या. दुसरे सफरेजी राजे भोसले यांच्या संगीत नृत्यादी कलांचा अभ्यास म्हणजे सरस्वती महाल आणि संगीत महाल ! सरस्वती महालातल्या राजांच्या अभ्यासपूर्ण लिखाणाच्या उगमापाशी पार्वतीकुमार पोहोचले आणि भरतनाटय़म् शैलीमधला मराठीतला खजिनाच त्यांच्या हाती लागला. कोव्र्याच्या साहित्याचे जिन्नस ! यातली एक राग एक ताल ही राजांची संकल्पना त्यांना भावली. पण केवळ ग्रंथिक कोशात न अडकता त्यांच्या संशोधन आणि अभ्यासातून आकाराला आला एक महान ग्रंथ ‘तंजावूर नृत्य प्रबंध’! या ग्रंथाचं वैशिष्टय़ म्हणजे राजांनी लिहिलेले नृत्यप्रकार केवळ तालासुरात न बांधता, त्यावर आधारित निवडक २५ नृत्ये पार्वतीकुमार यांनी नृत्यलिपीसह या ग्रंथात समाविष्ट केली. प्रथमच ग्रांथिक भाषेला लिपीची जोड मिळाली. परंपरागत नृत्यशैलीला नर्तनाची भाषा मिळाली. सुमारे तीन हजार श्लोकांच्या भरताच्या नाटय़शात्राचा अभ्यास पार्वतीकुमार अनेक र्वष करत होते. त्यांची एकेकाळची शिष्या आणि पत्नी सुमाताईंकडून नाटय़शात्रातल्या काही निवडक श्लोकांवर नृत्य बसवून ते कार्यक्रमातून सादरही करत असत. केवळ ग्रंथातच अडकलेल्या भरताच्या या नाटय़शात्राचा सखोल अभ्यास त्यांनी केला. त्यातल्या निवडक २३४ श्लोकांवर आधारित भरतनाटय़म् ही नृत्यशैली अभिनय दर्पणम् मध्ये लिपीसह गं्रथित केली. भरतनाटय़म् नृत्यशैलीला नवसंजीवनी पार्वतीकुमारांनी मिळवून दिली. ‘अभिनय दर्पणम्’ हा भरतनाटय़म् नृत्यशैलीचा नृत्यकोश मानला जातो.
भरतनाटय़म् शैलीचं महत्त्वाचं अंगं म्हणजे ताल ! तो वाजवायचं साहित्य म्हणजे साधा चौकोनी चौरंग, अर्थात तट्टकळ्ळी ! यावरही संशोधन आणि अभ्यासपूर्ण विवेचनाद्वारे त्यांच्या संकल्पनेतून एक नवं तालवाद्य बोलू लागलं. संगीत, ताल, भाव व मुद्रा यांच्या परंपरा अभ्यासून त्यांनी तट्टकळ्ळीला अनोखं रूप मिळवून दिलं.
त्याच वेळी इंडियन नॅशनल थिएटरमध्ये त्यांना संधी मिळाली बॅले (नृत्यनाटय़) दिग्दर्शनाची. नवी दिल्ली इथे १९४८ साली पहिली एशियन रिलेशन्स कॉन्फरन्स भरणार होती. त्यातल्या प्रतिनिधींसमोर संपूर्ण भारताचं चित्रं सादर करावं, असं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना वाटलं. त्यांनी कमलादेवी चटोपाध्याय यांना ते सांगितलं. कमलादेवींनी ‘आयएनटी’चे दामू जव्हेरी यांना ती संकल्पना समजावली आणि आचार्य पार्वतीकुमार यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’वर आधारित एक आगळावेगळा बहारदार कल्पक बॅले कॉन्फरन्समध्ये सादर केला. आय.एन.टी.च्या बॅनरखाली देख तेरी बम्बई, रिदम ऑफ कल्चर, डॉन ऑफ न्यू एरा यासारख्या बॅलेमधून पार्वतीकुमारांच्या सृजनतेला घुमारे फुटले.
‘एक मुसाफिर एक हसीना’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘दिल देके देखो’ यासारखे अनेक िहदी चित्रपट, ‘प्रेम आंधळं असतं’, ‘पोस्टातली मुलगी’ असे अनेक मराठी चित्रपट तसंच ‘सुदी गुण्टल’ असे तेलुगु चित्रपट आणि ‘जय जय गौरीशंकर’सारख्या नाटकांचं नृत्य दिग्दर्शनही त्यांनी केलं. केवळ ग्लॅमरच्या मागे न लागता व प्रसिद्धीच्या मोहात न अडकता ते पुन्हा वळले भरतनाटय़म्कडे. त्यांच्यातल्या अभ्यासक आणि संशोधकानं भरतनाटय़म्ला वाहून घेतले. भरतनाटय़म्च्या प्रसारासाठी त्यांनी तंजावूर नृत्यशाळेची स्थापना केली. यातूनच पुढे आलेल्या डॉ. विजया मेहता, भक्ती बर्वे, डॉ. संध्या पुरेचा, पारुल शास्त्री, जेरू मुल्ला, सुना देसाई अशा अनेक शिष्यांनी भरतनाटय़म् नृत्यशैलीचा झेंडा दिगंतात फडकवत ठेवला. कोणतंही पाठबळ नसताना एका अनोळखी वाटेवर खाचखळग्यांतून धडपडत वळणावरच्या शात्रीय कलेला आत्मसात करत, त्यात फक्त प्रावीण्य न मिळवता आपल्या कल्पकतेची जोड दिलेल्या भरतनाटय़म् नृत्यशैलीचा हा आद्यगुरू! आचार्य पार्वतीकुमार!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा