कृषीप्रधान भारताचे झपाटय़ाने शहरीकरण होऊ लागल्यानंतर ग्रामीण संस्कृती हा जेमतेम पर्यटनापुरता विषय राहिल्याने, अनेक नैसर्गिक बाबींची ओळख आजकाल केवळ पुस्तकातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातूनच होऊ लागली आहे. सकाळचा ताज्या दुधाचा चहादेखील प्लास्टिकच्या थैलीतील दुधामुळेच मिळू लागल्यामुळे तर दुधाचा नैसर्गिक स्रोतदेखील कालांतराने समजावून सांगावा लागेल, अशी परिस्थिती आजच दिसू लागली आहे. दूध कोठून येते, याच्या शहरी उत्तरांचे किस्सेही विनोदाने सांगितले जातात. ‘दूध थैलीतून येते किंवा भैया दूध आणतो’, एवढेच ज्ञान ‘फैलावत’ चालल्याबद्दल चिंतेचे सूरही ऐकू येत असतात. या ‘थैली’ संकल्पनेचा शहरी जीवनावर एवढा पगडा बसलेला असतो, की असंख्य लहान मुले तर ‘थैली’च्या दुधावरच पोसली जातात. त्यामुळे दुधाची नैसर्गिक चवदेखील अनेकांच्या विस्मृतीतच गेलेली असणार, हे वास्तव आहे. थैलीतून येणाऱ्या किंवा शहरी भागात मिळणाऱ्या सुटय़ा दुधाचा नैसर्गिक दुधाशी असलेला संबंध एका मोठय़ा धंदेवाईक, नफेखोर साखळीमुळे तुटत चालला आहे, हेही अनेकवार स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागांत दूध संकलन केंद्रांवर शेतकऱ्यांकडून विकत घेतले जाणारे दूध नंतर व्यावसायिक प्रक्रिया केंद्रांत जाते आणि त्यावर यांत्रिक प्रक्रिया होऊन थैलीबंद दूध शहरांतील ग्राहकांना विकण्यासाठी शहरांजवळील केंद्रात पाठवून त्याचे वितरण केले जाते. दूध वितरणाची ही सर्वसाधारण पद्धती असली, तरी ग्राहकाच्या दारी दुधाची थैली पोहोचण्याआधीच्या मधल्या एखाद्या दुव्याशी भेसळीचे उद्योग चालतात, याची राज्याच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सरकारी खात्याला आणि अन्न व औषध प्रशासनालाही जाणीव असते. प्रचंड मागणी आणि अपुरे दुग्धोत्पादन यांमुळे भेसळ केली जाते असा एक समज असला, तरी ते भेसळीमागील मुख्य कारण नाही. कमी उत्पादन खर्चात जास्त नफा मिळविण्याची हावरट प्रवृत्ती हेच कोणत्याही भेसळीचे खरे कारण असते. त्यामुळेच फुकटातच उपलब्ध होणारे कोणतेही पाणी मिसळून दुधाचे माप वाढविले जाते, मग पाणीमिश्रित दुधातील स्निग्धांश टिकविण्यासाठी त्यात सोयाबीन तेल, वनस्पती तूप किंवा कोणतेही खाद्यतेल मिसळले जाते. त्यामध्ये लॅक्टोज, साखर, ग्लुकोज किंवा पीठ, मैदा किंवा साबणाची पावडर, युरियासारख्या घातक पदार्थाचाही वापर केला जातो. मुंबईत दूधभेसळ करणाऱ्या धंदेवाईक टोळ्या आहेत, पण सतत स्थलांतर करून त्या पोलीस आणि प्रशासनाच्या हातावर तुरीच देत असतात. प्लास्टिकच्या पिशवीतील दूध इंजेक्शनच्या सिरिंजने काढून घेऊन सिरिंजनेच त्यामध्ये पाणी मिसळले जाते. नफ्यासाठी हपापलेल्या भेसळखोरांना आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची काळजी नसते. या भेसळीमुळे असंख्य आजार आणि व्याधीही जडतात, त्यामुळे दूधभेसळ हा चिंतेचा मुद्दा बनला आहे. महाराष्ट्रात चार-पाच वर्षांपूर्वी बनावट रासायनिक दूधनिर्मितीचा एक मोठा धंदा उद्ध्वस्त झाल्यानंतर रासायनिक आणि अपायकारक पदार्थाची भेसळ कमी झाल्याचा दावा केला जात असला तरी राज्यात भेसळयुक्त दुधाचा सुळसुळाट आहे, हे राज्य सरकारनेही प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयासमोर मान्य केले आहे. गेल्या सहा वर्षांत अनेक उपाय योजूनही दूधभेसळ रोखण्यात सरकारला यश आलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने दूधभेसळीच्या विकृत धंद्याबद्दल चिंता व्यक्त करून हा धंदा रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची समज काही राज्यांना दिल्याने देशाला भेडसावणारी दूधभेसळीची समस्या आता ऐरणीवर आली आहे. महाराष्ट्रासह सर्वच राज्यांना हा धंदा मोडून काढण्यासाठी कंबर कसावीच लागेल. न्यायालयाच्या दणक्याने का होईना, जनतेवर सुरू असलेला हा जीवघेणा संथ विषप्रयोग थांबविण्यासाठी आता तरी गांभीर्याने हालचाली होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
‘शुभ्रते’तील ‘काळे’बेरे!..
कृषीप्रधान भारताचे झपाटय़ाने शहरीकरण होऊ लागल्यानंतर ग्रामीण संस्कृती हा जेमतेम पर्यटनापुरता विषय राहिल्याने, अनेक नैसर्गिक बाबींची ओळख आजकाल केवळ पुस्तकातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातूनच होऊ लागली आहे. सकाळचा ताज्या दुधाचा चहादेखील प्लास्टिकच्या थैलीतील दुधामुळेच मिळू लागल्यामुळे तर दुधाचा नैसर्गिक स्रोतदेखील कालांतराने समजावून सांगावा लागेल, अशी परिस्थिती आजच दिसू लागली आहे.
First published on: 04-07-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darkness of white