ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी जालीयनवाला बागेला भेट देऊन ९५ वर्षांपूर्वी तेथे झालेल्या हत्याकांडाबद्दल खेद व्यक्त केला. मात्र माफी मागितली नाही. ब्रिटिशांच्या व्यवहारी नीतीला धरून हा सगळा कार्यक्रम पार पडला. ब्रिटिश पंतप्रधानांच्या या कृतीबद्दल भारतातून समाधानाचा स्वर उमटला. साहेबाने हुतात्म्यांसमोर गुडघे टेकले, अशी वक्तव्ये झाली. भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या सत्ताधीशांना जालीयनवाला बागेसमोर येऊन श्रद्धांजली अर्पण करावीशी वाटली याचे अप्रूप वाटणे साहजिक असले तरी कॅमेरून यांनी गुडघे टेकले म्हणून आपण फुशारून जाण्याचे कारण नाही. त्यामागची गणिते वेगळी आहेत. जालीयनवाला बागेतील हत्याकांड ही तशी विस्मृतीत गेलेली घटना. इतिहासात दोन कारणांमुळे ती महत्त्वाची ठरते. ब्रिटिश राजसत्तेमध्ये दडलेली दडपशाही व आसुरी क्रौर्याचे झगझगीत दर्शन तिने घडविले आणि गांधींचा ब्रिटिश अनुनय त्या वेळेपासून संपला. जालीयनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या शेकडो निरपराध्यांना जनरल डायरने अमानुष पद्धतीने व योजनापूर्वक ठार केले. हंसराज या ब्रिटिश हस्तकाने सभा आयोजित केली होती. संतापाचा सार्वत्रिक उद्रेक होऊ लागल्यावर हंटर कमिशन नेमण्यात आले. या कमिशनसमोर हंसराजला न आणता त्याला मेसापोटॅमियाला पाठवून देण्यात आले होते. हंटर कमिशनला समांतर अशी चौकशी समिती काँग्रेसने नेमली व त्याचे काम महात्मा गांधींकडे आले. चौकशी समितीचा अहवाल कसा असावा याचा उत्तम नमुना म्हणून गांधींनी तयार केलेल्या या अहवालाकडे बोट दाखविण्यात येते. ब्रिटिश पार्लमेंटला या अहवालातील एकही वाक्य खोडून काढता आले नाही. ब्रिटिश साम्राज्याचे गुणगान गाणाऱ्या विन्स्टन चíचल यांनाही, राज्य करणे म्हणजे हत्याकांड करणे नव्हे असे उद्गार पार्लमेंटमध्ये काढावे लागले ते हा अहवाल वाचून. हे सर्व झाले असले तरी ब्रिटिशांनी डायर व त्याच्या सहकाऱ्यांवर फारशी कारवाई केली नाही. उलट पुढील कित्येक वर्षे त्याच्या कारवाईचे उघड समर्थन केले जात होते. जालीयनवाला हत्याकांडानंतर स्वातंत्र्यलढय़ाला तीव्र धार चढली. मात्र अहंमन्य ब्रिटिशांनी त्याबद्दल कधीच खंत व्यक्त केली नव्हती. ती आता केली. कारण व्यापारी वृत्तीच्या ब्रिटिशांना भारतातील गुंतवणूक जशी खुणावत आहे तशीच ब्रिटनमधील पंजाबी व हिंदी मतपेढीही हवी आहे. अर्थप्राप्ती व सत्ताप्राप्ती यासाठी साहेब गुडघे टेकत आहेत, मानवी हक्कांची पायमल्ली झाली म्हणून नव्हे. हत्याकांडाची कारणमीमांसा करताना गांधींनी ब्रिटिश सत्तेबरोबर पंजाबमधील भारतीयांच्या काही चुकांकडेही लक्ष वेधले होते. त्यांची सत्यनिष्ठा एकांगी नव्हती व त्याबद्दल त्यांना टीकेचे धनीही व्हावे लागले, परंतु यामुळेच त्यांच्या अहवालाचे वजन वाढले. अशी सत्यनिष्ठा ब्रिटिश सत्ताधाऱ्यांकडे तेव्हा नव्हती व आताही नाही. म्हणून अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ नये म्हणून चौकशी सुरू असतानाच माफीचा कायदा घाईघाईने करण्याचे डावपेच ब्रिटिशांनी तेव्हा टाकले व आजही ते माफीची भाषा करीत नाहीत. साहेबाला आपण गुडघे टेकायला लावले नसून अर्थकारण साधण्यासाठी साहेबाने ते टेकले आहेत हे आपण समजून असावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा