लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भाजपमध्ये वाजू लागलेल्या दुंदुभींचे सूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कानी पोहोचले, ते एका परीने बरेच झाले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये स्तुतिसुमनांची उधळण हाच मुख्य कार्यक्रम साजरा होत असेल, तर ज्या मतदारांनी परिवर्तनाच्या अपेक्षेने विजयाची माळ गळ्यात घातली, त्यांच्या अपेक्षांचे काय होणार याची चिंता करणे हे मातृसंस्था या नात्याने रा. स्व. संघाचे कर्तव्यच होते. तसेही, लोकसभेतील विजयानंतर भाजपमध्ये पक्षांतर्गत ज्येष्ठतेला फारसे महत्त्व उरलेले नसल्याने, पक्षातील अन्य कोणासही कोणाचे कान उपटण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. त्यामुळे, पक्षात खऱ्या अर्थाने ‘एकचालकानुवर्तित्वा’चे पर्व सुरू झाल्याचे या मातृसंस्थेला खरे म्हणजे समाधान वाटावयास हवे. पण संघविचाराने संघटना चालविणे आणि या विचारांच्या पायावर उभा केलेला राजकीय पक्ष चालविणे यांतील फरकाचे बहुधा संघाच्या नेतृत्वास अजूनही नेमके भान आहे. त्यामुळेच, संघानेदेखील काळानुरूप ज्याचा आग्रह सैल केला, त्या एकचालकानुवर्तित्वाची परंपरा संघप्रणीत भाजपमध्ये नव्याने सुरू व्हावी हे कदाचित संघाला मानवणारे नसावे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नरेंद्र मोदी यांनी त्यांचे एकमेव विश्वासू असे सहकारी असलेले नवनिर्वाचित राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर स्तुतिसुमने उधळीत त्यांना ‘मॅन ऑफ दि मॅच’ असा बहुमानाचा किताब बहाल केला. त्याच वेळी, पक्षाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यावरही मोदी यांनी स्तुतिसुमने उधळली. पक्षाच्या राष्ट्रीय व्यासपीठावर असा ‘अहो रूपम्, अहो ध्वनि’चा सोहळा सुरू असताना, ज्या मतदारांनी हा क्षण दाखविला, त्यांचा विसर पडला की काय, अशी शंका पक्षातील बुजुर्गाच्या मनात कदाचित डोकावलीदेखील असेल. पण ती व्यक्त करण्याची संधी हाती नसल्याच्या जाणिवेने अनेक जणांनी मौन पाळले असेल. आपल्या कुशीत वाढलेल्या आणि आपल्या मुशीत घडलेल्या मुलांची घुसमट आईशिवाय अन्य कोणासही नेमकी जाणता येत नाही, हे वैश्विक सत्यच आहे. त्यामुळे, अशा मौनातूनही व्यक्त होणारी घुसमट नेमकी जाणून संघप्रमुख मोहनराव भागवत यांनी नेमक्या शब्दांत समजुतीच्या शब्दांची कडू मात्रा पाजली. पक्षात उफाळलेली ‘स्तुतिपर्वाची साथ’ या मात्रेने आटोक्यात यावी. कोणा व्यक्तीमुळेच एवढा मोठा विजय मिळाला असे मानणे चूक आहे, असे सुनावताना भागवत यांचा रोख या स्तुतिपर्वातील कौतुकसोहळ्यावरच केंद्रित होता हे स्पष्ट आहे. जनतेला, मतदारांना परिवर्तन पाहिजे होते, म्हणूनच ते घडले असून कोणाही नेत्यामुळे हा बदल घडलेला नाही, असे सांगताना भागवत यांनी पक्षाला आणि पक्षाच्या प्रत्येक नेत्यालाही भानावर आणण्याची जबाबदार नैसर्गिक भूमिका निभावली आहे. मुळात, परिवर्तनासाठी सज्ज व्हा, अशी पहिली हाक संघाच्या व्यासपीठावरूनच, सरसंघचालक भागवत यांनीच दिली होती, त्यामुळे, भाजपने सुरू केलेल्या मतपेटीच्या लढाईची बीजे संघानेच रोवली होती. जनतेने त्याला साथ दिली. आता या विजयाचे श्रेय कुणी नेत्यांना तर कुणी पक्षाला देत असले तरी खरे श्रेय जनतेचेच आहे, असे भागवत म्हणतात. ‘अहं दंडय़ोस्मि’ अशी धारणा असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. थेट राजकारणात संघाचा सहभाग नसतो असे भागवत सांगत असले, तरी भाजपच्या राजकारणावर संघाची ध्वजा फडफडत असते, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच, सत्ताप्राप्तीनंतर सरकार चालविणाऱ्या या पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी संघाच्या व्यवस्थेतून एक फळी भाजपच्या मांडणीत दाखल झाली. युक्तीच्या चार गोष्टी सांगतानाच, कान पकडण्याचा अधिकारही आपल्याकडे अबाधित आहे, हे संघाने पुन्हा एकदा भाजपला दाखवून दिले आहे.