तुम्ही दोघे आणि दोघांचे पक्ष आणि संघटना एकत्र येणार का नाही, बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर होणार की नाही याचीही चर्चा मला करायची नाही. तुम्ही एकत्र आलात किंवा वेगळेच राहिलात किंवा आघाडी केलीत तरी आणि बाळासाहेबांचं स्मारक कुठेही झालं, तरी जे विषय आणि प्रश्न शिल्लकच राहतील ते तुमच्या, शिवसैनिकांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विचारार्थ सादर करण्याचा हा प्रयत्न.. व्यंगचित्र/अर्कचित्राचं रूपांतर एका विलोभनीय पूर्णचित्रात करण्याचं काम तुमच्या हातून घडो.
एक महिन्यापूर्वी बाळासाहेब आपल्यामधून गेले. त्यांचं निधन आकस्मिक वा अकाली झालं नसलं, तरी हा आघात मोठा होता. तुम्ही दोघांनी, ठाकरे परिवाराने  आणि मुंबईत जमलेल्या लाखो शिवसैनिकांप्रमाणेच संपूर्ण    देशभरातून टी.व्ही. पाहणाऱ्यांनी ज्या संयमाने आणि धैर्याने हा आघात पचवला त्याचीही दाद दिली पाहिजे.
मात्र या पत्राचा तो एकमेव उद्देश नाही. तुम्ही दोघे आणि दोघांचे पक्ष आणि संघटना एकत्र येणार का नाही, बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर होणार की नाही याचीही चर्चा मला करायची नाही. तुम्ही एकत्र आलात किंवा वेगळेच राहिलात किंवा आघाडी केलीत तरी आणि बाळासाहेबांचं स्मारक कुठेही झालं, तरी जे विषय आणि प्रश्न शिल्लकच राहतील ते तुमच्या, शिवसैनिकांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विचारार्थ सादर करण्याचा हा प्रयत्न आहे.
काही दिवसांपूर्वी श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी झालेल्या भेटीत कै. बाळासाहेब, त्यांची प्रकृती, शिवसेना, १९७४ मध्ये शिवाजी पार्कवर उभारलेल्या पहिल्या भव्य ‘शिवसृष्टी’साठी बाळासाहेबांनी केलेले साहाय्य या सर्व आठवणी बाबासाहेबांनी जागवल्याच; बोलता बोलता ते असेही म्हणाले की, ‘बिंदा, उद्धव, राज ही सगळी मुलं तिथे रोज खेळायला यायची, बाळासाहेबांचं सगळं कुटुंबच तिथे असायचं!’
बाबासाहेबांचे ते शब्द माझ्या लक्षात राहिले. विचार केल्यानंतर असं जाणवलं की शिवसेना आकार घेत होती. प्रथम बाळासाहेबांच्या मनात नंतर त्यांच्या ब्रशमधून व्यंगचित्रांत, त्यानंतर भाषणात-लेखनात, त्यानंतर प्रत्यक्ष संघटना व नंतर मुंबई महानगरातली एक प्रमुख राजकीय शक्ती या क्रमाने तिची वाढ झाली होती. त्या काळात तुम्ही दोघे वयाने खूपच लहान होता व वयात आल्यावर तुम्ही शिवसेनेचा वारसा घेतलात त्या वेळी तिने महाराष्ट्रभर स्वत:ची प्रतिमा आणि स्थान निर्माण केलं होतं.
मी मात्र त्या वेळी नुकताच कळत्या वयात आलेलो होतो. ‘मार्मिक’च्या प्रत्येक अंकाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांत मीही होतो. मुखपृष्ठ, मधल्या दोन पानांवरची व्यंगचित्रं, स्पष्ट आणि आक्रमक संपादकीय, ‘जब तोप मुकाबिल है, तो अखबार निकालो’ हा नारा, मार्मिक टीका-टिपणी करणारे इतर लेख कै. द. पां. खांबेटय़ांची ‘शुद्ध निषाद’ या नावाने ‘सिनेप्रिक्षान’ या सदरात येणारी धमाल चित्रपट परीक्षणे, संपूर्ण अंकाच्या मांडणीवर-सजावटीवर उमटलेली कल्पक व्यंगचित्रकाराची छाप ही ‘मार्मिक’ची खास ताकद असायची.
संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळाला होता; मात्र मराठी माणूस होता तिथेच होता. आर्थिक ताकद गुजराती-मारवाडी-पंजाबी-सिंधी भांडवलदारांनी काबीज केली होती आणि प्रशासनात तामीळ-मल्याळी मोठय़ा प्रमाणावर घुसले होते. मराठी माणूस सुशिक्षित असला तर मास्तर-कारकून, अर्धशिक्षित असला तर गिरणी कामगार आणि अशिक्षित असला तर भाजीवाला, रामा गडी, व्हीटी-दादर स्टेशनवर हमालच राहिला होता. पोलिसातही कॉन्स्टेबल (सखाराम)च्या पातळीवरच राहिला होता.
हा लँडस्केप आफ्टर द  बॅटल ज्या क्षणी बाळासाहेबांना अस्वस्थ, उद्विग्न करून गेला, त्याचक्षणी शिवसेनेचा जन्म झाला. एकीकडे राजकीय यश पण राज्यकर्ता काँग्रेस पक्ष मात्र अमराठी शक्तींच्या ताब्यात, कम्युनिस्टांना कामगार सोडता (गिरणगावाबाहेर) कुणाशीही देणे घेणे नाही, समाजवादी नेहमीप्रमाणेच विखरून पडलेले, (तेव्हाच्या) जनसंघाला व्यापक जनाधार नाही या राजकीय पोकळीमध्ये एक सशक्त मराठीवादी, निर्भय पर्याय यशस्वी होईल हे बाळासाहेबांनी ओळखलं. ‘मार्मिक’ला विशिष्ट दिशा मिळाली. हताश जनसमूहाला दोनच गोष्टी हलवू शकतात. उज्ज्वल भूतकाळाची स्मृती आणि वर्तमान काळातल्या दु:ख-दैन्याचं खापर फोडण्यासाठी एक ‘तिरस्कार विषय’ (hate symbol)ही हिटलरची यशस्वी रणनीती बाळासाहेबांनाही भावली. शिवाजी आणि सेना या शब्दांची काँग्रेसवाल्यांनी फारकत करून टाकली होती. तेच शब्द त्यांनी एकत्र आणले, ‘मार्मिक’च्या प्रत्येक अंकात दाक्षिणात्यांच्या आक्रमणाचे धडधडीत पुरावे द्यायला सुरुवात केली. काँग्रेस, संयुक्त महाराष्ट्राचे धुरिण, कम्युनिस्ट या सर्वावर आपल्या ब्रशने फटकारे ओढले. प्रथम मुंबई  महापालिका जिंकली. नंतर कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यातून वामनराव महाडिक अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झाले. हा झंझावात मराठी माणसांना जिवंत करून गेला. मराठी बुद्धिजीवी, कलावंत, साहित्यिक यांपासून ते कामगार, भाजीवाले, घरगडी यांच्यापर्यंत एक सलग फळी उभी राहिली.
बाळासाहेबांनी तीनच पावले उचलली. मुंबईत मराठी माध्यमवर्गाला हाताशी धरलं, मुंबईबाहेर मराठेतर बहुजन समाजाला आणि महाराष्ट्राबाहेर व्यापक हिंदू समाजाला त्यांनी साद घातली. मुंबईत ‘अमराठी भाषक’, महाराष्ट्रात ‘काँग्रेसवाले’ आणि देशभरात मुसलमान यांची तिरस्कार प्रतीके बनवली. मुंबई-महाराष्ट्रात ‘शिवशाही’ आणि देशपातळीवर ‘हिंदुत्व’ ही दोनच आवाहने त्यांनी केली. महाराष्ट्रात काँग्रेसशी लढणं सोपं नव्हतं आणि देशपातळीवर हिंदुत्वाचं आवाहन पोचवण्याचे काम संघ परिवार, जनसंघ, भाजप पूर्वीपासूनच करत होता. त्यामुळे देशपातळीवर बाळासाहेबांच्या हाताला फारसं काही लागलं नाही. महाराष्ट्रात मराठेतर बहुजन समाजातले कार्यकर्ते आणि भरकटण्याच्या बेतात असलेले बेकार पण धाडसी, बिनधास्त तरुण यांच्या बळावर विधानसभेच्या निदान पंचवीस टक्के जागा शिवसेनेने गेल्या काही निवडणुकीत जिंकल्या. माझ्या एका इंग्रजी लेखात मी शिवसेनेचं वर्णन ‘कल्पक कुंचल्यातून उतरलेलं राजकीय व्यंगचित्र/ अर्कचित्र’ असं केलं होतं. व्यंगचित्र वा अर्कचित्र काढताना प्रमाणबद्धता महत्त्वाची नसते, चेहऱ्याचा/ शरीराचा एखादा भागच मोठा दाखवला जातो. इंदिरा गांधींचं नाक, यशवंतराव/शरदराव यांचे फुगलेले गाल व गरगरीत सुटलेली पोटं, कम्युनिस्टांचे पिंजारलेले केस वगैरे बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमधून वारंवार दिसलेच होते. शिवसेनेतही एकीकडे शिवशाहीच्या भव्य (पण संदिग्ध) स्वप्नाचे गडद रंग आणि दुसरीकडे हिटलरच्या ज्यू द्वेषाप्रमाणे अमराठी भाषकांच्या तिरस्काराचे भडक रंग त्यांनी शिवसेनेसाठी वापरले. शिवशाही म्हणजे काय हे कधी मांडलं नाही, काँग्रेसवाल्यांना हटवा म्हणजे शिवशाही अवतरेल हे तंत्र कधीच यशस्वी होणार नव्हतं. जसं इंग्रज घालवा म्हणजे हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने एकत्र राहतील हे गांधींचं सूत्र पराभूत झालं होतं. काँग्रेसला हटवून शिवसेना सत्तेवर आली म्हणजे मराठी माणसाच्या जीवनात नेमका काय फरक पडणार होता तेही त्यांनी कधी सांगितलं नाही. मनोहर जोशींच्या काळात ‘माझे मंत्री काँग्रेसवाल्यांपेक्षा नक्कीच कमी भ्रष्ट आहेत’ असं लंगडं समर्थन त्यांना करावं लागलं होतं. ‘माझ्याकडे लोकसभेत आवर्जून पाठवावेत असे उमेदवार जवळपास नाहीत’ अशी कबुलीही बाळासाहेबांनी दिली होती. एकदा तर ‘मराठी माणूस निर्भय, कर्तबगार व्हावा म्हणून मी शिवसेना उभी केली पण मास्तर, कारकून आणि शिपायाच्या नोकरीशिवाय मराठी माणसांनी माझ्याकडे इतर काहीही मागितलं नाही!’ असे हताश उद्गारही बाळासाहेबांनीच काढले होते. स्वत:चं अपयश मोकळेपणाने कबूल करण्याइतका उमदेपणा त्यांच्याकडे होताच.
उद्धव आणि राज, हे व्यंगचित्र/ अर्कचित्र बदलण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. मग ते एकत्र येऊन करा किंवा वेगळे राहून! या अर्कचित्राचं पूर्णचित्र (portrait) करूनच तुम्हाला बाळासाहेबांचं काम पुढे न्यावं लागेल! बाळासाहेबांच्या आठवणी जनमानसात ताज्या आहेत तोवर काही तात्कालिक यश मिळेलही पण प्रत्येक प्रश्नावर कल्पक, आकर्षक मात्र इतरांशी पूर्णपणे फटकून असणारी रणनीती आखून जमणार नाही, आपण आणि आपला पक्ष सोडून उरलेले सगळे षंढ, भेकड आहेत, असा अभिनिवेश बाळासाहेबांना शोभला, त्यांच्या प्रेमामुळे जनतेने तो चालवूनही घेतला पण यापुढे ते कार्ड चालणार नाही. तुम्ही बाळासाहेब होऊ शकणार नाही हे तर खरंच पण त्याची गरजही आता उरलेली नाही.
मधल्या काळात खूप बदलही झाले आहेत. मराठी-अमराठी संघर्ष मध्यमवर्गात फारसा उरलेला नाही. आंतरभाषिक, आंतरप्रांतीय विवाहाचं प्रमाण वाढतं आहे. मराठी-बिहारी, हिंदु-मुसलमान हे विरोध समाजाच्या एका लहान थरापुरतेच उरले आहेत. कायम स्वरूपाच्या नोक ऱ्या मागे पडून कंत्राटपद्धत आली आहे. नोकरीच्या गुलामगिरीपेक्षा संगणकाच्या मदतीने आपण आहोत तिथूनच उपजीविका करण्याकडे सर्वाचाच वाढता कल आहे. ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’, ‘भ्रष्टाचारी राज्यकर्ते/नोकरशहा’ हे नवे ‘तिरस्कार विषय’ म्हणून पुढे आले आहेत. भाषा किंवा प्रांत ही संघर्षरेषा पूर्णपणे पुसली गेलेली नाही पण ती धूसर होत जाणार हे निश्चित आहे. केवळ नकार, तिरस्कार आणि धूसर स्वप्ने यांच्या बळावर राजकारण फार काळ यशस्वी होत नाही. ‘सहन/गय करणार नाही’, ‘खपवून/ चालवून घेणार नाही’, ‘जगणं अशक्य करू’ ‘हटवा, पळवून लावा’ अशा घोषणा/भूमिका विशिष्ट लोकांबद्दल घेणंही फार काळ चालणार नाही. कै.  बाळासाहेबांनी उभं केलेलं काम वाढवताना त्यात बदल करावे लागतील. सतत चढा सूर ठेवून भागणार नाही. सुरुवातीच्या काळात शिवसेनेने मुंबई शहरामध्ये अनेक सकारात्मक उपक्रम केले होते, त्यांना उजाळा द्यावा लागेल. बाळासाहेबांचा हुकूमशाहीवर विश्वास होता; मात्र तुमची पुढची वाटचाल जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाहीतच होणार आहे, हे तुम्ही जाणताच.
व्यंगचित्र/अर्कचित्राचं रूपांतर एका विलोभनीय पूर्णचित्रात करण्याचं काम तुमच्या हातून घडो; त्यासाठी माझ्या शुभेच्छा!
कळावे,