दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन यांना आपण न्यायालयांत हजर करू शकलो नाही. याकूब माफीचा साक्षीदार ठरला आणि अपराधीदेखील. परंतु त्याच्या अपराधासाठी फाशी दिली जाताना जो उन्माद दिसतो आहे, त्यातून प्रत्ययास येतो तो अशक्त व्यवस्थेने घेतलेला सूड..
सशक्ताने अशक्तावर लादलेल्या िहसेचा प्रतिवाद अशक्त दुसऱ्या अशक्ताचा बळी देऊन करतो. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीवरून गेले काही दिवस आपल्याकडे साचलेला उन्माद हेच सिद्ध करतो. सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब करून तो वाढेल अशीच व्यवस्था केली. कोणताही उन्माद साठला की त्यात पहिला बळी विवेकाचा जातो. गेले काही दिवस या विषयावर आपल्याकडे जे काही सुरू आहे, त्यातून हेच दिसून आले. हे बॉम्बस्फोट हे भारतावर लादलेले युद्धच होते, हे मान्य. २५७ निरपराधांचे प्राण त्यात हकनाक गेले हे कोणी अमान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे युद्ध छुपे होते आणि पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेने ते लादले होते, हेही निश्चितच मान्य. त्यास जबाबदार असणाऱ्यांना, निरपराधांचे प्राण घेणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे हे तत्त्वदेखील मान्य. परंतु म्हणून याकूब मेमन यांस फासावर लटकवायला हवे, हे मान्य करण्यास विवेकी जन राजी होणार नाहीत. का, ते समजून घ्यावयाचे असेल तर याकूब यास फाशी देणे म्हणजे देशप्रेम सिद्ध करणे असा जो उन्माद वातावरणात दिसतो, तो दूर करून याचा विचार करावा लागेल.
तसा तो करताना सर्वात प्राथमिक मुद्दा हा की, भारताविरोधात लादल्या गेलेल्या युद्धाचा सूत्रधार याकूब मेमन नाही आणि नव्हताही. ही बाब तेव्हाही स्पष्ट झाली होती. याकूबची शरणागती आणि त्याचे भारतात परतणे हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गुप्तचर खात्याचे प्रमुख बी रामन यांनी तेव्हाही ही बाब ठसठशीतपणे मांडली होती. परंतु दिवंगत नरसिंह राव यांच्या अशक्त सरकारने ती अव्हेरली. त्या सरकारातील गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांनीदेखील या बॉम्बस्फोटातील याकूबच्या सहभागाबद्दल साशंकता व्यक्त केली होती. तरीही शासन व्यवस्थेच्या साहय़ाने न्यायपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. याचे कारण या गंभीर गुन्हय़ांतील खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचण्यात आलेले – आणि अद्यापही येत असलेले – अपयश. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा आयएसआयने हे दहशतवादी हल्ले घडवून आणले. दोन घटकांची साथ आयएसआयला याप्रकरणी मिळाली. एक दाऊद इब्राहिम आणि दुसरा टायगर मेमन. हे मेमन कुटुंबीय मूळचे गुजरातेतील आणि आद्य व्यवसाय चांदीची तस्करी. यातूनच त्यांच्यातील उचापत्या साहसवादी टायगर याचा संबंध दाऊद आणि आयएसआय यांच्याशी आला. बाबरी मशिदोत्तर कारवायांसाठी आयएसआय संघटनेस भारतात उत्पात घडवण्यासाठी हस्तकांची गरज होतीच. ती भागवण्यास टायगर तयार झाला. आज तीवर विश्वास ठेवणे अनेकांना जड जाईल परंतु अधिकृत वस्तुस्थिती अशी आहे की टायगरच्या या पाताळयंत्री उद्योगाची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना नव्हती. याकूब या कुटुंबाचा सनदी लेखापाल. त्यासही आपला थोरला भाऊ नक्की कोणत्या उद्योगात मग्न आहे, हे माहीत नव्हते. त्याचे चोरटे व्यापार कुटुंबीयास ठाऊक होते. परंतु त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे, हे कुटुंबास ज्ञात नव्हते. त्याचमुळे बॉम्बस्फोट चौकशीत जेव्हा टायगर मेमन याचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आयएसआयच्या कचाटय़ात असलेल्या मेमन बंधूंच्या वडिलांनी कुटुंबात सर्वादेखत टायगरला चोपले. त्याच वेळी आपली कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी आणि टायगर वगळता अन्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यात पुढाकार होता थोरले मेमन आणि याकूब याचा. परंतु तसे करणे धोक्याचे होते. कारण ही सर्व मंडळी आयएसआयच्या तावडीत होती. आयएसआयने त्यांची अेाळख पुसून टाकली होती आणि त्यांना बनावट पारपत्रेदेखील देण्यात आली होती. तरीही भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्यांचा छडा लावून त्यांच्याशी संधान बांधले. यातही पुढाकार होता याकूबचाच. काठमांडू येथून पाकिस्तानात परतण्याच्या प्रयत्नात असताना याकूब अलगदपणे भारतीय गुप्तचरांच्या हाती लागला. काहींच्या मते तो अपघात होता तर एका वर्गाच्या मते याकूबने पत्करलेली ती शरणागती होती. तो पाकिस्तानात परतला असता तर आयएसआयने टायगरप्रमाणेच त्याच्याही मुसक्या आवळल्या असत्या, हे उघड आहे. त्यामुळे तो योग्य वेळी भारताच्या हाती लागला. तो स्वत:हून शरण आला की आपण त्यास पकडले याबाबत संदिग्धता असली तरी एक बाब निर्वविाद सत्य आहे. ती म्हणजे आपल्या सरकारने त्यास त्या वेळी अभय देण्याचे वचन दिले आणि त्या बदल्यात त्याने बॉम्बस्फोटातील पाकिस्तानी सहभाग उघड करावा, असा हा करार होता. याचा अर्थ याकूब हा माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही. परंतु याचा अर्थ असा निश्चितच नाही की मुख्य आरोपीचा भाऊ आहे आणि मुख्य आरोपी हाती लागणे शक्य नसल्याने जो कोणी हाती लागला त्यास फासावर लटकावले जावे.
या अर्थाकडे आपल्या व्यवस्थेने पूर्ण दुर्लक्ष केले. यात टाडा न्यायालयदेखील आले. या न्यायालयाने तांत्रिक बाबींची पूर्तता न करताच याकूब यास फाशी देण्याचा निर्णय दिला. सरकार आणि अन्य या संदर्भात इतके उतावीळ होते की याकूबची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे हे माहीत असतानाही त्यास फासावर लटकावण्याचा निर्णय झाला. खेरीज, तो निर्णय मिरवणे हे राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याचा हमखास आणि सुलभ मार्ग होता. हे मिरवणे किती बालिश आणि उबग आणणारे असते ते उज्ज्वल निकम यांच्यासारख्याकडे पाहून लक्षात यावे. परंतु आपल्या या दिखाऊ आणि बटबटीत कथित देशप्रेमामुळे नसíगक न्यायाचे किमान तत्त्वदेखील पायदळी तुडवले जात आहे याकडे या याकूबला फाशी द्या म्हणणाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. अशक्त व्यवस्थेने दुसऱ्या अशक्तावर सूड उगवण्याचा तो प्रयत्न होता. आपण टायगर मेमनला पकडू शकत नाही, दाऊदचा केसही वाकडा करू शकत नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे. तेव्हा त्या वास्तवास भिडण्यापेक्षा लटकावून टाका याकूबला फासावर, असा हा विचार होता आणि तो घृणास्पदच होता आणि आहे. इतकेच जर आपण देशप्रेमाने भारलेलो आहोत तर अशाच गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल झालेल्या संजय दत्त यास सवलती का, हा प्रश्न आपणास पडत नाही. संजय दत्त याने तर शस्त्र लपवून ठेवले होते. त्या तुलनेत याकूबचा गुन्हा किरकोळ ठरतो. परंतु तरीही त्यास फाशी दिली जावी यावर सामान्यांचे एकमत होते त्यामागील कारण याकूबचा धर्म तर नव्हे, याचे उत्तर ज्याने त्याने स्वत:च्या मनाशी तरी प्रामाणिकपणे द्यावे. दुसरे असे की त्यास फासावर लटकावल्यास आपली न्यायव्यवस्था शासकीय तालावर नाचते, असे चित्र निर्माण होऊ शकते. याचे कारण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांवरील आरोप सिद्ध होऊनही त्यांना वाचवण्यात शासकीय व्यवस्थेस आनंद वाटतो, हे कसे? असो.
हा सगळा विसंवाद सर्वोच्च न्यायालयामुळे टळेल अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. तसे झाले नसते तर काही माथेफिरू वगळता विचारी जनांच्या मनात सर्वोच्च न्यायालयाविषयी यामुळे अभिमानच वाटला असता यात शंका नाही. याकूब फासावर गेल्यामुळे टायगर मेमन आणि आयएसआय यांचाच विजय होणार आहे. याकूब याने भारतात परतण्याचा विचार सोडावा यासाठी टायगरकडून प्रयत्न होत होते. गांधीवादी विचार करून परत जाशील, पण भारत सरकार तुला दहशतवादी ठरवील असे टायगरने त्यास सुनावले होते. याकूब फासावर गेल्यामुळे आपल्या व्यवस्थेवर केलेले भाष्य सत्य ठरते. यामुळे यापुढे आपल्या देशासाठी कोणीही माफीचा साक्षीदार होणार नाही. ही दुहेरी शोकांतिका आहे. विद्यमान उन्मादापुढे ती जाणवणार नसली तरीही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा