‘सचिनची ती विश्रांती, बाकीच्यांना डच्चू!’ हे अविनाश वाघ यांचे पत्र (लोकमानस, ९ मार्च) वाचून खेद वाटला. त्यांची प्रतिक्रिया ही नाण्याची एकच बाजू बघण्यासारखी आहे. माझ्या मते वर्तमानपत्रांवर असा आरोप लावणे चुकीचेच आहे. एक वाचक म्हणून त्यांचा मुद्दा बरोबर असेलही, पण उदाहरणादाखल सचिनसारख्या प्रतिभावान खेळाडूबद्दल अनादर दाखवणे सर्वस्वी चुकीचेच आहे. अविनाश वाघ यांचे विधान स्वत: सेहवाग यांनादेखील पटण्यासारखे नसावे. मुळात जेव्हा संघनिवड होते तेव्हा स्वत: खेळाडूदेखील आपली उपलब्धता बोर्डाला सादर करत असतात. सचिननेदेखील यापूर्वी अनेकदा आपल्या अनुपलब्धतेविषयी बोर्डाला कळविल्याचे आपण अनेकदा वर्तमानपत्रात वाचले आहे.
एखाद्या खेळाडूची निवड जर त्याच्या खराब कामगिरीमुळे होत नसेल तर त्याबद्दल डच्चू हा शब्द वापरला तर त्यात गर किंवा अपमानास्पद असे काही असावे असे मला वाटत नाही. बहुध सचिनसारख्या असामान्य, गुणवंत व संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडूवर अशी वेळ पूर्वी कधी ओढावली नसावी म्हणूनच त्याच्याबद्दल असा शब्दप्रयोग वापरण्याची संधी वर्तमानपत्रवाल्यांना मिळालीच नसेल.
– उदय श्री. सावंत. (अबू धाबी)

आकांक्षांना पायबंद कोण घालते?
‘आज’च्या आकांक्षांसाठी हा अग्रलेख वाचला, (८ मार्च) परंतु मोठ्ठे काही तरी ‘सत्य’ हुलकावणी देते आहे या लेखात. शासन-प्रशासन सुधारायला हवेच. त्याबद्दल वादच नाही, परंतु इतरही कोणाकडे तरी दोष जातो व ते सत्य स्वीकारून सुधारल्याशिवाय कोणतीही यंत्रणा सुधारणे शक्य होईल असे वाटून घेणे हा भ्रमच ठरेल.
जेव्हा स्त्रियांवर, पुरुषांवर, तृतीयपंथीय व्यक्तींवर बलात्कार होत असतो तेव्हा तो कोणी केलेला असतो? पुरुषांनी! बलात्कारित व्यक्तीचे िलग कोणतेही असो, बलात्कार करणारा मात्र अनेकदा पुिल्लगी ‘पुरुषच’ असतो.
शासन-प्रशासन यामधील ७० टक्के ते काही ठिकाणी ८० टक्के लोक हे कोण असतात? पुरुष! ते बलात्कार करणारे, स्त्रियांचा अनादर करणारे तर नसतात, पण मग दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर वर्मा समितीने केलेल्या शिफारसींमध्ये लग्नांतर्गत होणाऱ्या बलात्काराच्या मुद्दय़ाचा समावेशच केला न जाणे, लग्नानंतर शारीरिक संबंधांसाठी तिची इच्छा विचारात घेण्याची गरज पुरुषप्रधान शासन-प्रशासन व्यवस्थेला न वाटणे व त्याच व्यवस्थेकडून बलात्कारविरोधी आवाज उठवणाऱ्यांवर स्त्रियांच्या प्रसाधनाचा उल्लेख करून त्यांचा पुन:पुन्हा अपमान करणे, पीडित स्त्रीलाच दोषी धरणे व नकळत अत्याचार करणाऱ्यास पाठीशी घातले जाणे, हे का घडते? त्याचे कारण काय? स्त्री संदर्भात पुरुषांची एकी, विकृत पुरुषी मानसिकता की संस्कृती-विकृती याबद्दल भारतीय पुरुषांच्या मनात असलेला पारंपरिक घोळ? तो घोळ क्लीअर व्हायला हवा.
परिस्थिती बदलायला हवी, पण ती कशी बदलणार? आजच्या मुलींना लग्नाआधीच शिक्षण पूर्ण करून करिअर निवडणे का महत्त्वाचे वाटते, त्यावर कोणी भाष्य करीत नाही. लग्नानंतर त्या मुलीच्या आयुष्यात कोण येतो? पुरुष! अजूनही विशीतच मुलींनी लग्न केले, तर लग्नानंतर तिच्या आयुष्यात येणारा नवरा नामक प्राणी तिला पुढचे शिक्षण, करिअरसाठी आवडते क्षेत्र निवडण्याची संधी मिळू देईल की नाही? त्यासाठी आवश्यक असणारी मदत करेल? पाठिंबा देईल की नाही व मदत पुरवली तर त्याच्या बदल्यात तिच्याकडून संपूर्ण आयुष्यभर गुलामीचीच अपेक्षा करेल की काय? याबद्दल तिचे मन साशंक का आहे? लग्नाचे वय पुढे ढकलण्यामागे दोष मुलींचा नाही, पण ज्यांचा आहे ते पुरुष मात्र काखा वर करून मुलींनाच लग्न नकोय, असे म्हणत उभे आहेत.
आज जगात अनेक धर्म आहेत. धार्मिक कारणांवरून जगातील पुरुषांमध्ये अनेकदा झगडे, दंगली किंवा युद्धेसुद्धा झालेली आहेत, परंतु स्त्रियांना कनिष्ठ मानण्यात मात्र कोणात एकवाक्यता दिसते? जगभरातील पुरुषांत!
त्यामुळे शासन-प्रशासन यंत्रणेत सुधारणा व्हावयाची असेल तर पुरुषांनी पुस्तकी ज्ञान बाजूला ठेवून ‘सत्य’ स्वीकारणे व वास्तवानुसार स्वत:स बदलणे व व्यक्तिस्वातंत्र्यात स्त्रीलासुद्धा सामील व्हायचा हक्क आहे हे मान्य करणे, हेच योग्य होईल. अन्यथा लेखात म्हटल्याप्रमाणे आज तुम्ही बदला, अन्यथा उद्या आम्ही तुम्हाला बदलायला भाग पाडू, हे जे आजच्या स्त्रीचं म्हणणं आहे ते हे खरे करून दाखवण्याची वेळ जर स्त्रियांवर आली तर त्याचे समाजावर जे बरे-वाईट परिणाम  होतील त्याला जबाबदारही पुरुषच असतील.
– राधिका जे.

उच्च मूल्यांना टाटा!
टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख रतन टाटा यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा(?) भेट घेतल्याचा फोटो पहिला (लोकसत्ता ९ मार्च). लोकशाहीमध्ये कोणी कोणालाही भेटू शकतो, पण ही भेट मला वेगळी वाटते. भ्रष्टाचार, अनुचित व्यापार- व्यवहार यापासून टाटा उद्योग समूह नेहमीच दूर असतो. मध्यंतरी नीरा राडिया प्रकरणात  थोडे वादळ उठले होते, पण ते अपवादात्मक मानावे लागेल. राज ठाकरे हे काही नावाजलेले उद्योगपती नव्हेत, ना त्यांचे नाव व्यावसायिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध आहे. आता टाटा समूह पुन्हा विमानसेवा उद्योगात येत आहे, त्यात काही अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून ही भेट आहे का? मनसे या पक्षाचे जे उपद्रवमूल्य आहे त्यामुळेच ही भेट असावी या शंकेला जागा आहे. ही भेट मला एका उच्च व्यावसायिक मूल्य जपणाऱ्या उद्योग समूहाची झुंडशाहीसमोरची शरणागती वाटते.
– सागर पाटील, कोल्हापूर

अडवाणींची कबुली
भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून भाजपने लोकांचा काही प्रमाणात भ्रमनिरास केला असून ही बाब अतिशय क्लेशकारक आहे, अशी कबुली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दिल्याचे वृत्त (लोकसत्ता, १० मार्च ) वाचले. अडवाणी यांनी हे लक्षात घ्यावे की, ते स्वत: या गोष्टीला जबाबदार आहेत. २००४च्या निवडणुकीच्या वेळी सहयोगी पक्षांच्या विशेषत: नितीशकुमार व शरद यादव यांच्यासाठी त्यांनी भाजपच्या िहदुत्वाच्या मुद्दय़ाला मुरड घातली. त्यांचा हा वैचारिक भ्रष्टाचार हा आíथक भ्रष्टाचारापेक्षा अक्षम्य आहे.
– विद्याधर कुलकर्णी

ढोंगी पाकिस्तानी पंतप्रधानांचे स्वागत कशाला?
पाक पंतप्रधान रझा परवेझ अश्रफ यांनी नुकतीच अजमेर दग्र्याला भेट देऊन तेथे माथा टेकला या कार्यक्रमाचे जे वृत्त (दि. १० मार्च) वाचायला मिळाले त्यामुळे केवळ संताप व्यक्त करण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही हे स्पष्ट झाले. वास्तविक अजमेर दग्र्याचे प्रमुख दिवाण झैनुल आबेदिन अली खान यांनी आपल्या देशाच्या सनिकांचे शिरकाण करणाऱ्या देशाच्या प्रमुखाचे स्वागत न करण्याचा अत्यंत उचित निर्णय घेतला होता. अजमेरमधील वकील असोसिएशन, मार्केट असोसिएशन व सर्व सामान्य जनतेने बंद पळून अश्रफ यांचा निषेध केला असताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मात्र त्यांचे स्वागत त्यांना मेजवानी देऊन का केले हे कळत नाही. पाक सनिकाच्या भ्याड कृत्यामुळे व एकंदरीतच दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानशी नरमाईचे धोरण स्वीकारणार नसल्याचे आपल्या पंतप्रधानांनी ८ मार्च रोजी लोकसभेत स्पष्ट केले होते, पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील परराष्ट्रमंत्र्यांनी मात्र अश्रफ यांचे स्वागत करून अगोचरपणा केला आहे. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत ‘अतिथी देवो भव’ या आपल्या परंपरेशी जुळणारे असले तरीही आपल्या शहिदांच्या आत्म्याला काय वाटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांना पायदळी तुडवले गेले हे विसरता येणार नाही आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांनी व सलमान खुर्शीद  यांनी देशाची माफी मागावी, कारण अश्रफ यांनी अजमेरला येऊन ढोंगीपणाचा कळसच गाठला आहे. ‘जगात शांतता नांदावी व पाकिस्तानची भरभराट व्हावी’ अशी नोंद त्यांनी अजमेर येथील नोंदवहीत केली आहे. ही अत्यंत चीड आणणारी नोंद आहे. कथनी आणि करणी यातले अंतर दाखवणारी आहे, म्हणून ती निषेधार्हच आहे.
– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

गरिबांचा कॉम्रेड गेला!  
संयुक्त राष्ट्रांना अमेरिकेच्या कचाटय़ातून बाहेर काढा, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या शिखर बैठकीतच ठामपणे मांडणारा (संदर्भ : ‘नवे काही घडवू’- लोकसत्ता, ७ मार्च) तसेच खनिज तेल ही आमच्या देशाची संपत्ती आहे आणि तिचे काय करायचे ते आम्ही ठरवू, असे अमेरिकेला ठणकावून सांगणारा, लोकशाही समाजवादी विचारसरणीचा व लॅटिन अमेरिकेच्या एकत्रीकरणाचा पुरस्कर्ता चावेझ हा एक अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष होता. अत्यंत साधे आणि लोकांत सहजपणे मिसळणारे हे व्यक्तिमत्त्व होते.
चावेझ यांच्या विरोधात महासत्तेने अनेक वेगवेगळ्या प्रकारे राजकारण केले. मात्र लोकांच्या असलेल्या पािठब्यावर ते त्यांना पुरून उरले. अमेरिकेसारख्या महासत्तेशी टक्कर घेणारा आणि जगभरच्या गरिबांना मित्र, सहकारी वाटणारा नेता या जगातून निघून गेला आहे.
– प्रतीक बुट्टे पाटील, जुन्नर