सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेबीने सहारा समूहाची बँक खाती गोठवल्याची बातमी सर्व वृत्तपत्रांतून वाचनात आली होती. आश्चर्य म्हणजे त्यानंतर सुमारे १५-२० दिवसांनी अनेक मोठय़ा वृत्तपत्रांतून सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी संपूर्ण पानभर जाहिराती देऊन सेबीच्या अध्यक्षांना आमने सामने येऊन मीडियातून चर्चा (म्हणजे सवालजबाब) करण्याचे आव्हान दिले होते.
आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना प्रश्न असा पडतो की, जर सर्व बँक खाती गोठवली गेली आहेत, तर मग या जाहिरातींचे लाखो रुपये कुणी दिले? कुठल्या बँक खात्यातून दिले गेले? त्या खात्याशी सहारा समूहाचा काय संबंध होता? नसेल तर अशा प्रकारे कुणाच्या तरी वतीने दिलेल्या जाहिरातीचे पैसे प्रदान करणे हे ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट-२००२’ नुसार चौकशी पात्र प्रकरण होत नाही का?
सुब्रतो रॉय यांनी खासगी बँक खात्यातून हे जाहिरातीचे बिलाचे पैसे दिले का? मग ही खाती का गोठवण्यात आली नाहीत? असे अनेक असंख्य प्रश्न उराशी बाळगून मजसारखे सामान्य नागरिक हे जग सोडून जातील, पण उत्तरे मिळणे कठीण वाटते. सुरेश कलमाडींसारखे महारथी तुरुंगात जाताच आपल्याला स्मृतिभ्रंश झाला आहे म्हणून सुटकेचा अर्ज करतात! नंतर ही स्मृती अचानक ठीक होते, कारण सरकारच त्यांना एका समितीवर नेमते! प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच!!
-रेखा सावंत, दहिसर (पूर्व)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा