दिल्लीच्या प्रगती मैदानातील तब्बल आठ मोठ्ठी दालनं भरून, पुस्तकांचे २१०० स्टॉल लागले आहेत.. यापैकी ११०० प्रकाशक भारतीय आहेत, तर ब्रिटन/ अमेरिका / फ्रान्स / जर्मनी यांच्यासह पोलंड, चीन, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, बांगला देश अशा देशांचा आणि ‘युनेस्को’ सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचाही स्टॉल इथं आहे आणि तिथंही अर्थातच, पुस्तकं!
येत्या रविवापर्यंत (२२ फेब्रुवारी) हा ‘नवी दिल्ली जागतिक पुस्तक व्यापार मेळा’ सुरू राहील. हा मेळा जागतिक असला, तरी तो व्यापारापुरताच. म्हणजे, विविध प्रकाशक इथे एकमेकांच्या पुस्तकांचे हक्क विकत घेतात, त्यातूनच इंग्रजी वा फ्रेंच पुस्तकं मराठी/ हिंदी वगैरे भाषांत येतात. हिंदी प्रकाशकदेखील अन्य भारतीय भाषांच्या प्रकाशकांशी हक्कव्यवहार करण्यात पुढे असतात, असं यंदाच्या ‘राइट्स टेबल’मध्ये दिसलं. हा मेळा अर्थातच कोणत्याही वयाच्या पुस्तकप्रेमींसाठी (मोठय़ांना तिकीट २० रुपये) खुला असतो
जर्मनीतला फ्रँकफर्टचा पुस्तकमेळा हा जगात सर्वात मोठा आणि व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचा. त्या मानानं दिल्लीचा जागतिक पुस्तकमेळा लहानच, पण २०१३ पूर्वी दर दोन वर्षांनी भरणारा दिल्ली-मेळा आता (फ्रँकफर्टप्रमाणेच) दरवर्षी भरतो. यंदा सलग तिसऱ्या वर्षी, दिल्लीच्या पुस्तकमेळय़ानं वाढ कायम ठेवली. मुख्य म्हणजे, काही प्रकाशकांचीही झालेली भरभराट यंदा दिसली. उदाहरणार्थ, दिवंगत नाटककार प्रा. गो. पु. देशपांडे यांचे पुत्र सुधन्वा देशपांडे यांनी स्थापलेल्या ‘लेफ्टवर्ड’ प्रकाशनाचा छोटासा ‘स्टँड’ (म्हणजे स्टॉलपेक्षा सहापटींनी कमी आकाराची, फक्त एकच भिंत आणि छोटंसं टेबल असलेली जागा) २०१३ मध्ये, तर यंदा ‘लेफ्टवर्ड’चा ‘स्टॉल’ होता.. म्हणजे, दोन वर्षांत हे प्रकाशन सहापटींनी वाढलं, असं मानायला ‘जागा’ होती!
ऑक्सफर्ड आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसचे स्टॉल नेहमीच मोठे असतात. १६ किंवा २० स्टॉल एकत्र जोडून उभारलेले भलेमोठे स्टॉल, हे पेंग्विन, रूपा, रोली बुक्स, सेज, हॅचेट, सायमन अँड शूस्टर आदी प्रकाशकांचं वैशिष्टय़च असतं. लोक भाबडेपणानं पेंग्विनच्या स्टॉलवरच अधिक गर्दी करताहेत, पेंग्विनही त्यांच्यासाठी ‘कापडी बांधणीत अभिजात पुस्तकं’ वगैरे खास आवृत्त्या विक्रीस तयार ठेवून आहेत, असं यंदाही दिसलं. पण ‘पॉप्युलर’ किंवा ‘ज्योत्स्ना’ सारखे इंग्रजीसह मराठीतही ठसा उमटवणारे प्रकाशकसुद्धा गर्दी खेचतातच. यापैकी ज्योत्स्नानं तर पुढल्या वर्षी ‘पॉप्युलर’प्रमाणेच दोन-तीन स्टॉल जोडायला हवेत, इतकी गर्दी त्यांच्या एकखणी स्टॉलवर असते.
अन्य मराठी प्रकाशक एकत्रितपणे एक स्टॉल इथं मांडतात, अगदी नेटानं! त्या स्टॉलवर फक्त मराठीच पुस्तकं असतात.. पण यंदा त्यांना अधिकच शोधावं लागत होतं. यातला तक्रारपात्र भाग असा की, ‘मेळा दर्शिका’ किंवा ‘फेअर डिरेक्टरी’ दरवर्षीप्रमाणे यंदाही निघाली, पण यंदाच्या डिरेक्टरीत ‘आसामी’ / ‘उडिया’ वगैरे भाषांतल्या प्रकाशकांचा निराळा निर्देश (भाषावार प्रदर्शक-यादीत) होता आणि मराठीचा मात्र नाही.
इंग्रजी पुस्तकांतल्या दर्दीना, आपलं वाचन केवढं कमी आहे अशी नम्र करून सोडणारी जाणीव जगातल्या कोणत्याही ठिकाणचा पुस्तकव्यापार मेळा देतच असतो. दिल्लीचा मेळा त्याला अपवाद नाही. पण दिल्लीत एक ‘दिल्लीकर ग्राहकवर्ग’ पुस्तक-खरेदी कशी करतो, तिथेही हल्दीरामच्या दुकानातलाच माहौल दिल्लीकर कुटुंबं कसा उभा करतात, हेही दिसतं. लखनऊ, चंडीगढ.. अगदी भोपाळपासून फक्त पुस्तक-खरेदीसाठी आलेले ग्रंथप्रेमी मुकाटपणे पुस्तकं पाहाताहेत, न परवडणाऱ्या पुस्तकांची नावं टिपून ठेवताहेत, हे आशादायी चित्रही इथं दिसतं.
दिल्लीच्या या मेळय़ाला समजा महाराष्ट्रातून पुस्तकप्रेमी गेलेच तर त्यांना काय मिळेल? एक म्हणजे, मेळय़ाचे आयोजकच असलेल्या ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ची भरपूर पुस्तकं. दुसरं, दिल्लीतल्या संगीत नाटक अकादमी, प्रकाशन विभाग, साहित्य अकादमी, ललित कला अकादमी किंवा ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय कला-अभ्यास केंद्र’ सारख्या संस्थांची उत्तमोत्तम (पण सहसा दुकानात न मिळणारी) पुस्तकं.. बाकी इंग्रजी पुस्तकं इंटरनेटवरून मागवता येतील म्हणा, पण हिन्दीतलं प्रकाशनवैविध्य चाट पडायला लावेल.. मध्य प्रदेशच्या ‘एकलव्य’ संस्थेनं ग्रामीण मुलांसाठी केवढी पुस्तकं काढलीत, हे पाहून मराठीप्रेमींना शरमही वाटेल.. जे अन्य कुठे पाहायलाही मिळणार नाहीत, अशा (उदाहरणार्थ, कुडिअट्टम नृत्यशैलीचा उद्गम आणि विकास, नागालँडमधील अंगामी भाषेतल्या कथा..) विषयांवरली पुस्तकं इथं दिसतील, विकत घेता येतील.
स्पर्धा परीक्षा, अभ्यासपूरक पुस्तकं यांना अर्थातच जबर मागणी असते; पण तो भारतीय पुस्तकबाजाराचा चेहरा आहे. धडपडून विविध विषयांवरली पुस्तकं प्रकाशित करणारे हिंदीसह सर्वच भारतीय भाषांतले प्रकाशक आणि आजवर तरी पुस्तकांमध्ये हयगय न करणाऱ्या सरकारी संस्था, हा भारतीय पुस्तकबाजाराचा आत्मा आहे, हे इथं दिल्लीत लक्षात येतं.. त्या धडपडीची स्पंदनं या मेळय़ात सगळीकडे नाही दिसत; पण शोधली तर सापडतात किंवा न शोधता अवचितही एखादेवेळी दिसतात!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा