जबाबदारीने पत्रकारिता करणाऱ्यांना जणू एक शापच आहे. तो असा की वाईट बातमीला जेवढे बातमी-मूल्य असते, तेवढे चांगल्या बातमीला नसते. तक्रार जोरदारपणे व्यक्त करायची आणि तडीला नेण्यासाठी काही करायचे म्हणताच, ते कसे अशक्य आहे हे सांगायचे, असा हा बिनकामाचा तक्रारखोरपणा वाढला आहे. एकूणच संभाषणांतून वा माध्यमांतून ऊरबडवे, खापरफोडे आणि बागुलबुवा या मंडळींची सध्या चलती आहे. असे का होते व सतत का चालू राहते?
काही कारणे साधी व मानसशास्त्रीय आहेत. जसे की, आपण उभे आहोत त्या स्टॉपवर बस येता येईना आणि समोरच्या उलट दिशेच्या स्टॉपवर भराभर येतायेत हा अनुभव जास्त वेळ (जास्त वेळा नव्हे) भोगल्याने लक्षात राहतो. या उलट, आपल्या स्टॉपवर गेलो तर बस उभीच असा आनंददायक प्रसंगही घडतो, पण तो कमी वेळ (कमी वेळा नव्हे) भोगल्याने विसरला जातो. एखादे अपयश येण्याची शक्यता असल्यावर अगोदरच ‘अंगण वाकडे’छाप दावा करून ठेवलेला बरा वाटतो. जबाबदारी टाळण्यासाठी, सवलत मिळवण्यासाठी संकट वाढवून सांगितले जाते, अगदी अटेन्शन सीकिंगसाठीसुद्धा तक्रारखोरपणा केला जातो. तक्रारखोरपणाचे असे बरेच मानसिक फायदे (?) सांगता येतील.
अशा वरवरच्या कारणांसोबत काही खोलवरची सांस्कृतिक कारणेही लक्षात घेतली पाहिजेत. आपल्या विश्वकल्पनेतच एक अंगभूत अशी उतरती कळा आहे. हिंदू परंपरेत एक मिथक फारच घातक आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही एका ‘कल्पा’तील युगे गुणवत्तेने उतरत्या क्रमाचीच असणार हे ठरलेलेच! आणि त्यातही एकेका युगात त्या त्या युगातला ऱ्हास चालू असणारच. युग अगदीच मरायला टेकले की ईश्वर एखादा अवतार घेऊन त्याला शेवटची धुगधुगी आणणार. कलियुगाच्या शेवटी प्रकरण इतके हाताबाहेर गेलेले असणार की प्रलय घडवून कल्प संपविलेलाच बरा असेच त्याला वाटणार. प्रलयामुळे पुढच्या कल्पाची सुरुवात होणार ती सर्वाधिक उन्नत अवस्थेत अर्थात सत्ययुगाच्या आरंभिबदूवरून! म्हणजे अशी संधी कधीच नाही की काळाच्या ओघात क्रमाक्रमाने उन्नती होईल आणि या उन्नतीत मनुष्याचा, त्याच्या कर्तृत्वाचा हात असेल! तसे पाहता हीच जर नियती असेल तर कशाहीविषयी तक्रार करण्याला काही अर्थही नाही आणि उपयोगही नाही. पण आपण स्थिती बिघडत असल्याला आधार म्हणून नियतीवादी मॉडेल वापरतो आणि तक्रारीचे खापर मात्र मनुष्यावर फोडतो. मनुष्य म्हणजे अर्थात स्वत: नव्हे. इतर, परका, शत्रू, अपवित्र, सैतानी वगरे. खापर फोडण्यासाठी कोणाला बळीचा बकरा करायचे याची निवड केली की तुम्हाला जणू एक राजकीय विचारसरणीच गवसल्यासारखे वाटू लागते. राजकीय विचारसणी म्हणवून घेणाऱ्या प्रवाहांकडे पाहिले तरी ‘मुख्य-शत्रू कोण’ या बिंदूभोवती त्यांची बांधणी झाल्यासारखी दिसेल.
सुधारणा होण्यानेच त्यांतील त्रुटींचेही भान येते
जग हे तक्रार करण्याजोगे असतेच. ते तसे होते, आहे आणि राहीलही. पण ते सतत सुधारते आहे. सुधारणेबरोबरीने अपेक्षाही वाढतात, किंबहुना कशाला आलबेल वा नॉर्मल म्हणावे याची मानके (स्टॅण्डर्डज्)च सुधारतात, म्हणून ते तक्रार करण्याजोगेच राहते.
साधी पेनकिलर्ससुद्धा नव्हती (सध्याच्या अर्थाने ‘हक्क’ही नव्हते, ‘दाद’ही नव्हती आणि ‘फिर्याद’ही नव्हती वगरे) असा काळ लक्षात घ्या. ‘सुख पाहता जवापाडे दुख पर्वताएवढे’ हे तुकोबांचे वचन, आध्यात्मिक अर्थ बाजूला ठेवला तरी, ऐहिक अर्थानेच नको इतके खरे होते. त्रिविध ताप, जिस्मानी, सुल्तानी आणि अस्मानी (क्रम ‘दासबोध’, भाषांतर माझे) विशेषत: गेल्या दोन शतकांत, वाढत्या वेगाने, लक्षणीयरीत्या कमी झाले. पण त्याच वेळी तक्रार असू शकते याला मान्यता मिळाली, ती व्यक्त करायला शब्द मिळाले, ऐकून घेणारी व्यासपीठे मिळाली व नोंदवण्याच्या सोयीही झाल्या. मुख्य म्हणजे निवारणाच्या शक्यता खुल्या झाल्या. म्हणजे तक्रारींची तीव्रता घटत असतानाच त्यांची अभिव्यक्ती व नोंदणी वाढत गेली. वाईट बातम्या वाढण्याची वाईट घटना वाढण्याशी गल्लत केली जात आहे.
पूर्वी बरे होते, हल्लीच सगळे बिघडले आहे. असे म्हणत राहण्याची प्रथाही पूर्वापार चालत आलेली आहे. या ‘पूर्वी आणि हल्ली’चे, भौगोलिक भाषांतर करून देशाच्या प्रगत भागात आणि अप्रगत भागात, इंडियात आणि भारतात, असेही कोणी वापरतात. हल्लीचे बरेच रोग म्हणे पूर्वी नव्हते. एक तर पूर्वी लोक, हल्लीचे काही रोग होण्याइतक्या वयापर्यंत, पोहोचतच नसत. ते ‘पटकी’नी(सुद्धा) लवकरच जात असत. त्यामुळेच ‘साठी-शांत’ ला जे महत्त्व होते ते आता ‘सहस्रचंद्रदर्शना’ला आले आहे. दुसरे असे की खास ‘हल्लीच्या’ रोगांचे तेव्हा निदान होत नसल्याने ते बोलीभाषेतल्या नावाने ओळखले जात व ‘काहीतरी निमित्त झाले’ अशा छापात बोलले जात.
हल्ली उदाहरणार्थ बलात्कार वाढलेत असे बोलले जाते. (एक तर गुन्ह्य़ांची संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिली पाहिजे, निव्वळ आकडय़ात नव्हे.) खरे असे आहे की कित्येक बलात्कार हे पूर्वी बलात्कार म्हणून गणलेच जात नसत, कारण ते करणाऱ्याला, तसा ‘अधिकार’च असे. मोठा दीर, गावचा जमीनदार, पूज्य अतिथी वगरे तर झालेच, पण ‘संमती-वय’लक्षात घेता खुद्द पतीसुद्धा! पीडित स्त्री ही स्वतच कलंकिनी ठरल्याने ती ते व्यक्तच करू शकत नसे. (हे आजही काही प्रमाणात खरे आहे.) आज खरोखर वाढले आहे ते एकुणातच गुन्हे उघडकीस येण्याचे, नोंदवले जाण्याचे प्रमाण व त्यांची बातमी होण्याचे, गुन्ह्य़ांचे नव्हे.
आशावादी असण्यात लाज कसली?
प्रत्यक्षात नवा काळ हा जुन्या काळापेक्षा चांगला असतो हे वास्तविकही आहे आणि तसा प्रत्ययही आपल्याला मिळत असतो. कुरकुर करताना आपण कितीही निराशावादी बोललो तरी मिळालेली संधी घेताना मात्र आशावादीच असतो. मग वरील, अधोगतीच दाखविणारे युग-कल्प मॉडेल हे आड का येत नाही? कारण हिंदू परंपरेतच एक फार चांगली गोष्टही आहे. ती अशी की, कोणतीच गोष्ट ‘गंभीरपणे न घेता अलंकारिक वा लक्षणार्थाने घ्यावी’, अशी सुटका आणि किरकोळ प्रायश्चित्त वगरे अनेक सुटका उपलब्ध आहेत.
पूर्वीपेक्षा हल्ली किती चांगले आहे हे सांगताना मॅट रिडले यांनी तासभर वाचनासाठी लागणारा प्रकाश ‘कमविण्यासाठी’ किती श्रम लागतात याचे गणित दिले आहे. तिळाचे तेल, कापसाची वात पद्धतीने तितका प्रकाश मिळवणे आणि अगदी लेटेस्ट कार्यक्षम दिव्याने तो मिळवणे याची किंमत देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमात, सहा तासांच्या श्रमांपासून अध्र्या सेकंदाच्या श्रमांपर्यंत सुधारणा झाली आहे. आपण लसीकरण घेतो, पण लुई पाश्चरला विसरतो. विजेवर चालणाऱ्या रेल्वेने जातो, पण मायकेल फॅरडेला विसरतो. फॅरडे कोणी साम्राज्यवादी गोरा साहेब नव्हता. तो शाळेतून काढून टाकलेला, रद्दीच्या दुकानात काम करता करता वाचन आणि विचार करणारा पोऱ्या होता. त्याने म्हटले आहे की, मी कोणीतरी शास्त्रज्ञ ठरल्यानंतर मला कळले की पोटभर जेवण म्हणजे काय असते! असो.
आजची परिस्थिती कमी भयंकर असली तरी तिच्यात आक्षेपार्ह असे खूपच काही आहे व तिच्यातील दुरितांच्या कठोर चिकित्सेला तसेच त्यांच्याशी लढण्याला पर्याय नाहीच. मात्र हे करताना उपाय हा मूळ रोगाहून दुरवस्थेत ढकलणारा नाही ना? हा प्रश्न सतत जागता ठेवावा लागेल. संतुष्ट वाटण्याचा प्रश्नच नाही. मात्र तुलना ही अगोदरची स्थिती आणि नंतरची स्थिती यात केली पाहिजे. परिपूर्ण आदर्शाशी तुलना करू गेल्यास निराशाच पदरी येणार. आदर्श हे दिशादर्शक ध्रुव असतात, ताबडतोबीची उद्दिष्टे नव्हेत. ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ या चालीवर काहींना परिपूर्ण आदर्शापेक्षा कमी असे काहीही चालत नाही. (द बेस्ट इज द वर्स्ट एनिमी ऑफ गुड) किंबहुना अशा परिपूर्णतावाद्यांना सगळ्याच सुधारणा या थातूरमातूर वा मलमपट्टी करणाऱ्या वाटू लागतात. परिपूर्णतावाद ही आणखी एक अप-धारणा झाली. या लेखमालेत अशा कित्येक अप-धारणा आपण पाहणार आहोत.
मात्र एक गोष्ट निश्चित आहे. सुधारणाविरोधी बोलणाऱ्यांच्या जीवनात काय फरक पडतो? यापेक्षा ज्यांच्या जीवनात थोडी फार सुधारणा होणार आहे, त्यांच्या जीवनात काय फरक पडतो? हे खरे महत्त्वाचे असते.
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com
* उद्याच्या अंकात इंग्रजी पुस्तकांविषयीचे ‘बुकमार्क’ हे विशेष पान.
निराशावाद : फक्त त्रागा करण्यापुरता
जग बदलते आहे, तोवर परिपूर्णतावादी निराशा आणि त्यातून आलेला त्रागा वाढत राहणारच.. कुरकुर करताना आपण कितीही निराशावादी बोललो तरी मिळालेली संधी घेताना मात्र आशावादीच असतो.. जबाबदारीने पत्रकारिता करणाऱ्यांना जणू एक शापच आहे. तो असा की वाईट बातमीला जेवढे बातमी-मूल्य असते, तेवढे चांगल्या बातमीला नसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-01-2013 at 12:47 IST
मराठीतील सर्व गल्लत , गफलत , गहजब ! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Depression only for aggression