योगेंद्र यादव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशात गोडसे-सावरकर आणि आंतरराष्ट्रीय मंचावर जाताच गांधीजींचे नाव घ्यायचे, अहिंसा वगैरे गांधीजींच्या प्रतिमेला दुरून हार घालताना आठवायचे आणि शेजारीच घडलेल्या झुंडबळीकडे दुर्लक्ष करायचे, हा गांधींचा मार्ग नव्हे..
सत्य आणि हिंमतवान अहिंसेचा हा मार्ग आज कदाचित काश्मीर खोऱ्यातील सामान्य स्त्री-पुरुषांपर्यंत आपणास घेऊन जाईल..
गांधीजींची १५० वी जयंती साजरी केली म्हणजे आपण नेमके काय केले? गांधीजींच्या आठवणीस उजाळा दिला? की त्यांच्या वारशाची पुन्हा हत्याच केली? गांधी जयंती दर वर्षी एखाद्या कर्मकांडाप्रमाणेच पार पाडली जाते, हे खरे आहे. तो प्रघात आजचा नव्हे. गांधी दूरच बरे, हे लक्षात ठेवूनच त्यांच्यावर फुले उधळली जातात वा त्यांच्या प्रतिमांना हार घातले जातात. मग महात्मा म्हणायचे, बापू म्हणायचे, गोडवे गायचे.. हे सारेदेखील जणू एखादे कर्मकांडच. गांधीजी कसे महानच होते हे अशा दिवशी सांगितले, की त्यांच्यासारखे होण्याच्या जबाबदारीतून आपण जणू मोकळे होतो! हे सारे, गांधीजींचे नाव घेऊन सत्तासंपादन करीत राहिलेल्या काँग्रेसच्या काळापासून सुरूच आहे. काँग्रेसच्या काळातही गांधी जयंती हा टिंगलीचा विषय बनला होताच. खादीविषयी नव्या पिढीला तिरस्कार वाटू लागला, तोही काँग्रेसच्याच काळापासून. गांधी हेच टिंगलटवाळीचा विषय ठरत चालले होते.. ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ यासारखे हिंदी वाक्प्रचार अगदी मराठीजनांच्याही परिचयाचे असतील, अशी माझी खात्री आहे.
मात्र आज या टिंगलटवाळीची शोकांतिका आपल्यासमोर घडू लागलेली आहे. गांधीहत्येत हात असल्याच्या संशयावरून ज्या संघटनेवर सरदार पटेल यांनी बंदी घातली होती, तीच संघटना आज देशाला गांधीजींच्या आदर्शाबद्दल भाषणे देते आहे. ज्या पक्षाचे खासदार गोडसेला प्रेरणास्थान मानतात, त्याच पक्षाचे शीर्षस्थ नेते गांधीजींना पुष्पांजली अर्पण करताना दिसतात, दाखवले जातात. बापूंविषयी आदर असल्याच्या जाहिरातीही दिल्या जातात. प्लास्टिकबंदी हे गांधीजींचेच स्वप्न असल्याचे सांगितले जाते आणि साफसफाईसाठी ठेवलेला कचरा झाडतानाचे फोटोही माध्यमे-समाजमाध्यमांपर्यंत पोहोचवले जातात. जो वैचारिक कचरा रात्रंदिवस पसरविला जातो आहे, त्याबद्दल सारेच गप्प. अहिंसा वगैरे गांधी जयंतीला आठवायचे आणि शेजारीच झालेल्या झुंडबळींविषयी अवाक्षर काढायचे नाही. सत्य, सत्याग्रह, सत्याचे प्रयोग हे गांधींसंदर्भात आठवायचे; पण मोठय़ा खुर्च्यावरून कोणकोणत्या असत्यांची पाठराखण चाललेली आहे, याकडे पूर्ण डोळेझाक करायची. याला शोकांतिका नाही म्हणायचे, तर काय म्हणावे?
असल्या दिखाऊ, खोटय़ा आदरापेक्षा गांधीजींना आदरांजली वाहण्याचे कर्मकांड बंदच करून टाकावे आणि खरोखरच इच्छा असेल तर या महात्म्याला ‘कर्माजली’ वाहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे असे काही करावे की, जे गांधीजींना आपण करावे असे वाटले असते किंवा गांधीजींनी आपल्याकडून करवून घेतले असते. सत्य, अहिंसा यांविषयी भाषणबाजी करण्याऐवजी सत्याच्या, अहिंसेच्या मार्गावर चालावे. गांधीजींचे आदर्श वगैरे कोरडय़ा आणि मोघम चर्चा सोडून देऊन आज परिस्थिती काय आहे, याकडे नीट पाहावे. गांधीजींचे विचार उच्च होते हे पुन:पुन्हा उच्चरवाने न सांगता, त्या विचारांना आजच्या परिस्थितीत आपणही भिडावे. त्या विचाराशी झगडावे, तर्कवितर्क लढवावेत.. त्यातून आपले स्वत:चे नवे विचार तयार होतील.. जसा गांधीजींनीही नवा विचार केला होता, तसे.
सुरुवात म्हणून आपण फक्त एवढेच स्वत:ला विचारू या की, गांधीजी आज असते तर कुठे असते? उत्तर शोधताना एवढे मात्र नक्की आठवू या की, १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, देशभर स्वातंत्र्योत्सव साजरा होत असताना राष्ट्रपिता कोठे होते. एवढे नक्की आठवू या की, त्या उत्सवात सहभागी न होता, गांधीजी त्या दिवशी कोलकात्यात हिंदू-मुसलमानांचे दंगे रोखण्याचा प्रयत्न का करीत होते? नौखालीमध्ये का फिरत होते?
याचे उत्तर जर मनोमन उमगले तर मग हेही सहज समजेल की आज गांधीजी असते, तर ते काश्मीर खोऱ्यात फिरत असते. सामान्य काश्मिरी स्त्री-पुरुषांचे दु:ख-यातना ऐकून घेण्याचा प्रयत्न गांधीजी करीत असते. याच खोऱ्यातून घरदार सोडून निघून जावे लागलेल्या काश्मिरी पंडित कुटुंबांची दु:खे, त्यांची कैफियतसुद्धा गांधीजींनी आधीच ऐकली असती. पण आजच्या परिस्थितीत गांधीजी असते, तर काश्मीरमध्ये त्यांनी प्राणांतिक उपोषणच सुरू केले असते. ज्यांना गांधीजींच्या मार्गावरून चालायचे आहे, तो मार्ग आज श्रीनगरकडे जाणारा ठरतो.
आज आपण गांधीजींना राष्ट्रीय अभिमानाची एखादी वस्तू असावी तसे जगापुढे मिरवतो. गांधीजींचा द्वेषच करणाऱ्या सावरकरांचा किंवा गोडसेचाही महिमा जे देशात असताना सांगतात, तेच परदेशात किंवा आंतरराष्ट्रीय मंचावर गेले की गांधीजींबद्दल बोलू लागतात. पण आज आपण ज्या प्रकारचे वर्तन करतो आहोत, ते गांधीजींना अभिमानास्पद वाटले असते का? स्वत:चे सारे आयुष्य हिंदू-मुस्लीम सलोख्यासाठी कारणी लावणाऱ्या गांधींना हिंदू आणि मुसलमान यांच्यात तिरस्कारच फैलावून त्याचा फायदा घेणारे राजकारण पाहून काय वाटले असते? ‘मी सनातनी हिंदू आहे’ असे अखेरच्या श्वासापर्यंत म्हणणाऱ्या गांधीजींना, आज सनातन म्हणून चाललेल्या कारवाया, हिंदू म्हणून चाललेला आक्रस्ताळी अतिरेक पाहून काय वाटले असते? स्वराज्याचे, ग्रामस्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या गांधींना आज आपल्या देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढतच चाललेली आर्थिक दरी पाहून कसे वाटले असते? गांधीजींना ज्याचा अभिमान वाटेल असा भारत निर्माण करणे, त्यासाठी प्रयत्न करणे, ही गांधीजींना खरी आदरांजली ठरेल. त्यालाच आपण ‘कर्माजली’ म्हणतो आहोत.
ही अशी कर्माजली देण्यासाठी अहिंसेचे तत्त्व सांभाळतानाच, संघर्ष कायम राखावा लागेल. ‘भित्रेपणाने अन्याय सहन करीत राहणारी अहिंसा मला नको’ हे गांधीजींचेच म्हणणे होते, हे आपण विसरता कामा नये. ‘एका गालावर थप्पड मारली की मग दुसराही गाल पुढे..’ असे आज करणारा गांधींचा अनुयायी म्हणता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाचा ठामपणे आणि हिमतीने प्रतिकार करण्याची धमक आज ज्यांच्यात आहे, तेच गांधीजींच्या मार्गावर आज चालू शकतील. ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ ही टिंगल विसरणे भाग पाडायचे, तर आज ‘मजबूती का नाम महात्मा गांधी’ हे आपल्या या धमकेने दाखवून द्यावे लागेल.
पण हे करणार कोण? गांधीजींच्या स्वप्नातला भारत उभारणे अद्याप बाकी आहे, ते काम कोण करू शकेल? ५० वर्षांपूर्वीदेखील हाच प्रश्न होता, तेव्हा राममनोहर लोहियांनी गांधीवाद्यांचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले होते : सरकारी, आश्रमी आणि कडूबेणे! सरकारी गांधीवादी म्हणजे गांधीजींचे ऊठसूट केवळ नाव घेऊन सत्तेचीच स्वप्ने पाहणारे तेव्हाचे काँग्रेसी नेते. आश्रमी गांधीवादी कर्मठपणे सूतकताई करणारे, खादी वापरणारे, पण संघर्ष विसरूनच गेलेले. गांधीजींच्या नामजपापुढे आश्रमींना आजची परिस्थिती दिसेनाशीच झालेली असते. लोहियांनी ज्यांना ‘कडूबेणे’ गांधीवादी म्हटले ते गांधीजींपासून आजच्या संघर्षांची प्रेरणा घेणारे, पण गांधीजींचे अनुकरण न करता आजच्या परिस्थितीप्रमाणे आपला संघर्ष-मार्ग निवडणारे लोक! गांधीजींच्या मंत्रापेक्षा संघर्षांचे तंत्र अंगीकारणारे लोक. लोहिया म्हणत की, गांधीजींचे सच्चे वारसदार हे सरकारी किंवा आश्रमी गांधीवादी नव्हेत तर ‘कडूबेणे गांधीवादी’च होऊ शकतात. आज अशा कडू बेण्याच्या गांधीवाद्यांचा शोध घेणे ही गांधीजींना खरोखरीची विचारांजली वाहणे ठरेल.
गांधी जयंतीचे सारे उत्सव तर एव्हाना पार पडले आहेत. यापुढेही गांधीजींच्या मार्गावर राहण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!