अहो, साहेब हा शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा नाही तर बँकांनी त्यांच्या कर्जाचा केलेला विमा आहे. तुम्हाला कसं समजून सांगावं कळत नाही.. पीक विमा योजनेबाबत मी हे टिप्पणीवजा वाक्य गेल्या वर्षांपासून आतापर्यंत अनेकांच्या तोंडून ऐकले आहे. २०१५पासून जय किसान आंदोलनातील सहकाऱ्यांसमवेत मी किसान मुक्तियात्रा काढली होती. त्या वेळी आम्ही पंजाब ते दिल्ली, कर्नाटक ते हरयाणा, मराठवाडा ते बुंदेलखंड हा भाग पिंजून काढला होता. आता या वेळी आम्ही तामिळनाडू व मध्य प्रदेशात मुक्तियात्रेचा मोर्चा वळवला होता. मध्य प्रदेशातील आमची भेट या वेळी महत्त्वाचीच ठरली. कारण अलीकडेच त्या राज्यातील मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारात पाच शेतकरी ठार झाले होते. ती घटना लक्षात घेऊन या वेळची किसान मुक्तियात्रा मंदसौर ते दिल्ली अशी होती. जिथे शेतकऱ्यांवर दुष्काळ व बाजारपेठ कोसळण्याची संकटे होती, त्याच भागातून आमची आताची यात्रा मार्गस्थ झाली. या वेळीही अनेक गावांत सभा झाल्या, प्रत्येक सभेत मी विचारत होतो की, कुणा शेतकऱ्याला विम्याची भरपाई मिळाली आहे का? तर अनेक लोकांनी पीक विमा हे शब्दच ऐकलेले नव्हते. काही किसान क्रेडिट कार्ड असलेले थोडे शिकलेले शेतकरी होते. त्यांच्या खात्यातून पीक विम्याचे प्रीमियम कापले गेले होते, ते त्यांना माहितीही होते. पण या सगळ्या सभांमध्ये मला पीक विम्याची भरपाई मिळाली असे सांगणारे एक-दोनपेक्षा जास्त शेतकरी भेटले नाहीत. शेतकऱ्यांशी बोलता बोलता हळूहळू मला पीक विम्याचा गोरख धंदा समजू लागला. जगात कदाचित असा हा पहिला विमा आहे, ज्यात विमाधारकाला काही विचारले जात नाही व सांगितलेही जात नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेतले आहे, त्यांच्या खात्यातून सक्तीने विम्याचे प्रीमियम कापले जाते. एवढेच नाही तर पैसे कापूनही त्यांना विमा पॉलिसीचा कुठला कागद कधीच दिला जात नाही. याचा अर्थ शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा विमा झाला आहे किंवा नाही याची गंधवार्ताही नसते. त्याला भरपाई मिळणार आहे की नाही याचाही पत्ता नसतो. अगदी चुकून त्याला पीक विमा केल्याचे समजले तरी त्याला भरपाई मिळत नाही, कारण विम्याच्या भरपाईसाठी अशक्यप्राय अशा अटी असतात. जर तुम्हाला विमा भरपाई मिळवायची असेल तर तुमच्या तहसील किंवा पंचायत क्षेत्रात किमान निम्म्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे हे सिद्ध करावे लागते हे तो बिचारा शेतकरी कसे करणार, असा प्रश्न आहे. मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे मला पीक विमा योजनेतील अडचणी समजू लागल्या होत्या, पण बँकेचे कर्ज असले तर जबरदस्तीने विम्याचा हप्ता कापून घेतला जातो हे नवीनच समजले. शेतकरी व शेतकरी नेते पीक विम्याबाबत ज्या अडचणी मांडत आहेत त्या खोटय़ा नाहीत हेही मला यात जाणवले. गेल्या आठवडय़ात पीक विम्याच्या काही सूचना किंवा अटी तसेच अहवाल जाहीर करण्यात आल्याने पीक विमा योजनेतील अनेक घोटाळे मला लक्षात आले. एकीकडे महालेखापरीक्षकांनी २०११ ते २०१६ दरम्यान पीक विमा योजनांचे जे लेखापरीक्षण केले होते त्याचा अहवाल संसदेत अलीकडेच मांडण्यात आला, तर दुसरी गोष्ट म्हणजे सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने पंतप्रधान पीक विमा योजनेचे मूल्यांकन करणारा एक अहवाल प्रकाशित केला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचे हे पहिलेच मूल्यांकन. त्यातच संसदेने या अधिवेशनात पंतप्रधान पीक विमा योजनेतील काही नवीन आकडे पटलावर मांडले. आता या तीन माध्यमातून पीक विम्याबाबत जी माहिती मिळाली, त्यात या योजनेत शेतकऱ्यांची कशी थट्टा होत आहे हे स्पष्टपणे उघड झाले असे मला वाटते.
पीक विमा योजनेचा गोरखधंदा
अहो, साहेब हा शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा नाही तर बँकांनी त्यांच्या कर्जाचा केलेला विमा आहे.
Written by योगेंद्र यादव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-07-2017 at 03:40 IST
मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on crop insurance scheme