शेतकऱ्यांचे आंदोलन आता एका नव्या युगात प्रवेश करीत आहे. गेल्या दीड महिन्यात शेतकऱ्यांमध्ये नवी शक्ती संचारली आहे व नवे नेतृत्व सामोरे आले आहे, त्याला नव्या संकल्पाची जोड आहे. पण त्याहीपेक्षा शेतकरी आंदोलनाचे बदलणारे स्वरूप महत्त्वाचे मानावे लागेल. शेतकऱ्यांची परिभाषा बदलते आहे, त्यांच्यात नवे नेते पुढे येत आहेत. शेतकरी आंदोलनाचे मुद्दे बदलत आहेत, त्यांची विचाराची पद्धतही आता वेगळी आहे. आज हे बदल सूक्ष्म पातळीवर जाणवत असले तरी शेतकरी आंदोलनाची दशा व दिशा ते आगामी काळात बदलू शकतात. आजचे शेतकरी आंदोलन स्वातंत्र्यापूर्वीच्या आंदोलनापेक्षा व ८०च्या दशकातील आंदोलनापेक्षा खूप वेगळे आहे, हे त्याचे वैशिष्टय़. इंग्रजांच्या राजवटीत शेतकऱ्यांचा विद्रोह हा ब्रिटिशांच्या शोषण करणाऱ्या कृषी व्यवस्थेच्या विरोधात होता. मोपला आंदोलन, चंपारण सत्याग्रह, बारडोली सत्याग्रह व तेभागा आंदोलन यांसारखी शेतकरी आंदोलने ब्रिटिश काळात झाली. त्या काळात ब्रिटिशांनी कृषी व्यवस्थेचे जे शोषण चालवले होते त्या विरोधात ती होती. मिठावरचा अन्यायकारक कर, निळीच्या शेतीतील अन्यायकारक धोरणे, जमीन कसणाऱ्याला किमान एकतृतीयांश वाटा देण्याची मागणी यावर ही आंदोलने झाली व त्यांनी शेतकऱ्यांना एक राजकीय ओळख त्या काळातच मिळवून दिली होती. स्वातंत्र्यानंतर तब्बल चाळीस वष्रे शेतकऱ्यांनी त्यांना स्वराज्यात न्याय मिळण्याची प्रतीक्षा केली, पण त्यांच्या सगळ्या अपेक्षा फोल ठरल्या. त्यानंतर कर्नाटकात ननजुन्दमस्वामी, महाराष्ट्रात शरद जोशी, उत्तर प्रदेशात महेंद्र सिंग टिकैत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनाचा नवा अध्याय सुरू झाला. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी आंदोलनांचा हा श्रीगणेशा होता. शेतकऱ्यांना किमान आधारभूत भाव मिळाला पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी यात होती. ज्यांना राजकारणात सत्तेचा वाटा मिळाला पण तरीही शेतकरी असल्याने आíथक समृद्धी मात्र मिळाली नाही, असे लोक या आंदोलनांचे नेतृत्व करीत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा