पंजाबचे सरकार, गुरुद्वारा प्रबंधनची सत्ता, सच्चा सौदा डेऱ्यासारखे धर्माचे व्यापारी, केंद्र सरकारचा अल्पसंख्याकविरोधी दृष्टिकोन, शेती व शेतक ऱ्यांच्या विरोधात उभी असलेली आर्थिक व्यवस्था ही पाचही कारणे पंजाबातील आजच्या असंतोषामागे आहेत..या ‘पाच बोटां’च्या पकडीपासून पंजाबला सुटका हवी आहे..

जेव्हा पंजाब हिंसाचाराने जळत आहे व होता, तेव्हा तेथील सत्ताधारी वेगळ्याच गोष्टीत मश्गूल होते. रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता, या प्रसिद्ध वाक्याप्रमाणे पंजाबात अकाली-भाजप सरकारबाबतही अशीच वाक्ये आता चर्चेत आहेत.
गेले काही महिने धुमसत असलेला पंजाबातील ज्वालामुखी आता फुटला आहे, त्याचा लाव्हारस रस्त्यांवर आला आहे. आधी, कापसाचे पीक बरबाद झाल्याने दु:खी झालेले शेतकरी रस्त्यावर उतरले होते व त्यांनी रेल्वे मार्ग रोखून आंदोलन केले. ते आंदोलन थांबत नाही तोच गुरू ग्रंथसाहेबच्या बदनामीच्या मुद्दय़ांवर पंजाबमध्ये गावागावांत लोकांनी रस्ता रोको आंदोलन केले. सरकारने पोलिसांच्या माध्यमातून गोळ्या झाडून उत्तर दिले, त्यात दोन लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतरच्या ‘भोग’ कार्यक्रमात अनेक लोक पंजाबात रस्त्यावर उतरले व ‘अकाली व पोलिसांना येथे प्रवेश निषिद्ध आहे’ असे फलक लावून मोकळे झाले.
यात पंजाबमधील शीख समाज विरोधात गेला आहे, पण त्यामध्ये हिंदू-शीख यांच्यातील तणावाची छाया नाही.
या घटनेकडे वरवर पाहता लोक बेचैन होतात ते अशामुळे, की पवित्र धर्मग्रंथाच्या अवमानाचा मुद्दा इतका संघर्ष कसा निर्माण करू शकत असेल हा प्रश्न त्यांना पडतो, ते खरेच आहे. धार्मिक भावनांचा हा उद्रेक आहे, पण पंजाबातील शेतकरी केवळ धर्माच्या प्रवाहात पालापाचोळ्यासारखे वाहून जाणारे नाहीत. पंजाबमध्ये शेतकरी मजुरांच्या जमिनींबाबत आंदोलनाची परंपरा जुनीच आहे. आज पंजाबात दहशतवादाच्या काळात १९८४ मध्ये होते तसे जीवघेणे वातावरण नाही, मग सगळा पंजाब रस्त्यावर का आहे..?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सरकारने या दंग्यांमध्ये परदेशी हात असल्याचा जुनाच मुद्दा मांडला आहे. एकाच दिवशी सर्व वृत्तपत्रांमध्ये विश्वसनीय सूत्रांच्या माहिती दिल्याच्या बहाण्याने पंजाबमधील दंग्यात व असंतोषात पाकिस्तानी ‘आयएसआय’ (इंटर सव्‍‌र्हिसेस इंटलिजन्स) या गुप्तहेर संघटनेचा हात असल्याच्या बातम्या देण्यात आल्या, त्याचे ‘पुरावेही मिळाल्या’चे ढोल पिटण्यात आले. या बातम्या सरकारने दिल्या होत्या हे वेगळे सांगायला नको. ही गोष्ट पहिल्याच दृष्टिक्षेपात हास्यास्पद वाटणारी आहे यात शंका नाही. आयएसआय पंजाबमध्ये खलिस्तानच्या नावाखाली आग लावण्याचे प्रयत्न सुरूच ठेवू शकते हे खरे. असे ऐकिवात येते, की आपल्याही गुप्तचर संस्था बलुचिस्तानात कुरापती काढत असतात. पण आपली रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिसिस विंग (‘रॉ’) ही संस्था बलुचिस्तानात स्वबळावर दंगे घडवू शकत नाही, तसेच आयएसआय ही त्यांची गुप्तचर संस्था लाखो लोकांना पंजाबमध्ये रस्त्यावर आणू शकत नाही. जर आयएसआयची तेवढी ताकद असेल, तर गेल्या पंचवीस वर्षांत त्यांना खलिस्तानचे आंदोलन पुनरुज्जीवित का करता आले नाही.. यात सत्य हे आहे, की कालचे अतिरेकी आज खलिस्तानच्या लढाईत नाहीत. ते आता आत्मसन्मान व सामाजिक कल्याणासाठीच्या लढाईत सहभागी आहेत. आज पंजाबची जी स्थिती आहे त्यात परदेशी हात आहे असे सांगणे म्हणजे पंजाबच्या जनतेचा अपमान आहे.
आज पंजाबच्या जनतेचा गळा कुणी घोटत असेल, तर ते आपलेच सत्ताधीश आहेत. या देशी हाताला पाच बोटे आहेत- एक अकाली-भाजप सरकार, दुसरे गुरुद्वारा प्रबंधनची सत्ता, सच्चा सौदा डेऱ्यासारखे धर्माचे व्यापारी, केंद्र सरकारचा अल्पसंख्याकविरोधी दृष्टिकोन, शेती व शेतक ऱ्यांच्या विरोधात उभी असलेली आर्थिक व्यवस्था.. आज पंजाबमध्ये जो संघर्ष चालू आहे तो राजनैतिक, सामाजिक , धार्मिक व आर्थिक सत्तेच्या विरोधात आहे. या रागाचे लक्ष्य बादल सरकार आहे. आज हेच सरकार भ्रष्टाचार, जोर-जबरदस्ती व ठोकशाही तसेच असंवेदनशीलतेचे प्रतीक बनले आहे. खालून वपर्यंत लाचखोरी चालू आहे. केबल टीव्हीपासून खासगी बस, अवैध वाळू उपसा, अमली पदार्थ व्यापारापर्यंत गैरप्रकार चालू आहेत, त्या सगळ्यासाठी लोक सरकारला दोष देत आहेत व एक-एक दिवस कसा तरी काढत आहेत, या सरकारच्या तावडीतून केव्हा सुटका होईल याची ते वाट पाहत आहेत. गेल्या काही वर्षांत इतक्या बदनाम सरकारचे उदाहरण शोधूनही सापडणार नाही.
आता लोकांचा राग या सरकारशी संबंध असलेल्या धर्मसत्तेवरही आघात करीत आहे. अकाली दलाने शीख धार्मिक सत्तेच्या केंद्रांवर कब्जा केलेला आहे. एका वेगळ्याच लोकशाही आंदोलनातून निर्माण झालेली शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आता पक्ष व परिवाराची मालमत्ता बनली आहे. ही स्थिती बराच काळ सहन केल्यानंतर पंजाबातील शीख लोक आता या राजकीय प्रतिनिधींच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. अकाल तख्तबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अकाली दलाचे राजकीय बस्तान बसवण्यासाठी बाबा राम रहीम यांना माफ करणे व गुरू ग्रंथसाहेबांच्या अवमानाचा मुद्दा यावरून सुरू असलेला संघर्ष आता धार्मिक-राजकीय सत्तेवरील अविश्वासाचे प्रतीक बनला आहे.
शीख डेरे जे गैरवर्तन करीत आहेत, त्याचा आताच्या संघर्षांशी संबंध आहे. हरियाणात सिरसा येथील डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम त्याचे प्रतीक म्हणून सामोरे आले आहेत. गेल्या काही वर्षांत या डेऱ्याने एक मोठे साम्राज्य उभे केले आहे. या प्रमुखावर हत्येपासून लैंगिक अत्याचारापर्यंत खटले प्रलंबित आहेत; पण कुठल्याही पक्षाची त्याच्याविरोधात खुलेपणाने बोलण्याची हिंमत दिसत नाही. हरियाणा निवडणुकीत भाजपने खुलेपणाने डेऱ्याचे समर्थन करून विजय मिळवला पण अकालीही तेच करण्याच्या प्रयत्नात आहेत. ‘शीख संगत’ मात्र बाबा राम रहीम यांच्याकडे शीख धर्माच्या प्रतीकांची थट्टामस्करी करणारी व्यक्ती म्हणून पाहते. त्यांना माफ करायला ते तयार नाहीत.
मोदी सरकारचा अल्पसंख्याकविरोधी चेहरा हा पंजाबचा सर्वात ज्वलंत प्रश्न नाही, हे खरे आहे. रा.स्व. संघापासून भाजपपर्यंत अनेकांनी अल्पसंख्याकविरोधी भूमिकेपासून शीख समुदायाला दूर ठेवले हेही खरे आहे, पण तरीही अटारीपासून दादरीपर्यंत सर्व घटनांवर शीख समाजाची नजर आहे. ‘हिंदू राष्ट्रा’चा शंखनाद करण्यात आला; त्यामुळे त्याची घुसमटही पंजाबातील आताच्या या असंतोषामागे आहे. या परिस्थितीशी पंजाबमधील अर्थव्यवस्थेचाही संबंध आहे. हरित क्रांती आता थबकण्याच्या अवस्थेत आहे, उद्योग पंजाबमधून दुसरीकडे जात आहेत, रोजगाराच्या शोधात तरुण स्थलांतर करीत आहेत. शेती ही तोटय़ाचा धंदा बनली आहे. हवामानातील बदल, अति पाऊस किंवा अवर्षण यामुळे किंवा अगदी किडींच्या हल्ल्यानेही शेती भुईसपाट होत आहे. पंजाबचे शेतकरी हे एखाद्या अंधाऱ्या बोगद्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोंडमाऱ्याला तोंड देत आहेत.
आज पंजाबला त्या पाच बोटांपासून मुक्तीची प्रतीक्षा आहे. पंजाबी लोकांना हे माहिती आहे, की आपण कुणाच्या विरोधात आहोत, पण त्यांना कुणाबरोबर जायचे म्हणजे आपले प्रश्न सुटतील हा मात्र प्रश्न पडला आहे. पंजाबला आता नव्या नायकाची गरज आहे व त्या अस्वस्थ मन:स्थितीत ते कुणाचेही ऐकायला तयार नाहीत. त्या स्थितीत जर कुणी चांगला पर्याय उभा केला नाही, तर पंजाब एखाद्या खोटय़ा, दिशाभूल करणाऱ्या ‘सौद्या’त फसणार तर नाही, अशी भीती वाटते.

६ लेखक राजकीय-सामाजिक विश्लेषक असून ‘स्वराज अभियान’चे प्रवर्तक आहेत.
त्यांचा ई-मेल yogendra.yadav@gmail.com

Story img Loader