यंदा पाऊस कमीच होता, तो वेळेवर पडलाच नाही आणि अखेर थोडाफार दिलासा देण्यापुरताच झाला. अवर्षणाशी आपण
मानवी- सरकारी प्रयत्नांनी दोन हात करू शकतो, पण प्रयत्नच थिटे पडतात तिथे ‘दुष्काळ’ सुरू होतो.. हे यंदा तरी टाळायला हवे..

मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने निर्माण होणारे अवर्षण नैसर्गिक असते हे खरे; ती दुष्काळाच्या जरा अलीकडची अवस्था म्हणू या. पण अवर्षण कधीही एकटे येत नाही.. ते दुष्काळाला घेऊन येते. अवर्षणात कमी पावसाचे निव्वळ परिणाम अपेक्षित असतातच पण जेव्हा अवर्षणाकडे सरकार व समाज दुर्लक्ष करतो, तेव्हा त्याचा ‘दुष्काळ’ होतो, तिथे अस्मानीला सुलतानीची जोड मिळून अधिक भयानक स्थिती निर्माण होते. पाणी, निसर्ग व समाजविषयक आपल्या देशातील एक तत्त्वचिंतक अनुपम मिश्र यांच्या एका हिंदी लेखाचे ‘अकेला नही आता अकाल’ हे शीर्षक बरेच काही सांगून जाणारे आहे. निसर्ग अवर्षण देतो – दुष्काळ नाही. दर चार-पाच वर्षांनी आपल्या देशात पाऊस कमी पडतो. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन कमी होते, पिण्याच्या पाण्याचे संकट येते, माणूस व पशू-पक्ष्यांच्या जगण्यावर संकट येते, शेतीशी निगडित असलेल्या प्रत्येक वर्गात त्यामुळे हाहाकार उडतो, असा याचा भयंकर अर्थ नाही. ही परिस्थिती अवर्षणामुळे नाही तर समाज व सरकार अवर्षणास तोंड देण्यास सुसज्ज नसतात, तेव्हा निर्माण होते. परिणामी अस्मानी व सुलतानी संकटातून भयानक दुष्काळ अनुभवाला येतो. दुष्काळाच्या आधी समाजाच्या पातळीवर विचारांचा, आठवणींचा व भावनांचा दुष्काळ पडतो. त्यामुळे अवर्षण एकटे येत नाही ते दुष्काळाला घेऊन येते, असे म्हटले जाते. आज या गोष्टींची पुन्हा आठवण करून देण्याची गरज आहे.
आज देशात भयावह दुष्काळ आहे. जेव्हा मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १० टक्के कमी असेल व त्याचा परिणाम देशाच्या २० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक भागावर होईल, तेव्हा सरकारी हिशेबानुसार दुष्काळ असतो. गेल्या आठवडय़ात पाऊस होऊनही मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १४ टक्के कमी आहे. देशातील ३८ टक्के जमिनीवर या दुष्काळाचा वाईट परिणाम झाला आहे. आता मान्सून परत चालला आहे व पावसाच्या टक्केवारीत किंवा कमी पावसाचा फटका बसलेल्या क्षेत्रात आता फार फरक पडणार नाही, त्यामुळे दुष्काळ तर पडला आहे, आता फक्त सरकारी घोषणेची प्रतीक्षा आहे.
हा सामान्य दुष्काळ नाही, लागोपाठ दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडला आहे. गेल्या शंभर वर्षांत केवळ तिसऱ्यांदा असे होत आहे. देशातील ६४१ जिल्ह्य़ांपैकी २८७ जिल्ह्य़ांत दुष्काळाचे संकट आहे. काही जिल्ह्य़ांत तर लागोपाठ सहा वर्षे कमी पाऊस पडला आहे. अनेक भागांत पेरणीच्या वेळी पाऊस पडला, शेतक ऱ्यांनी उत्साहाने त्यावर बी-बियाणे-खते यांचा खर्चही केला पण पिके उगवून वर येण्याच्या वेळेलाच पाऊस बंद झाला, पिके जेवढी आली होती ती वाळून गेली. शेतक ऱ्यांचे दुप्पट नुकसान झाले. जिथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे व जे भाग सिंचन सुविधांवर अवलंबून आहेत तेथे दुष्काळाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. केरळ, कोकण, नागालँड व मिझोरममध्ये सरासरी पाऊस कमी झाला आहे पण त्या भागांवर निसर्गाचे कृपाछत्र आहेच.. तेथे पाऊस सरासरीपेक्षा कमी असला, तरी तो इतर भागांच्या तुलनेत जास्तच आहे. पंजाब, हरयाणा व पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस कमीच आहे; पण तेथे सिंचनाचे दुसरे मार्ग आहेत, त्यामुळे एकदम मोठे संकट येणार नाही.
खरे संकट आहे ते आपल्या देशातील ‘नेहमीच्या दुष्काळी पट्टय़ा’त. हा पट्टा उत्तर कर्नाटकपासून सुरू होतो तो तेलंगण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातून दुसऱ्या बाजूला उत्तर बिहार व पूर्व राजस्थान व दक्षिण हरयाणापर्यंत विस्तारलेला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात दुष्काळाची स्थिती बिकट आहे. त्यामुळे मराठवाडा देशभरच्या दुष्काळाच्या केंद्रस्थानीच आहे. गेल्या दहा दिवसांत थोडी स्थिती सुधारली आहे नाही तर पिण्याचे पाणी व जनावरांना चारा मिळाला नसता. अजून संकट टळलेले नाही, भूजलाची पातळी घटली आहे व पिके करपून गेली आहेत.
दुष्काळाचे मोठे संकट उत्तर प्रदेशातही आहे, त्याबाबत कुठे चर्चाच होत नाही. या घडीला देशात २९ जिल्ह्य़ांत भयंकर दुष्काळ आहे, तिथे सरासरीच्या ६० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यात उत्तर प्रदेशातील सोळा जिल्हे आहेत. बुंदेलखंड व त्याला जोडणाऱ्या कौशम्बी ते आग्रा पट्टय़ातील आहेत व पूर्व उत्तर प्रदेशातील जिल्हे त्यात आहेत. गेल्या काही दिवसांत स्थिती आणखी बिकट बनली आहे. शेतकरी कूपनलिकेतून पाणी घेऊन गरजा भागवू इच्छितात, पण पंप चालवण्यासाठी वीजच मिळत नाही.
देश दुष्काळाच्या संकटातून जात आहे, पण सरकार व शहरी समाजाला त्याची गंधवार्ताही नाही. खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, पण सरकार निश्चिंत आहे कारण देशात अन्नधान्याचा भरपूर साठा पडून आहे. सरकारला उत्पादनांचे महत्त्व वाटते, उत्पादकांचे नाही. आतापर्यंत केंद्र सरकारने एक औपचारिक घोषणा केली आहे, की दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये मनरेगामध्ये १०० ऐवजी १५० दिवस रोजगार दिला जाईल. पिण्याच्या पाण्याची काही व्यवस्था नाही. पशुधनासाठी चारापाण्याची फिकीर नाही, पिकांच्या नुकसानभरपाईचे पैसे देण्याची कुठली तयारी सुरू असलेली दिसत नाही. सरकार मान्सून अधिकृतपणे संपण्याची वाट पाहत आहे, मान्सून एकदाचा गेला, की मग मंत्रालयातून तलाठय़ांकडे दुष्काळाची माहिती मागितली जाईल.. मग तलाठी मंत्रालयात त्या माहितीच्या फायली पाठवतील, ती माहिती काय असते हे सगळ्यांना माहिती आहे, मग राज्य सरकारे केंद्राकडे मदतीसाठी आग्रह धरतील, मग फायली रेंगाळतील व दुष्काळाची तीव्रता आणखी वाढलेली असेल.
दुष्काळाबाबत माध्यमेही फार जबाबदारीने वागताना दिसत नाहीत. मराठवाडय़ातील काही बातम्या आल्या, यापलीकडे काहीच नाही. अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतक ऱ्यांना मदत दिली म्हणून; नाही तर त्याही बातम्या आल्या नसत्या. शीना बोरा हिची हत्या, दिल्लीतील डेंग्यू या राष्ट्रीय समस्या आहेत पण ५० कोटी लोकांच्या जीवनात संकटाचा डोंगर उभा करणारा दुष्काळ ही माध्यमांसाठी राष्ट्रीय समस्या नाही. शहरात राहून दूरचित्रवाणी पाहणाऱ्या जागरूक नागरिकांना देश मोठय़ा संकटातून मार्गक्रमण करीत आहे हे माहिती नाही, गावांमधील लोकांना त्यांच्या प्रदेशातील दुष्काळाची माहिती आहे, पण देशव्यापी दुष्काळाची जाणीव नाही. जणू, जोपर्यंत दुष्काळ दूरचित्रवाणीवर दिसणार नाही, तोपर्यंत सरकार व प्रशासनाला त्याची काहीच चिंता नाही. रस्त्यावर कुणी माणूस मरत असताना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून गाडीच्या खिडकीच्या काचा लावून पुढे चाललो आहोत.. ही कल्पना विचित्र वाटेल, पण तशाच प्रकारे आपण आजच्या देशव्यापी दुष्काळाकडे डोळेझाक करीत आहोत.
हा तोच ‘एकटा न येणारा’ दुष्काळ आहे ज्याकडे अनुपम मिश्र लक्ष वेधू इच्छितात, अवर्षण निसर्गाने दिले आहे हे खरे, पण संवेदनेचा अभाव हा आपणच निर्माण केलेला आहे. अनुपम मिश्र यांनी गेली तीस वर्षे पाण्याच्या प्रश्नावर आपल्या विचारकुंठित अवस्थेकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते आपण गेली अनेक वर्षे देश ज्यांच्या मदतीने अवर्षणाचा मुकाबला करीत होतो, त्या साधनांचा आधुनिक विकास व जलसिंचन सुविधांच्या नावाखाली विनाश केला आहे.
या वेळचे अवर्षण भयंकर आहे हे खरे; शेते भले सुकलेली असोत पण आपली मने व हृदये अजून सुकलेली नाहीत, दुष्काळाचे चित्र पाहून आपल्या डोळ्यांत अजूनही पाणी येते, हे दाखवून देण्याची संधी आपल्या हातात आहे. हे अवर्षण दुष्काळात रूपांतरित होणार होणार नाही, या संकटात शेतकरी एकटा पडणार नाही याची काळजी आपण घेतली, तर हा अवर्षणातून दुष्काळाचा आणखी मोठा राक्षस जन्म घेणार नाही व अवर्षणातून दुष्काळाची आणखी गंभीर अवस्था गाठली न जाता सुकाळ होईल, अशा पद्धतीने आपण हे चित्र पालटू शकतो. निदान ते तरी आपल्या हातात आहे.
योगेंद्र यादव

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader