राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या आलिंगनाची तसेच या दोघांनी एकत्र हात उंचावल्याची छायाचित्रे बिहारमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर प्रसृत झाली. त्यामुळे दुख होण्याचे, शरमल्यासारखे वाटण्याचे.. आणि वादविवादही होण्यामागचे कारण काय होते?
शेवटी एखाद्या छायाचित्रात विशेष असे काय असते, पण जेव्हा बिहारमध्ये मंत्रिमंडळ शपथविधी समारंभात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व लालूप्रसाद यादव एकमेकांना आलिंगन देऊन गळाभेट घेतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले, तेव्हापासून खळबळ उडाली आहे. दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे यांच्या चौकटीतून बाहेर येऊन ही गोष्ट आता राजकीय फ्लेक्स-फलकांपर्यंत पोहोचली आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या समर्थकांमध्ये केजरीवाल यांच्या या कृतीने नाराजी आहे व त्यांचा भ्रमनिरासही झाला आहे. आम आदमी पार्टी व केजरीवाल यांना या छायाचित्रावरून स्पष्टीकरणे द्यावी लागली पण त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी ती आणखी चिघळली आहे, याचा अर्थ त्या छायाचित्राचा काही गर्भितार्थ नक्की आहे.
मलाही या छायाचित्राच्या विषयाचे गांभीर्य तेव्हा कळले, जेव्हा मी त्यावर भाष्य करण्याचा विचार सुरू केला. मी पहिल्यांदा हे छायाचित्र पाहिले तेव्हा मला खूप दु:ख झाले, शरमल्यासारखे वाटले. मी ट्विटरवर लिहिले – ‘आता हाच दिवस पाहण्याचे बाकी राहिले होते’. जेव्हा नरेंद्र मोदी व अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली जाते, तेव्हा बरेच अपशब्दही ऐकून घेण्याची तयारी ठेवावी लागते, तेही घडले. पण टीकाकारांनी काही प्रश्न विचारले आहेत त्यांचे उत्तर दिले पाहिजे. त्यांचे प्रश्न बघितल्यानंतर मी फेसबुकवरच एक टिप्पणी लिहिली. दोन दिवसांत ती टिप्पणी चार लाख लोकांपर्यंत पोहोचली. ४५०० लोकांनी त्याला ‘लाइक’ केले व एक हजारहून अधिक उत्तरेही आली. म्हणजे त्या छायाचित्रात काही तरी अर्थ आहे हे नक्की.
केजरीवाल यांच्या अनेक प्रशंसकांनी असे सांगितले, की त्या छोटय़ाशा छायाचित्रात अशी काय गोष्ट आहे, की लोक त्याला इतके महत्त्व देऊन पराचा कावळा करीत आहेत, हेच आम्हाला समजत नाही! नंतर आम आदमी पक्षानेही हीच भूमिका घेतली. ही गोष्ट खरी की, प्रत्येक छायाचित्राला काहीतरी अर्थ असलाच पाहिजे व आपण तो शोधलाच पाहिजे असे काही नाही. एक वेळ अशी होती की जेव्हा सगळे कुटुंब छायाचित्रासाठी पूर्वतयारी करायचे, जामानिमा करायचे. आता मोबाइल व डिजिटल कॅमेरे आले आहेत, त्यात छायाचित्र हे वरणभातापेक्षा किरकोळ बाब झाले झाले आहे. जर तुम्ही सामाजिक जीवनात सक्रिय असाल, तर तुम्ही सतत कुठल्यातरी कॅमेऱ्याच्या नजरेखाली आहातच. न जाणो कोण केव्हा छायाचित्र काढेल याचा नेम नाही. ‘सर जरा इकडे पाहा’, ‘एक सेल्फी काढायचाय, माझ्या खांद्यावर हात ठेवा ना सर!’ असे संवाद तुम्हाला या सेल्फी छायाचित्रांच्या वेळी ऐकायला मिळतात. मला नेहमी ही भीती वाटते, की कोण व्यक्ती आपले कुठे छायाचित्र काढेल व त्याचा कसा वापर करेल याचा नेम नाही. जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनात असता तेव्हा असे कुठले छायाचित्र काढले जात असेल, तरी ते रोखण्याची कुठलीही उपापयोजना नाही; ही खरी अडचण आहे. आपण यात ना काही कुणाची खातरजमा करू शकतो न कु णाला काही म्हणू शकतो. खरे तर अशा छायाचित्रांना काही अर्थ नाही पण लालूप्रसाद या छायाचित्रात आहेत. केजरीवाल यांना ते रस्त्यावर भेटलेले अनोळखी गृहस्थ नाहीत. , त्यामुळे या छायाचित्राला काही अर्थ नाही, असे आपण म्हणू शकत नाही
अनेक लोकांनी काही आठवडे आधीचे अखिलेश यादव यांच्याबरोबर माझे छायाचित्र दाखवून मला प्रश्न विचारला. त्याचे उत्तर सरळ होते, त्या छायाचित्रात मुख्यमंत्री अखिलेश यादव, मंत्री, मुख्यसचिव हेही दिसत आहेत, त्यांच्याशी ती अधिकृत भेट होती, अरविंद केजरीवाल अशा पद्धतीने म्हणजे अधिकृतपणे गृहमंत्री व पंतप्रधानांना भेटू शकतात; पण लालूप्रसाद यांच्याशी त्यांची झालेली भेट ही त्या पद्धतीची नाही.
‘हा तर सामान्य शिष्टाचार आहे, केजरीवाल जर लालूंना भेटले असतील त्याला हरकत का असावी?’ असा प्रश्न अनेकांनी केला आहे. माझ्या मते राजकीय जीवनात सामान्य शिष्टाचार आवश्यक आहेत. विरोधी नेत्यांशी संवाद असणे आवश्यक आहे, त्यांच्याशी सभ्यतेने वागले पाहिजे, त्यांच्याशी परिचय असायला हरकत नाही.. त्यात काही वाईट नाही; पण पाटणा येथील समारंभ हा काही कुणाची वाढदिवसाची पार्टी नव्हती. त्यामुळे त्यात अकस्मात भेटीचा शिष्टाचार नव्हता. जो कुणी त्या कार्यक्रमाला जात होता त्याला तेथे लालूप्रसाद यादव व त्यांचे सुपुत्र उपस्थित आहेत किंवा महाआघाडीच्या विजयात त्यांचाही भाग आहे, ते सत्तेत सहभागी असणार आहेत हे माहिती होते, त्यामुळे तो सामाजिक शिष्टाचार नव्हे तर राजनैतिक संबंधांचा प्रश्न होता, असे म्हणायला हरकत नाही.
नंतर आणखी एक मजेशीर तर्क पुढे आला, अरविंद केजरीवाल हे कधीच लालूंना भेटू इच्छित नव्हते व नाहीत, पण लालूंनीच त्यांना जबरदस्तीने आलिंगन दिले व हातातील हात उंचावला, हा तर्क मजेशीर व गमतीदार आहे.. पण केवळ ती गोष्ट खोटी आहे म्हणून नाही. दूरचित्रवाणीवरील दृश्ये पाहिली तर अरविंद यांना आलिंगन देण्यास लालूच पुढे आले.. असेही दिसते की, अरविंद केजरीवाल यांना असे वाटत होते की या गोष्टीचा एवढा गाजावाजा कदाचित होणार नाही. हा तर्क यासाठी गमतीदार किंवा मजेशीर आहे की, एका मंचावर येण्याचा निर्णय घेतल्यानंतर हस्तांदोलन, आलिंगन याची सुरुवात कुणी केली या प्रश्नावर चर्चा करणेच हुज्जत घालण्यासारखे आहे. छायाचित्रात अरविंद केजरीवाल यांनी शरद पवार, देवेगौडा, फारूख अब्दुल्ला यांना आलिंगन दिले की नाही हे समजले नाही पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांबरोबर राजकीय मंचावर एकत्र आल्याने एक नाते निर्माण झाले.
कदाचित हा तर्क पटला नाही, तर केजरीवाल यांना धार्मिक व जातीयवादी भाजपच्या विरोधात एकतेसाठी तसे करावे लागले असा नवा तर्कही आहे. ‘चारा’ व ‘भाईचारा’ यात केजरीवाल यांनी ‘भाईचाऱ्या’ची निवड केली. प्रश्न हा आहे की, जर कुठल्याही परिस्थितीत भाजपला विरोध करण्यासाठी हे कृत्य केले असे मान्य केले, तरी मग केजरीवाल यांनी निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांना खुलेआम पाठिंबा का दिला नाही? जर लालूंना खुले आम भेटण्यात संकोच वाटण्याचे कारण काय असे म्हटले तर आम आदमी पक्षाची स्थापना केली तरी कशासाठी हा प्रश्न पडतो. नीतीशकुमार यांच्यासारख्याच, मनमोहन सिंग यांच्यासारख्या ‘भल्या माणसा’च्या नेतृत्वाखालील सरकारची पाळेमुळे आम आदमी पार्टीने का खणली होती, हेही समजत नाही.
खरी गोष्ट ही आहे की, या छायाचित्राचा अर्थ ते पाहून कळत नाही. त्याच्या मागे एक गर्भितार्थ आहे, एक लपलेले समीकरण आहे. पाटण्यातील समारंभ हा दोन महिने चाललेल्या अनौपचारिक आघाडीचा परिपाक होता, एका नवीन राष्ट्रीय आघाडीच्या स्थापनेकडे त्याचा संकेत आहे. आम आदमी पार्टीचे नेते केजरीवाल हे या नव्या आघाडीत सहभागी होण्यास उत्सुक आहेत पण त्यामुळे पडणाऱ्या डागांपासूनही दूर राहण्याची त्यांची कसरत होती, त्यामुळेच आम आदमी पार्टीने आमचा केवळ नीतीशकुमार यांना पाठिंबा आहे, आम्ही लालूंबरोबर कधी मंचावरही जाणार नाही, असा प्रचार दोन महिने केला.
लालूप्रसाद यादव यांनी हे गुपित फोडले. कदाचित जबरदस्तीने त्यांनी ही गोष्ट जगजाहीर करून टाकली व तीच या समारंभाची अलिखित आठवण आहे.. हे समीकरण किंवा गणित अगदी साधे आहे. ‘सिद्धान्त, नैतिकता व भ्रष्टाचार जाऊ द्या .. आम्ही सर्व प्रादेशिक पक्ष भाजपच्या विरोधात सारे काही विसरून एकजूट आहोत,’ हे दाखवण्याचा तो प्रकार होता. काँग्रेस समर्थक लोकपाल आंदोलनाला विरोध करताना हाच तर्क मांडत होते. ते म्हणत होते की, आम्ही भ्रष्टाचारी आहोत पण आम्हाला विरोध कुणी करू नये कारण त्यामुळे भाजपला फायदा होईल.
आता हा संदर्भ पाहिला तर हे छायाचित्र खूप बोलू लागते. हे छायाचित्र अलिखित गणितांचा भांडाफोड करते. या छायाचित्रातून हेच दिसते, की भाजपविरोधी आघाडीचे समीकरण स्वीकारून अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला मान खाली घालायला लावली आहे, ज्यांनी भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पाहिले त्या लाखो आंदोलकांचा अपमान केजरीवाल यांनी केला आहे. या छायाचित्रात राजकारण बदलून टाकण्याची भाषा करणाऱ्यांना राजकारणाने किती बदलून टाकले आहे हे दिसते.
कधी-कधी एखाद्या छायाचित्रात बरेच काही असते. कधी-कधी एक छायाचित्र सत्याचा खरा चेहरा आपल्या पुढे आणते, तो केजरीवाल-लालू यांच्या गळाभेटीच्या छायाचित्रातून सामोरा आला आहे.
योगेंद्र यादव
* लेखक राजकीय- सामाजिक विश्लेषक असून ‘स्वराज अभियान’चे प्रवर्तक आहेत. त्यांचा ई-मेल : yogendra.yadav@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा