वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वेगात वाहने चालविणे नियमबाह्य़ आहे, हे सामान्यांप्रमाणेच कायदेमंडळाचे सदस्य असणाऱ्यांनाही माहीत असले, तरी काही बाबतीत लाभलेल्या विशेषाधिकारांमुळे, नियम मोडण्याचे विशेषाधिकारही प्राप्त झाल्याच्या नाहक समजुतींचा पगडा काही जणांवर असतो. मुळात, विधिमंडळाचे सदस्य झाले की लगेचच शिस्तीच्या संकेतांचे, जबाबदाऱ्यांचे आणि वैधानिक कामकाजाचे ज्ञान आपोआप प्राप्त होत नाही. त्यासाठी कसून अभ्यास करावा लागतो, सदनाच्या परंपरांचे पालन आणि आचरणही करावे लागते. पण अनेकांच्या केवळ विशेषाधिकाराच्या जाणिवाच जागृत होतात हे दुर्दैव! अशातूनच गोंधळ, गदारोळ माजवत सभागृहाला समरांगणाचे स्वरूप आणणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे राज्याची माफी मागण्याची वेळ अध्यक्षांवर ओढवते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात सचिन सूर्यवंशी नावाच्या वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यास विधिमंडळाच्या आवारातच आमदारांनी केलेल्या मारहाणीनंतर महाराष्ट्रात हेच घडले. वस्तुत: लोकप्रतिनिधींचे आचरण कसे असावे याचे अनेक सच्चे आदर्श आजही राज्याच्या विधिमंडळात आहेत. पण अलीकडच्या ‘गदारोळ संस्कृती’त त्यांचे अस्तित्व झाकोळून गेलेले दिसते. विधिमंडळ कामकाजातील सहभागात किंवा समाजात वावरताना वर्तणुकीच्या संकेतांचे प्रामाणिक पालन करणारे लोकप्रतिनिधी म्हणून सांगोल्याचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल क्षितिज ठाकूर या आमदारास सचिन सूर्यवंशींनी वरळीच्या सागरी सेतूवर जाब विचारला आणि त्यातून उडालेल्या शाब्दिक चकमकीची परतफेड करण्यासाठी आमदारांनी विधिमंडळाच्या परिसरात सूर्यवंशींना मारहाण केली. या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमटत राहिले.या प्रकरणातील पाच आमदारांना निलंबित करून अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी गणपतराव देशमुख यांच्याकडे सोपविली. देशमुख यांच्या प्रतिमेमुळे ही चौकशी नि:पक्ष होणार आणि या प्रकरणाबाबत समोर येणाऱ्या उलटसुलट माहितीला पूर्णविराम मिळून नेमके सत्य बाहेर येणार, हे अपेक्षितच होते, आणि तसे घडले. मनसेचे आक्रमक आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यावर देशमुख समितीने या निंदनीय मारहाण प्रकरणाचा ठपका ठेवला. शिस्तीचे आणि संकेतांचे नियम आणि सभागृहातील वर्तणूक यांचे काही नाते असावे, या जाणिवांपासून दूर असलेल्यांमध्ये त्यांचा समावेश झाला, तो प्रसंग आजही अनेकांना आठवत असेल. भरसभागृहात समाजवादी पक्षाच्या आमदाराच्या श्रीमुखात भडकावून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कदमांना सूर्यवंशी मारहाण प्रकरणातही नकारात्मक का होईना, भरपूर प्रसिद्धी मिळाली. क्षितिज ठाकूर हेही नवखे आमदार असल्याने विधिमंडळ कामकाजाच्या संकेतांमध्ये फारसे मुरलेले नाहीत. या मारहाण प्रकरणात राम कदम यांच्याबरोबर ठाकूर यांच्यावरील ठपकाही ठळक झाल्याने विशेषाधिकाराबरोबरच, सभागृहाच्या शिस्तीची आणि संकेतांची बंधनेही आपल्याला पाळावीच लागतील हा धडा आता लोकप्रतिनिधींना मिळणार आहे. या दोन आमदारांबरोबरच त्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावरही आमदार देशमुख यांच्या अहवालात ठपका असल्याने, पोलिसांनाही आपल्या वर्दीच्या अधिकाराबरोबर मिरविल्या जाणाऱ्या बेजबाबदार गैरसमजुतींचा फेरविचार करावा लागणार आहे. या प्रकरणानंतर निलंबनाची कारवाई झालेल्या तिघा आमदारांची मात्र पुरेशा पुराव्याअभावी देशमुख समितीने सुटका केली आहे. समोर येणारे पुरावे हाच चौकशीचा आधार असल्याने हा निर्णय योग्य, असेही म्हणावे लागेल. आता यातून सभागृहाच्या प्रतिष्ठेची परंपरा पुनप्र्रस्थापित होण्याची अपेक्षा करायला हरकत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2013 रोजी प्रकाशित
सुटका आणि ठपका!
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वेगात वाहने चालविणे नियमबाह्य़ आहे, हे सामान्यांप्रमाणेच कायदेमंडळाचे सदस्य असणाऱ्यांनाही माहीत असले, तरी काही बाबतीत लाभलेल्या विशेषाधिकारांमुळे, नियम मोडण्याचे विशेषाधिकारही प्राप्त झाल्याच्या नाहक समजुतींचा पगडा काही जणांवर असतो. मुळात, विधिमंडळाचे सदस्य झाले की लगेचच शिस्तीच्या संकेतांचे, जबाबदाऱ्यांचे आणि वैधानिक कामकाजाचे ज्ञान आपोआप प्राप्त होत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-04-2013 at 12:24 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deshmukh panel given clean chit to 3 mlas and finds kshitij thakur and ram kadam guilty