भक्तांच्या छोटय़ा छोटय़ा इच्छा महाराज पूर्ण करतात पण त्यांच्या एकमात्र इच्छेबाबत आपण किती जागरूक असतो? निरिच्छ अशा सद्गुरूंनाही एक इच्छा असतेच. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले, ‘‘मंदिराबाहेरचा भिकारी कसा आशेनं आणि लाचारीनं येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाकडे पाहात असतो की हा तरी मला पैसा देईल. तसा मी लाचारीने प्रत्येकाकडे पाहातो की हा तरी नाम घेईल!’’ तेव्हा त्याची एकमेव इच्छा असते ती मी त्यांच्या बोधानुरूप चालण्याचा प्रयत्न करावा, ही! त्या बोधानुरूप तात्काळ आणि पूर्णत्वानं मी चालू शकणार नाही, हे त्यांनाही माहीत असतं. पण मी प्रयत्न करावा, एवढीच त्यांची इच्छा असते. तुम्ही माझ्या दिशेनं एक पाऊल टाका मी तुमच्या दिशेनं दहा पावलं येईन, असं आश्वासन ते देतात तेव्हा प्रयत्न आणि त्यांची पूर्ती यांच्यातील अंतर ते वेगानं कमी करण्याची हमीच देतात. निरिच्छाची इच्छा ती हीच की माझ्या माणसानं निरिच्छ होण्याचा प्रयत्न करावा. अध्यात्माच्या मार्गावर आपण जे येतो ते आत्मसाक्षात्कार वगैरे जो म्हणतात तो व्हावा म्हणून. शिखर आहे हो ते! त्या शिखरावर जायचं तर कसं असलं पाहिजे? कबीरजी एके ठिकाणी म्हणतात, ‘कबीर का घर शिखर पर, जहां सिलहली गैल।’ माझं घर शिखरावर आहे. माझं निजधाम, माझी निजस्थिती सर्वोच्च आहे. तिथे जायचा रस्ता अगदी निसरडा आहे. किती निसरडा? तर, ‘पाँव न टिकै पपील का,’ तिथे मुंगीचाही पाय ठरत नाही हो पण त्याच मार्गावरून आपल्याला कशी जायची इच्छा आहे? ‘पाँव न टिके पपील का, तहाँ खलकन लादै बैल।’ जिथे मुंगीसुद्धा घसरते अशा रस्त्यावरून आपल्याला बैलावर ओझं लादून जायची इच्छा आहे! दुनियेला चिकटलेली इच्छांची ओझी बरोबर घेत आपण शिखर सर करायच्या गप्पा मारत आहोत. ‘मी’पणाचं झोपडंही हवं आणि त्याच जागी ‘आत्मसाक्षात्कारा’चा उत्तुंग टॉवरही हवा! अशा साधकाला कबीरजी सांगतात-
सकलो दुर्मति दूर करु, अच्छा जन्म बनाव। काग गौन गति छाडिम् के, हंस गौन चलि आव।।
समस्त दुर्बुद्धीचा त्याग करून जन्माचं सार्थक करून घ्या. कावळ्याची गौण गती सोडून हंसासारखे गुण अंगी बाणवून हे शिखर सर करा. मानसरोवरात पूर्वी म्हणे केवळ राजहंसच पाणी चाखत. तिथे कावळे गर्दी करू लागले. राजहंसांनी आक्षेप घेतला. कावळे म्हणाले, आम्हालाही मान्य आहे की येथे राजहंसांनीच पाणी प्यावं. पण फैसला लोकशाहीनुसारच व्हायला हवा. हंसांनीही मान्य केलं. मतदान झालं आणि निर्णय झाला की कावळे हेच खरे राजहंस आहेत! शिखरावर बैलावर सामान लादूनही जाता येतं, नव्हे संतांनीही खरं तर तेच सांगितलं आहे, हे सांगणाऱ्यांचं आज बहुमत आहे. त्यांना कबीरजी म्हणतात, ‘पढिम् पढिम् पण्डित करू चतुराई’!
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७१. निरिच्छाची इच्छा
भक्तांच्या छोटय़ा छोटय़ा इच्छा महाराज पूर्ण करतात पण त्यांच्या एकमात्र इच्छेबाबत आपण किती जागरूक असतो? निरिच्छ अशा सद्गुरूंनाही एक इच्छा असतेच. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले, ‘‘मंदिराबाहेरचा भिकारी कसा आशेनं आणि लाचारीनं येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाकडे पाहात असतो की हा तरी मला पैसा देईल.
First published on: 10-12-2012 at 01:40 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desire of a sadguru