‘जैतापुरात पुन्हा रण पेटणार’ या शीर्षकाची मुखपृष्ठावरील बातमी ‘बत्ती असेलच.. साक्षीला’ या शीर्षकाचा सचिन रोहेकर यांचा विचार आणि ‘दोन वाटा की दुहेरी मार्ग’ या शीर्षकाचा डॉ. अनिल पडोशी यांचा लेख (३ सप्टें.) या संदर्भात हा पत्रप्रपंच. माझ्या मते, वैश्विकीकरणामुळे निर्माण झालेली तंत्रविज्ञान आधारित प्रगती व परंपरागत शेती, उद्योग, मासेमारी यांचे होत असलेले विस्थापन यातील समन्वयाचा अभाव हा मुख्य मुद्दा आहे. वाढत्या लोकसंख्येची ऊर्जेची गरज, अणू वीज केंद्रामधून जगात इतर जागी उद्भवलेल्या पर्यावरणविषयक समस्या, पारंपरिक ऊर्जानिर्मितीच्या मर्यादा, कोकणातील विशिष्ट भौगोलिक परिस्थिती व तेथील गेल्या ६६ वर्षांतील विकासाचा अनुशेष आणि वाढत्या मोबदल्याचे विस्थापितांना असलेले आकर्षण या पाश्र्वभूमीवर आर्थिक विकास की मानवी विकास हे द्वैत नसून मानवप्रधान किंवा पर्यावरणरक्षित व परस्परावलंबी व परस्परपूरक अशा सजीव व निर्जीव पृथ्वीचे संरक्षण व त्यानुसार प्रकल्प आखणी हा व्यापक मुद्दा आहे. आर्थिक विकासाबरोबर लोकसंख्या आटोक्यात ठेवणाऱ्या सामाजिक सुधारणा, जमिनीच्या प्रमाणात लोकसंख्येचे प्रसरण (डिस्पर्सल), अतिरिक्त संपत्तीचे समन्यायी वाटप व त्याकरता लागणारी करविषयक अर्थनीती, उत्पादनक्षमता व रोजगारक्षमता सतत निर्माण करणाऱ्या शेती, शेतीधिष्ठित व लघू व मध्यम उद्योगात मोठय़ा प्रमाणावर आवश्यक असलेली भांडवल गुंतवणूक, परिवार संकल्पनेची जपणूक, सर्व प्रकारच्या (जात-पात- पंथ-धर्म) दुय्यम निष्ठा ‘वैयक्तिक किंवा परिवार’ परिघात ठेवून सार्वजनिक जीवनात ‘भारतीय’ अशी ओळख ठेवून स्पर्धेत उतरणे हे सर्व मुद्दे पक्षविरहित पातळीवर मोकळी चर्चा करून सोडवावे लागतील. राष्ट्रहित किंवा देशाचा विकास कोणी ‘मसिहा’ येऊन सोडवेल या भ्रमात न राहता सामूहिक जबाबदारी म्हणून समस्यांची सोडवणूक करावी लागेल.
श्रीकृष्ण फडणीस, दादर, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा