पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमांवर पहारा ठेवून त्या सुरक्षित ठेवणारे सर्वात मोठे (१७५ बटालियनचे) दल म्हणून सीमा सुरक्षा दलाचा, म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स – बीएसएफचा लौकिक आहे. या दलाचे ‘महासंचालक’ हे पद देवेंद्रकुमार (डी. के.) पाठक यांच्याकडे सोपविण्याचा अधिकृत निर्णय गुरुवारी जाहीर झाला, ती खरे तर एक औपचारिकताच होती. बीएसएफचे याआधीचे प्रमुख सुभाष जोशी हे २७ फेब्रुवारीस निवृत्त झाले, तेव्हाच १ मार्चपासून त्या पदाचा तात्पुरता कार्यभार ‘विशेष महासंचालक’ या नात्याने पाठक पाहतील, असे ठरवण्यात आले होते. महासंचालकपदही पाठक यांनाच मिळेल, परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे कदाचित विलंब लागेल, अशी अटकळ होती; ती या नियुक्तीने खरी ठरली.
पाठक यांचा जन्म १९५६चा. वयाच्या २३व्या वर्षी भारतीय पोलीस सेवेत ते दाखल झाले, तेही ‘आसाम व मेघालय केडर’मध्ये. त्या वेळी आसाम धुमसत होता. अशा वेळी आधी विशेष पोलीस अधीक्षक म्हणून (बदली न मागता, किंवा न होता) चार वर्षांचा कार्यकाळ पाठक यांनी आसामात काढला. तेथून इंडियन ऑइल या सरकारी उपक्रमाचे मुख्य दक्षता अधिकारी या पदावर त्यांची प्रतिनियुक्ती झाली, पण आसामात परतल्यावर त्या अशांत राज्यातील कायदा-सुव्यवस्था शाखेचे पोलीस महानिरीक्षक आणि पुढे याच अवघड शाखेचे अतिरिक्त महासंचालक या पदांचे आव्हान त्यांनी पेलले. मग त्याहीपेक्षा मोठे, काश्मीरमध्ये २००८ पासून काम करण्याचे आव्हान. या काश्मिरी कामगिरीसाठी त्यांची प्रतिनियुक्ती केंद्रीय राखीव पोलीस दलात करण्यात आली. आसामात एका जागी अधिक काळ राहून तेथे शिस्त आणण्याची संधी त्यांना मिळाली होती. तसे मात्र काश्मिरात होऊ शकले नाही, कारण सीआरपीएफतर्फे नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खास ‘कोब्रा पथक’ उभारण्यासाठी तज्ज्ञ, अनुभवी अधिकारी हवा आणि पाठक हेच त्यासाठी योग्य आहेत, हे उच्चपदस्थांच्या लक्षात आले.
सीआरपीएफच्या मुख्यालयात कर्मचारी शाखेचे महानिरीक्षक, प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त महासंचालक आणि मुख्यालयाचे अतिरिक्त महानिरीक्षक अशी पदे त्यांना मिळाली. ही सारी पदे प्रामुख्याने दिल्लीत होती. परंतु काश्मिरात परतण्याची संधीही त्यांना मिळाली, ती सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीर क्षेत्राचे विशेष महासंचालक या नात्याने. काश्मीरमधील याच जबाबदारीवर असताना ‘बीएसएफ’चे विशेष महासंचालकपद त्यांना देण्यात आले. पोलीस खात्यातील विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक, गुणवंत सेवापदक आणि राष्ट्रपती पदक तसेच तीन ताऱ्यांसह सुवर्णतबक हे मान त्यांना मिळाले आहेत.