‘गोली एक और आदमी तीन, बहुत ना इन्साफी है..’  हा  ‘शोले’ चित्रपटातील संवाद राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीच्या ताज्या कृतीबाबत भाष्य करणारा असाच आहे. इंग्लिश संघाकडून घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत सपाटून मार खाणाऱ्या भारतीय संघाने त्यानंतर एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानकडून हार पत्करली. नवी दिल्लीमध्ये क्रिकेटरसिकांना थोडासा सुखद धक्का देणारा अखेरच्या सामन्यातील विजय सोडल्यास भारतीय क्रिकेटची निराशगाथा सुरूच होती. आता आगामी आव्हान आहे ते इंग्लिश संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचे. त्यासाठी भारतीय संघात घाऊक बदलांची अपेक्षा होती, पण फक्त  सलामीवीर वीरेंद्र सेहवागला डच्चू देऊन निवड समितीने बाकी सर्वाना मात्र जीवदान दिले आहे. अपेक्षेप्रमाणेच माजी क्रिकेटपटू आणि प्रसारमाध्यमे यांच्या टीका आणि विरोधाची पर्वा न करता निवड समितीने महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाला धक्काही लागू दिलेला नाही. ही सर्व निर्णयप्रक्रिया त्यामुळेच संशयास्पद वाटते. अपयशाचे खापर फक्त वीरूवर फोडणे योग्य ठरणार आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतो. वीरूप्रमाणेच गौतम गंभीर, विराट कोहली आणि युवराज सिंग हे फलंदाज सातत्याने अपयशी होत आहेत, पण या सर्वाना मात्र अभय मिळाले आहे. कामगिरीचाच विचार केला तर मागील १० सामन्यांत सेहवागने २३.८च्या सरासरीने २३८ धावा केल्या होत्या. डिसेंबर २०११मध्ये सेहवागने २१९ धावांची विश्वविक्रमी शतकी खेळी साकारली होती. त्यानंतर सेहवागला आजमितीपर्यंत शतक साकारता आलेले नाही. श्रीलंकेविरुद्ध साकारलेली ९६ धावांची खेळी वगळता वर्षभरात त्याची फलंदाजी फारशी गांभीर्याने झालेली नाही. समोर कोणताही गोलंदाज असो, बिनधास्तपणे त्यांच्यावर तुटून पडणारा सेहवाग आला कधी आणि बेफाम फटका खेळून बाद झाला कधी, हे कळायचेदेखील नाही. पण त्यामुळेच आपली विश्वासनीयता वीरूने गमावली होती. याचप्रमाणे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ बँक सीरिज स्पध्रेप्रसंगी धोनी-सेहवाग यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला होता. त्यानंतर वर्षभराचा विचार केला तर ‘भारतीय क्रिकेट संक्रमणातून जात आहे’, या गोंडस लेबलखाली व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी कसोटीतून निवृत्ती पत्करली. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरनेही एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. या साऱ्या घटनांमागील सूत्रधार धोनीच आहे. व्यक्तिपूजेचे स्तोम माजविणाऱ्या भारतासारख्या देशाच्या क्रिकेट संघातही असे अनेक क्रिकेटपटू पूर्वपुण्याईच्या बळावर चिकटून बसले होते. पण धोनीने संक्रमण, युवा क्रिकेटपटूंना संधी आणि दुसरी फळी निर्माण करण्याचा अभास निर्माण करून हे सारे बदल घडवून आणले. धोनीला भारतीय संघात सेहवाग बराच काळ खटकत होता. त्यामुळे पराभवानंतर पहिला निशाणा वीरूवरच साधला जाणार, हे अपेक्षितच होते. बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत श्रीनिवासन. हेच महाशय धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचेही मालक. त्यामुळे निवड समिती धोनीवर हत्यार उगारण्याचे धारिष्टय़ दाखविणार नाही; उलटपक्षी त्याच्या विचारानेच काम करणार, हे क्रमप्राप्त होते. तूर्तास, या धोनीपर्वास शुभेच्छा देण्याशिवाय भारतीय क्रिकेटरसिकांच्या हातीही काहीच नाही.

Story img Loader