अनंतमूर्तीची मोदींवर टीका (२० सप्टेंबर) हे वृत्त वाचून एक विचार मनात आला तो म्हणजे मोदी हे हुकूमशहा आहेत व ते पंतप्रधान झाल्यास हुकूमशाही देशात येईल म्हणून जर ते देशत्याग करणार असतील तर १९७५ च्या हुकूमशाहीसदृश आणीबाणीच्या वेळीसुद्धा अनंतमूर्ती यांनी देशांतर केले होते काय? खरे तर मोदी जरी पंतप्रधान झाले तरी केवळ भाजपला बहुमत मिळून होणे फार कठीण. म्हणजे त्यांना इतर समर्थक पक्षांचाही आधार लागणार. आघाडीतले इतर पक्षही हुकूमशाहीचे समर्थक आहेत, असे लेखक महाशयांना वाटते काय? आणि असे इतरांचा पािठबा घेऊन चालताना मनात असले तरी कुणाला हुकूमशहा होता येईल का? आणि समजा, दुर्दैवाने अशी हुकूमशाही सुरू झालीच तर अनंतमूर्तीसारख्या विचारवंतांनी देशात राहून समाजाला धीर देऊन मार्गदर्शन करायचे की देशवासीयांना हुकूमशहाच्या तोंडी देऊन आपण सुरक्षित राहण्यासाठी पलायन करायचे?
राम ना. गोगटे, वांद्रे (पू.)
राज्यसभेच्या तिकिटासाठी?
‘मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडेन’ असे विधान ज्ञानपीठ विजेते साहित्यिक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांनी केले आहे. खरे तर सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्या तेव्हा, मुंबईवर हल्ला आणि अनेक बॉम्बस्फोट झाले तेव्हाच यांनी देश सोडायला पाहिजे होता. निर्भया बलात्कार, भारतीय सनिकांची हत्या, अर्थव्यवस्थेची केविलवाणी अवस्था, प्रचंड घोटाळे आणि मुका पंतप्रधान हे सर्व पाहत तुम्ही या देशात राहिला. आणि आता मोदी पंतप्रधान झाल्यास तुम्ही देश सोडणार? नरेंद्र मोदींवर टीका करणे म्हणजे प्रसिद्धी मिळवणे हे आता जनतेस माहीत झालेय. दिग्विजय सिंग तर त्यामुळेच टिकून आहेत काँग्रेसमध्ये. भाजपने इतके दिवस बरीच मदत केली या लेखकसाहेबांना, पण कर्नाटकातील नवीन काँग्रेस सरकारने बहुतेक पुढचे राज्यसभेचे तिकीट फिक्स केलेले दिसतेय..
हास्यास्पद शस्त्रसंधी करार
या वर्षी पाकिस्तानने ९६ वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले आहे. सप्टेंबर महिन्यात तर एकूण १८ वेळा शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला, असे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते एस. एन्. आचार्य यांनी सांगितले. भारत आणि पाक यांच्यात २००३ मध्ये शस्त्रसंधीचा करार करण्यात आला होता. या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि पूंछ परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील हालचालींमध्ये पाकिस्तानी सन्याकडून प्रचंड वाढ झाली आहे. यात चौक्यांवरील गोळीबारासह, रॉकेट सोडणे यांचाही समावेश होता, असेही आचार्य यांनी सांगितले. शस्त्रसंधी कराराच्या उल्लंघनाला जशास तसे उत्तर देण्याऐवजी त्याची मोजणी करीत असलेल्या संरक्षण खात्याची ही माहिती लज्जास्पद आहे. शस्त्रसंधी कराराच्या उल्लंघनाला जशास तसे उत्तर देण्याची धमक शासनाकडे नाही.
रामचंद्र लुगडे, पुणे.
गणेशोत्सवात शिरलेले अपप्रकार
बेळगाव येथील श्रीगणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत बहुचíचत २६ फूट उंचीच्या कागदी पुठ्ठय़ापासून सिद्ध केलेल्या मूर्तीला विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. पर्यावरणवाद्यांच्या नाहक हट्टापोटी कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणे, मोठय़ा आकाराच्या मूर्तीची अशास्त्रीय स्पर्धा, गणेशोत्सवात शिरलेले अपप्रकार यांमुळे या उत्सवाला आज जे विकृत स्वरूप आले आहे, त्याचेच हे फलित आहे. शास्त्रानुसार श्रीगणेशमूर्ती ही शाडू मातीचीच असावी आणि ती एक फुटापेक्षा अधिक नको, असे सांगितले आहे. मात्र सध्या पर्यावरणपूरकतेच्या नावाखाली कागदी लगद्यापासून मूर्ती सिद्ध करण्याचे पेव फुटले आहे. कागद पाण्यात विरघळत नाही. त्याचे कण मासे आणि जलचर यांच्या कल्ल्यांमध्ये अडकून अनेक माशांचा मृत्यू होतो. कागद वृक्षांपासून बनवण्यात येत असल्याने त्याच्या निर्मितीसाठी झालेल्या वृक्षतोडीमुळे ती मूर्ती पर्यावरणपूरक असू शकत नाही.  या मूर्तीची उंची ५ फुटांपेक्षा अल्प असती तर हे अपघात झाले नसते.
 डॉ. ज्योती काळे, पुणे
लोकशाहीवरच बलात्कार करणाऱ्यांचे काय?
अलीकडे झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न सगळ्यांना भेडसावत आहे. अशा घटना सारख्या घडू लागल्या आहेत याची करणे बरीच आहेत, एक तर मुंबईसारख्या शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे वाढत आहेत. फुटपाथवर राहणाऱ्या लोकांची संख्या वाढतेच आहे. या लोकांवर आपला कोणत्याच प्रकारचा कंट्रोल नाही. आहे त्या पोलीस यंत्रणेवर हा फारच मोठा बोजा आहे. तशीच सामाजिक कारणेही आहेतच. महिलाही घराबाहेर पडून वेगवेगळी आव्हाने स्वीकारत आहेत. त्यांना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गल्लीबोळात संरक्षण देणे हे पोलिसांना/सरकारला अशक्य आहे. तरुण मुलांची विकृत मन:स्थिती होण्यासाठी व त्यांना असले हीन गुन्हे करण्याला प्रवृत्त करण्यासाठी आणी करण्याचे धाडस देण्यासाठी आपले सिनेमे व टीव्ही चानेल्स सातत्याने झटत आहेतच!
सध्या असाही विचार प्रबळ होत चालला आहे की गुन्हेगारांना पोलीस व कायद्याबद्दलची भीतीच उरलेली नाही. मी तर म्हणेन की गुन्हेगारच काय पण आपल्या राजकीय पुढाऱ्यांना किंवा शासनातील कामगारांना व अधिकाऱ्यांना तरी कुठे आहे कायद्याची भीती? छोठे-मोठे गुन्हेगार बायकांवर बलात्कार व हल्ले करतात पण बाकी सगळे आपल्या देशावर व लोकशाहीवरच भर दिवसा बलात्कार करत आहेत त्यांचे काय? आपल्या देशाचीच अब्रू वेशीवर टांगायला निघालेल्यांना कोण पकडणार? हे तर इतके हुशार आहेत की यांच्या गुन्ह्य़ाचे पुरावे मिळणेही अशक्य आणी असलेच तर ते नष्ट करण्याचे कौशल्यही त्यांच्यात आहेच!
लता रेळे
भ्रमनिरासही आवश्यक असतो
यूपीए सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे ही गोष्ट खरीच आहे. त्यातच आता नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता खूप प्रभावीपणे पुढे येत आहे, पण भाजप नव्हे.
आणीबाणीनंतर भारतीय राजकारणात आत्तासारखीच परिस्थिती तयार झाली होती.  त्या वेळी जो तरुण वर्ग नव्याने मतदार झाला होता त्याला तारुण्यसुलभ अधीरतेपोटी असे वाटत होते की, जनता पक्षाची राजवट येताच सगळे प्रश्न चुटकीसारखे सुटून देशात स्वप्नवत रामराज्य अवतरेल आणि काँग्रेसचे नामोनिशाणही शिल्लकराहणार नाही.  नंतर काय घडले ते सर्वज्ञात आहे. आता मतदार म्हणून नव्याने निवडणूक प्रक्रियेत येऊ घातलेले तरुण त्या वेळीसारखेच सध्या मोदींच्या करिश्म्याने भारावून गेले आहेत. एकहाती सत्ता असेल तर राज्यस्तरावरील प्रश्न सोडविणे आणि इतर पक्षांना सोबत घेऊन देशपातळीवरील प्रश्न सोडविणे यात जमीन-आसमानाचा फरक आहे. देशाच्या राजकीय आयुष्यात जनतेचा आणि नेत्यांचा भ्रमनिरास मध्येमध्ये होतच असतो. देशाच्या राजकीय प्रकृतिस्वास्थ्यासाठी त्याची गरजही असते.
मोहन गद्रे, कांदिवली
किंचित किलकिलं झालेलं स्वर्गाचं दार..
‘उघडले स्वर्गाचे दार!’ हा अग्रलेख (१४ सप्टेंबर) वाचला. पोप फ्रान्सिस यांनी केलेल्या विधानांचा विचार करताना त्यांची पाश्र्वभूमी विचारात घेणं आवश्यक आहे. एक तर ते लॅटिन अमेरिकेतून (अर्जेन्टिना) आलेले पोप आहेत. सत्तरीच्या दशकात लॅटिन अमेरिकेत लिबरेशन थिऑलॉजी आणि जेस्यूआईट विचारांच्या धर्मगुरूंचा प्रभाव होता. चर्चने गोरगरिबांना सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपलं काम केलं पाहिजे, अशी या धर्मगुरूंची धारणा होती. आणि त्या त्या देशातल्या जनतेच्या बाजूने आणि हुकूमशाहांच्या विरोधी लढे देण्यात या प्रवाहातले अनेक धर्मगुरू अग्रभागी होते.  या धर्मगुरूंवर मार्क्‍सवादाच्या प्रभावाखाली असल्याचा शिक्का मारून चर्चने त्यांच्या अनेक कृतींना नाकं मुरडली होती. विरोधही केला होता. पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या निवडीनंतर केलेली अनेक विधानं आणि काही कृती या चर्चचे दरवाजे किंचित किलकिले झाल्याचे निदर्शक आहेत. जेस्यूआईट, लिबरेशन थिऑलॉजी पंथियांत आणि फ्रान्सिस यांच्यात फरक असला तरी काही साम्यस्थळं आहेत आणि नास्तिकांसंबंधीची त्यांची स्वागतशील भूमिका ही त्यांच्या आजूबाजूला त्या वेळी असलेल्या वातावरणातल्या संस्कारांतून निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांची निवड झाल्यावर लिबरेशन थिऑलॉजीच्या पुरस्कर्त्यांनी फ्रान्सिस यांच्याबद्दल सावध आशावादी भूमिका घेतली होती. मात्र चर्चची जगभर पसरलेली संघटना, त्यातले पुराणमतवादी, त्यांच्या मागे असलेले राजकीय प्रवाह या सगळ्यांच्या प्रभावाखाली दबून शेवटी ‘जैसे थे’ची परिस्थिती त्यांच्या वाटय़ाला येईल की ते या साऱ्यांना काही विधायक वळण देऊ शकतात, हे आत्ताच सांगता येणं शक्य नाही.
अशोक राजवाडे