ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई पुरंदरे यांना काल ८० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने ‘राजहंस प्रकाशनातर्फे’ त्यांचे स्नेहयात्रा हे पुस्तक प्रकाशित होत आहे. १९७१ साली वर्षभर फ्रान्समध्ये राहून त्यांनी तेथील अनुभवांवर आधारित सहा लेख १९७२ मध्ये लिहिले होते. त्याच लेखांचे सुधारित संकलन या पुस्तकात असून त्यातील एका लेखाचा हा संपादित भाग..
मुक्काम पॅरिस. ग्रुप डायनामिक्सच्या (अभिव्यक्ती) एका छोटय़ा कोर्ससाठी मी आले. सामाजिक कामांमध्ये भाग घेणाऱ्या लोकांसाठी तसंच नन्स, प्रीस्ट्स, डॉक्टर्स, लेबर ऑफिसर्स वगैरे ज्यांचा ज्यांचा म्हणून समाजात वावरण्याचा प्रसंग येतो, अशा लोकांसाठी लहान-मोठे कोर्सेस फ्रान्समध्ये चालू असतात. त्यातली दोन सत्रं मी केली. या कोर्सेसची फी फार मोठी असते. माझ्या कार्यक्रमात हे कोर्सेस माझ्या भाषाज्ञानाच्या मानानं फार लवकर आखले गेले, असं जाणवलं. या सत्रांची पद्धतच मुळी मला अज्ञात होती. शिवाय तुटपुंजं भाषाज्ञान. या सत्रांनंतर मस्य पॉतव्हँशी चर्चा करताना आमच्या लक्षात आलं, की माझ्या मुक्कामाच्या शेवटी ही सत्रं घेता आली असती, तर मला जास्त समजली असती.
कसे होते हे कोर्सेस? व्यक्तिमत्त्वाचा विकास हा या कोर्सचा उद्देश. विचार करायला शिकणं, तो विचार बोलून दाखवणं, भावभावनांचे पदर सुटे करून विश्लेषणाची सवय लावणं या गोष्टींचा या कोर्समध्ये अंतर्भाव केला गेला.
पहिल्या दिवशी कोर्समध्ये भाग घेतलेले आम्ही पंधरा जण एका गटामध्ये. असे तीन गट केले होते. दहा मिनिटांत प्रत्येक सभासदानं आपापली ओळख करून दिली. आमच्या गटामध्ये एक निरीक्षक होता. आम्हाला कोणालाच नेमकं आपण काय करणार आहोत, याची कल्पना नव्हती. ओळख समारंभ झाल्यावर निरीक्षकानं सांगितलं की, ‘‘तुम्ही काहीही करू शकता.’’ कोणाला काही समजेचना. अरे, ना ओळख ना देख. अशा परिस्थितीत काहीही करा म्हणजे काय? करायचं तरी काय? चूपचाप एकमेकांकडे पाहात आपले बसून राहिलो. इतकं मनावर टेन्शन आलं होतं प्रत्येकाच्याच. काही बोलायला सुचेना, कुणाला काही विचारायला सुचेना. चर्चेला सूत्र सापडेना. निरीक्षकही आपला मुखस्तंभ. अक्षरश: संपूर्ण सकाळचा वेळ असा चमत्कारिक गेला.
दुपारी तिन्ही गट एकत्र आले. पुन्हा तोच प्रकार. पन्नास माणसं. चार निरीक्षक, धूम्रपानाशिवाय चाळा नाही. आगगाडीच्या डब्यात निदान गाडीचा आवाज तरी असतो. इथं काहीच नाही. प्रत्येकाचीच विचारशक्ती कशी थांबली होती! आणि प्रत्येकाला काहीही, कसंही बोलायची, वागायची परवानगी होती अन् तरीही प्रत्येक जण स्तब्ध. मती गुंग झाल्यासारखा होता. निरीक्षक याचंच निरीक्षण करत होते. सकाळी नऊ ते साडेबारा आणि दुपारी दोन ते सहा या वेळेत आठ-दहा वाक्यांच्या देवाण-घेवाणीशिवाय काहीही घडलं नाही.
संध्याकाळी निकोकडे आले. अॅलँ व निकोलनं उत्सुकतेनं विचारलं, ‘‘काय काय झालं आज?’’ माझं तर डोकंच अगदी जड झालं होतं. दिवसभरातल्या शांततेचं वर्णन केलं काय. दुसरा नि तिसरा दिवस यापेक्षा थोडे बोलके गेले. पण नेमके विषय नाहीत. जिकडे वळेल तिकडे संभाषण वळे. ऑन्द्रे तर एकदा हे मनावरचं ओझं असह्य़ होऊन म्हणालासुद्धा की ‘‘ आम्हांला नेमकं मार्गदर्शन करायचं नसेल, तर हा निरीक्षक आमच्यात बसलाच तरी का? त्याच्या अस्तित्वाचीच अडचण होतेय. निदान त्यानं निघून तरी जावं.’’ पण निरीक्षक गेला नाही आणि हे ग्रुपचं तारू शीड नसलेल्या होडक्यासारखं तिन्ही दिवस आपलं भरकटत राहिलं.
या सामुदायिक मौनामध्येच एखाद्य तीक्ष्णबुद्धी माणसाला एखादा वेगळा विचार सुचणं शक्य आहे का? विचारशक्तीचा सर्व बाजूंनी कोंडमारा झाला, तर माणूस कसं वागतो? अशा या मौनात गटामधील व्यक्तीव्यक्तींची प्रतिक्रिया कशी असते, याचाही हा अभ्यास असू शकतो. मला तर तुरुंगात मोठय़ा वॉर्डात एकत्र असलेले कैदी, वर्षांनुर्वष काय करत असतील, कुठले विषय आपापल्यात बोलत असतील, याचाच विचार आला. तीन दिवसांनंतर हे सत्र संपल्यावर केव्हाही एकमेकांशी बोलताना आम्ही नेमकं काय केलं, हेच आम्ही सांगू शकलो नाही. फ्रॉन्स्वॉज, जाँ, इरेन वगैरेंना मी विचारलं,‘‘याच संस्थेचं पुढचं सत्र करणार का?’’ ‘‘बहुतेक नाही’’, असं त्यांचं उत्तर होतं. ज्या निकोलकडे गेले तीन दिवस मी उतरले होते, ती मोठी गोड मुलगी. माझी अगोदरची ओळख मुळीच नव्हती. इंग्रजी बोलते, नोकरी करते, तीन खोल्यांचा फ्लॅट घेऊन पॅरिसमध्ये गेली कित्येक र्वष राहाते. अविवाहित आहे. वय सुमारे २८ र्वष. तिची आईही जवळपास कुठेतरी राहाते एकटीच. वडील इटालियन होते. ते वारले. वरचेवर दोघीहीजणी एकमेकींकडे जात असतात. मुलीला वेळ नसेल, तर आई येऊन भांडी धुवून घर स्वच्छ करून जाते. निकोलचं एका तरुण डॉक्टरवर प्रेम होतं. अल्जेरियातील युद्धात तो मारला गेला आणि ही आता अविवाहित राहाते आहे. हे फार अवघड आहे, असं मला आपलं वाटलं. आपल्या प्रिय माणसाच्या स्मृतीत हे असं एकलेपणाचं आयुष्य घालवणं सोपं आहे का? या अशा आधुनिक सीता-सावित्री जगाच्या पाठीवर सर्वत्रच असू शकतात नाही का! निकोलसारखी गोड सुंदर मुलगी एकाकी जीवन जगणार, या विचारानं माझं मन अस्वस्थ झालं.
खरं म्हणजे मुलगी पंधरा-सोळा वर्षांची झाली, की तिची बोहल्यावरची मूर्ती तिच्या आईवडिलांना दिसू लागणं हेच माहीत असलेलं माझं मन निकोलच्या एकलेपणामुळे अस्वस्थ झालं असावं. माझ्या अवतीभोवती अनेक अविवाहित मुली आहेत. ‘लग्न’ या विषयावर खूप मोकळेपणानं बोलत असू आम्ही. लग्न करायचंच नाही, हा काही त्यांचा हट्ट नाही. या रूप-गुणवान, सुस्वभावी, कर्तबगार मुलींची स्वाभाविक अपेक्षा स्वावलंबी, स्वतंत्र जीवन असावं, अशी असते. अभ्यासातील, आपापल्या कामातील प्रावीण्य, आर्थिक स्वावलंबन, स्वत:चा मित्रपरिवार, देशापरदेशांमध्ये स्वतंत्रपणे प्रवास करणं वगैरे कितीतरी बाबतींत त्या स्वत: समर्थ असतातच. लग्न करून हे स्वातंत्र्य कशाला घालवायचं? हा विचार त्यांना लग्नाच्या निर्णयापासून दूर ठेवतो. लग्न करून कुटुंबासाठी आपल्या आवडीनिवडींवर बंधनं घालून घ्यायची, हा विचार त्यांना पटत नाही. पूर्व आणि पष्टिद्धr(१५५)मेतील विचारसरणीत किती फरक आहे हा!
आता विषयच निघाला म्हणून पुढे सांगते. विवाहपद्धतींमधील फरक मात्र मला वाटतं, दिवसेंदिवस कमी होत जाईल. आपल्याकडे आईवडिलांनी मुलामुलींचे विवाह ठरवणं हा जो प्रकार आहे, त्याची तिकडे त्यांना कल्पनासुद्धा करवत नाही. ज्याच्या बरोबर संसार करायचा, तो साथीदार हा केवळ स्वत:च्या पसंतीचा असावा, हे मुलामुलींचं मत मान्य केलं गेलंय आता. एके दिवशी जेनव्हिएव्हशी असंच बोलत बसले असताना ती म्हणाली, ‘‘शंभर टक्के विवाह यशस्वी होतील, अशी कुठलीच पद्धत अस्तित्वात नसेल, तर मुलामुलींनी आपल्या जोडीदाराच्या पसंतीबाबत वडील माणसांचा सल्ला घ्यावा, त्यांचा विचार हा सुवर्णमध्य असू शकेल.’’ कोण जाणे! प्रत्येक गोष्टीतच या सुवर्णमध्याची आज आवश्यकता आहे; पण तो तर नेहमीच दूरदूर पळत असतो.
मी जे दुसरं सत्र केलं, ते मागच्यापेक्षा थोडं तरी जास्त समजू शकले. गटामध्ये वागताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, यासंबंधी अनेक बाजूंनी या सत्रात सुचवलं, सांगितलं गेलं. गटांमध्ये एकमेकांशी संबंध कसे असावेत, गट-प्रमुखाचं सर्वाशी नातं कसं असावं, सर्वाचं प्रमुखाशी नातं कसं असावं, याबद्दल मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायचा आहे, असं कळलं होतं. याही कोर्सला पाच दिवस राहण्या-जेवणासाठी भरमसाट फी होती.
पॅरिसमधून कमरपट्टय़ासारखी सेन नदी संथपणानं वाहते. लहानपणी भूगोलात वाचलेल्या या सेनच्या काठावर पॅरिसच्या प्वॉसी या उपनगरात एका जुन्या सरदारी वाडय़ात या सत्रासाठी पाच दिवस राहायचं होतं. बॅझाँसोला कॉलेजमध्ये भेटलेली मैत्रीण मोनिका सकाळी आठला मला इथं पोचवायला आली होती.
‘‘तुम्ही इंडियन का?’’ एक तरुण मुलगा मला विचारत होता. मी ’हो’ म्हटल्यावर म्हणाला, ‘‘माझं नाव ख्रिस्तीयान. मी सहा महिने भारतात एका प्रवासी कंपनीबरोबर गेलो होतो. दिल्ली, आग्रा वगैरे ठिकाणी हिंडलो. साडी पाहिली, तेव्हाच मला वाटलं, की तुम्ही इंडियन आहात म्हणून.’’ या स्वभावानं शांत, भारदस्त स्वभावाच्या मुलाची न् माझी छानच गट्टी जमली त्या पाच दिवसांत.
सकाळच्या शांत वेळी अंगणातच उभं होतो. सत्रात भाग घेणारे एकेक जण येत होते. आपली आपण ओळख करून देत होते. सत्रात नेमकं काय होणार, याबद्दल तमाम मंडळी संभ्रमात होती. सगळेच जण एकमेकांना विचारत. मी अशाच प्रकारची दोन-तीन सत्रं करूनही काही सांगू शकले नाही.
या अभ्यासक्रमांमध्ये नेहमी मी एकटीच परदेशी नागरिक होते. भारताची माहिती कुणालाच फारशी नव्हती. आपोआप चहाच्या, जेवणाच्या सुट्टीत साडी, कुंकू, मंगळसूत्र, लांब केस आणि इतर रीतिरिवाजांवर चौकस प्रश्न विचारले जात असत. ज्यांना आवडेल त्यांना साडय़ा नेसवून दाखवणं हा तर माझा उद्योगच झाला होता. आपल्याकडील विवाह पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती वगैरेंवर चर्चा होत असत. त्यांना खूप कुतूहल निर्माण झालं आहे. जेथे जेथे भारताबद्दलचं त्यांचं कौतुक मला अवास्तव वाटत असे, तेथे मी त्यांना सावध करायचा प्रयत्न करीत असे. मी सुरुवातीलाच म्हणत असे, ‘‘मंडळी, आमचं फार कौतुक करण्यात अर्थ नाही. जातिभेदांचा अतिरेक करून आम्ही समाजाची प्रगती खिळवून टाकली आहे, एकत्र कुटुंब पद्धतीच्या काही फायद्यांबरोबर व्यक्तिविकासाला पायबंदही बसवून घेतला आहे. हुंडा पद्धत, लाचलुचपत, पालकांचं ऐकणं याचा अर्थ म्हणजे स्वत:च्या मताचं अस्तित्व न दाखवता घडणारी मुलामुलींची लग्नं, एकत्र कुटुंब पद्धतीमधील सासू-सुनांचे तीव्र मतभेद, लग्नात वधूपक्षाला मिळणारा कनिष्ठपणा वगैरे एक का दोन गोष्टी सांगू?’’ तत्त्वं कितीही चांगली असली, तरी समाज ती कशी राबवतो, याला फार महत्त्व आहे. त्यावर त्याचा मानसिक व आर्थिक विकास अवलंबून आहे. माझ्या देशाबद्दल त्यांच्या बऱ्या-वाईट गोष्टी प्रामाणिकपणानं सांगताना चर्चेत एक मोकळेपणा येत असे, वितंडवाद टळत असे.
या चर्चेच्या विषयावरनं आठवलं. सतत चालत असलेल्या या चर्चाच्या कार्यक्रमांमध्ये काही लक्षात राहतील, असे प्रश्न होते. एका तरुण स्त्री-पुरुषांच्या गटामध्ये ते विचारले गेले.
माझ्या देशातल्या अन्नान्न करणाऱ्या लोकांच्या वतीनं मला उत्तर द्यायचं होतं. मला ‘माणूस’तर्फे केलेलं अन्न स्वतंत्रता संचलन आठवलं. टेलिव्हिजनवर मुंबई-कलकत्त्यातील फुटपाथवरची, स्टेशनांवरची दाखवलेली भुकेलेली, खपाटीला गेलेल्या पोटाची, भेसूर चेहऱ्यांची माणसं आठवली. मी त्यांना म्हटलं, ‘‘स्वातंत्र्यानंतर फक्त २०-२२ र्वष झालीत. वसाहतवादानं केलेल्या आमच्या शोषणामुळे आमचं अज्ञान दूर व्हायला जरा जास्त अवधी लागतो आहे खरा, परंतु आमच्या देशाचं हे सतत दाखवलं जाणारं चित्र आम्हाला दु:ख देणारं आहे. परकीय मदत कठोरपणानं थांबवली जावी, असा फार मोठा मतप्रवाह देशात वाहायला लागला आहे. या मदतीनं आम्हाला अगोदरच फार पंगू केलं आहे, स्वाभिमानाला आम्ही पारखे झालो आहोत.
आज ना उद्या भारताचं हे चित्र बदलेल. तुमच्या या सहानुभूतीबद्दल मी आभारी आहे. जग या काळात आता लहान झालं आहे. तुम्हाला अविकसित राष्ट्रांबद्दल काही सक्रिय करायचंच असेल, तर तुम्ही आमच्याकडील नृत्य, संगीत, चित्रकला या क्षेत्रांतील कलावंत बोलावू शकता. त्यांच्या कार्यक्रमांमधून तुम्ही एखादा निधी जमवून दिलात, तर तो आम्हाला ओझं वाटणार नाही. यापुढे देवाणघेवाण व्हावी. नुसतीच देवाण नको, असं मला वाटतं.’’
आणखी एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न ‘‘भारतात गायीला देवता मानलं जातं, मग ती इतकी दुबळी कशी? रस्त्यात कुठेही, केव्हाही कशी दिसू शकते? तिची निगा देवतेसारखी का नाही राखली जात? माणसांना खायला पुरेसं अन्न नसताना परदेशांमधून मदत मागवण्यापेक्षा गायींचा अन्न म्हणून उपयोग का नाही करत?’’
आली का पंचाईत उत्तराची? मला आठवली, ती आपल्या गृहमंत्री नंदांच्या कारकीर्दीतील दिल्लीमधील तमाम साधुवर्गानं केलेली गोहत्येविरोधी निदर्शनं. तेव्हाच माझ्या मनात आलं होतं, की भाडेखर्च, राहाणं-जेवण, दंगलीचा खर्च करण्यापेक्षा त्यांनी काही आदर्श गोशाळा बांधून दाखवल्या असत्या, तर समाजानं, सरकारनं थोडं तरी सहानुभूतीनं त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं असतं.आठवणींमधून बाहेर येत मी म्हटलं, ‘‘भारतानं कालानुरूप अनेक बदल पचवले आहेत. बहुपत्निकत्व ते एकपत्निकत्व, ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’पासून ‘इच्छित संतती भव’पर्यंत, उंबऱ्याच्या आत दबून वावरणाऱ्या स्त्रीपासून सर्व क्षेत्रांत समर्थपणे संचार करणाऱ्या स्त्रीपर्यंत सर्वच क्षेत्रांतील अनेक बदल या समाजानं मान्य केले आहेत. या बदलांची गती मात्र फार मंद आहे, हे कबूल करावं लागेल. पण ही परिवर्तनाच्या वेळची खळबळ, विरोध कोणत्या समाजाला चुकलाय? तेव्हा गायींच्या बाबतीतला दृष्टिकोनही बदलू शकेल.’’ वेळ आली, तर रस्तोरस्ती घासभर खायला मिळेल, या आशेनं हिंडणाऱ्या देवतेकडे पाहून आमच्या विचारसरणीतील विसंगती आपल्या जेव्हा तीव्रतेनं लक्षात येईल, तेव्हा खरं. परदेशांमध्ये टेलिव्हिजन, वर्तमानपत्रं, पुस्तकांच्या द्वारे होणारी आमची ही जाहीर मानहानी आम्हाला शेकडो वर्षांपासून जाणवतच नाही की काय? पारतंत्र्याच्या केवढय़ा मोठय़ा काळाचा शिक्का आपल्यावर पडलेला आहे नाही!
नाताळच्या सुट्टीपूर्वी भारतातून आमच्या फ्रान्स मित्र मंडळातर्फे १४० भारतीय तीन आठवडय़ांसाठी प्रथमच फ्रान्समध्ये आले. त्यांचं वास्तव्य फ्रान्समधील ‘फ्रेण्ड्स ऑफ इंडिया’ या संस्थेतर्फे पार पडलं. ही मंडळी येण्याआधी सहा महिने व ती परतल्यावर सहा महिने मी फ्रान्समध्येच होते. या गटामध्ये संगीत, नृत्य, चित्रकला प्रदर्शन या उपक्रमांची योजना होती. हा कलाकारांचा गट फ्रान्समधल्या आठ शहरांमध्ये जाऊन कला प्रदर्शनाचे कार्यक्रम करणार होता. या कार्यक्रमांमुळे भारताबद्दलचं वातावरण चांगलं तयार झालं होतं. १४० सदस्य आठ शहरांमध्ये विभागून राहिले. एक आठवडा सर्वच गटांचं वास्तव्य पॅरिसमध्ये होतं. दोन आठवडे बेझाँसो, लमाँ, लियों, मेस, ग्रनोब्ल, लाव्हाल, मार्सेय, नॉन्त, लिल या शहरांमधील कुटुंबांमध्ये त्यांची व्यवस्था केली होती. एकूण गटांचं वास्तव्य चांगलं झालं. फ्रेंच मंडळींनी अतिथ्यात कुठलीही कसर ठेवली नाही. सर्व मंडळी सुखरूप भारतात परतली.
विविधांगी समाजजीवन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई पुरंदरे यांना काल ८० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने 'राजहंस प्रकाशनातर्फे' त्यांचे स्नेहयात्रा हे पुस्तक प्रकाशित होत आहे. १९७१ साली वर्षभर फ्रान्समध्ये राहून त्यांनी तेथील अनुभवांवर आधारित सहा लेख १९७२ मध्ये लिहिले होते. त्याच लेखांचे सुधारित …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-01-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of social life