महायुतीत तरी मनसे आणि शिवसेना यांनी एकत्र यावे, अशी भाजपची इच्छा असली तरी २०१४ साठी ती पूर्ण होणार नाही, असेच संकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यांतून मिळणार आहेत. या दौऱ्यांचे यशापयश नंतर ठरेलच, पण दोघेही आपापल्या पद्धतीने राज्यभर फिरतील तेव्हा यांच्या वाटा वेगवेगळय़ा असल्याचे स्पष्टच होईल.
दिल्लीतील बलात्कार, डिझेल-पेट्रोलची वारंवार होणारी दरवाढ, रेल्वेच्या भाडेवाढीसह दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि भ्रष्टाचार यामुळे सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात काँग्रेसविरोधात वातावरण निर्माण होण्यासाठी ही परिस्थिती पुरेशी आहे. तशातच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून सत्ताबदलासाठी आतापासूनच राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण असूनही विरोधी पक्ष फारसे काही करू शकणार नाहीत आणि आपणच पुन्हा सत्तेवर येणार, अशी ठाम खात्री असल्याच्या थाटात काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांशी लढत असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीची ‘दादागिरी’ मधल्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थंड करून टाकली होती. त्यामुळे थोरल्या पवारांनाच थेट काँग्रेसला इशारा द्यावा लागला होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्राचा दौरा आखला आहे. योगायोग म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नेमका फेब्रुवारीमध्येच महाराष्ट्राच्या दौऱ्याचा मुहूर्त निवडला आहे. हा योगायोग निश्चितच नाही, तर सेना-मनसे हे यापुढेही वेगळीच वाट चालणार असल्याचे स्पष्ट करणारे हे दौरे आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर लगोलग उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी संवाद साधला होता. त्याच वेळी त्यांनी जानेवारीमध्ये आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. राज्यात काँग्रेसविरोधातील असंतोषाच्या पाश्र्वभूमीवर वातावरण तापविण्याचे काम करणे हे विरोधी पक्षांचे कामच आहे. उद्धव यांचा दौरा हा एकीकडे सरकारविरोधात वातावरण तापविण्याबरोबरच पक्षबांधणी भक्कम करण्यासाठीचा असणार आहे. सेनेच्या तटबंदीला कोठे भगदाड पडणार नाही ना, याची काळजी बदलत्या परिस्थितीत त्यांना घेणे आवश्यक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच वीस-पंचवीस जागांच्या फरकाने राज्यातील सत्ता गेली होती. आता वातावरण अनुकूल असल्याची भावना सेना-भाजपच्या नेत्यांना वाटते. यासाठी विरोधी पक्षाचा आवाज बुलंद होणे आवश्यक आहे. शिवसेनाप्रमुखांची कमतरता सेना-भाजपला निश्चितच जाणवेल यात शंका नाही. बाळासाहेब आणि गर्दी हे समीकरण कायम होते. दुर्दैवाने गर्दी जमूनही मते का मिळत नाही, हा प्रश्न बाळासाहेबांना कायम सतवायचा. त्यांनीही अनेकदा भाषणातून हा मुद्दा उपस्थित केला होता. आता युतीची महायुती झाली असून रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हेही युतीत सामील झाल्यामुळे त्याचा फायदा होईल, अशी अटकळ सेना-भाजपचे नेते बांधत आहे. हमखास सत्ता येण्यासाठी महायुतीत मनसेने सामील व्हावे, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मनसेमुळे युतीच्या किती जागा गेल्या याची आकडेमोडच पक्षाच्या अधिवेशनात करून दाखवली होती. भाजपच्या अन्य नेत्यांच्या मतेही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेशी युती करणे फायद्याचे ठरेल असेच आहे. अर्थात याला रामदास आठवले यांनी स्पष्ट विरोध केला आहे, तर सेनेच्या नेत्यांनी अजूनपर्यंत तरी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला वेगळेच महत्त्व निर्माण झाले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जमलेली गर्दी, शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेले सर्वाधिकार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते सेनेशी साधत असलेली जवळीक या साऱ्या पाश्र्वभूमीवर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. या लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
या लढाईत मनसे महायुतीसह जाणार का, राज व उद्धव एकत्र येणार का, असे अनेक प्रश्न गेल्या दीड महिन्यात राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात होते; तथापि शिवसेनाप्रमुखांच्या हयातीमध्ये जे शक्य झाले नाही ते आता शक्य होईल असे दिसत नाही. सेनेतून बाहेर पडून स्वत:चा पक्ष काढल्यानंतर ‘अशा अनेक सेना आल्या आणि गेल्या, राज यांचा पक्ष हा नव्याचे नऊ दिवस ठरेल,’ असे उद्गार शिवसेनाप्रमुखांनीच काढले होते. प्रत्यक्षात त्यांच्या हयातीतच राज यांनी मनसेचा विस्तार केला. डझनभर आमदार आणि दीडशे नगरसेवक निवडून आणले. ज्या शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा जन्म झाला व ज्या दादरमध्ये शिवसेना भवन आहे तेथेच सातही नगरसेवक निवडून आणण्याचा पराक्रम राज ठाकरे यांनी घडवून दाखवला. दादरमध्ये मनसेचा आमदार व सातही नगरसेवक निवडून आल्याची खंत दसरा मेळाव्यातील चित्रफीत भाषणात बाळासाहेबांनी व्यक्त केली होती. याच भाषणात बाळासाहेबांनी उद्धव व आदित्यला सांभाळून घ्या, असे आवाहनही शिवसैनिकांना केले होते. व्यंगचित्रकार असल्यामुळे राजकारणातील नेमक्या खाचाखोचा बाळासाहेबांना कळायच्या. त्यांचे हे शेवटचे भाषण लक्षात घेता राज व उद्धव एकत्र येतील, असे त्यांनाही वाटत नसावे असेच दिसते. बाळासाहेबांचा शेवटपर्यंत धाक होता व शिवसैनिकांसाठी ते कायमच दैवत होते. मात्र तरीही त्यांच्या हयातीत अनेकदा बंड झाले. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. राज ठाकरे यांचे बंड हे सर्वात मोठे ठरले. राणे, भुजबळ व नाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आसरा घेतला त्यांनी स्वत:चा पक्ष काढला नाही. राज यांनी ते धाडस केले, एवढेच नव्हे तर अल्पावधीत ते यशस्वीही झाले. आता विरोधी पक्षांसाठी कधी नव्हे एवढे अनुकूल वातावरण आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील भांडणे, महागाई, भ्रष्टाचार यांनी लोक त्रस्त आहेत. अशा वेळी समर्थ पर्याय निर्माण करण्याचे आव्हान विरोधी पक्षांपुढे आहे. यासाठी भाजपने गोपीनाथ मुंडे यांना पुन्हा निवडणुकीसाठी नेतृत्वाची वस्त्रे देण्याचा निर्णय घेतला आहे, तर शिवसेना नेतृत्व एक आश्चर्यकारक चाल खेळण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीच्या ‘भुजांमधील बळ’च काढून घेतले, तर वंजारा, ओबीसी, माळी आणि दलित अशा महायुतीच्या माध्यमातून सत्तेचा सोपान सहज चढता येईल अशी ‘उद्धवनीती’ असल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. अर्थात उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय प्रवास सोपा नाही. बंडखोरीचे वारे पक्षात वाहत आहे. सेनेतील ‘उपरे’ कधी डोके वर काढतील ते सांगता येत नाही. याच दृष्टिकोनातून उद्धव यांचा दौरा महत्त्वाचा मानावा लागेल.
उद्धव यांना पक्षाची घडी नीट बसविण्याचे जसे मोठे आव्हान आहे तशीच काहीशी परिस्थिती मनसेची आहे. मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचे बंड बोलके आहे. पक्ष नवीन असल्यामुळे बेडकी असलेल्या मंडळींना आपण बैल झाल्याचा साक्षात्कार होत आहे. पक्षासाठी ही मोठीच डोकेदुखी आहे. अजूनही काही नाराज मंडळी गडबड करण्याची शक्यता आहे. काही आमदार ‘आस्ते कदम’ राम राम.. करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मनसेतच जोरात होताना दिसते. पक्षातील बेदलीची दखल घेत संपर्क अध्यक्षांच्या माध्यमातून जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम राज ठाकरे यांनी केले. मुंबईप्रमाणेच मनसेसाठी ठाण्याचे महत्त्व मोठे असतानाही शहराच्या अध्यक्षाला राष्ट्रवादीतून आयात करावा लागला यातच ठाण्यातील परिस्थिती स्पष्ट होते.
 सेना व मनसेसाठी लोकसभा व विधानसभेसाठी ठाणे जिल्ह्य़ाचे महत्त्व मोठे राहाणार आहे. ठाणे जिल्ह्यात २४ आमदार असून तेथे पक्षबांधणीवर शिवसेनेने विशेष जोर दिला असला तरी मराठवाडा आणि विदर्भातील नाराजांची समजूत काढण्याचे आव्हान उद्धव यांना पेलावे लागणार आहे.
शिवसेनेत बाळासाहेबांमुळे निर्माण झालेली पोकळी कोणीच भरून काढू शकणार नाही, हे उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य बरेच काही सांगून जाते. अशा वेळी राज्यव्यापी दौऱ्यात नाराजांनाही चुचकारण्याचे काम उद्धव यांना करावे लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा हा पुन्हा एक नवे वादळ निर्माण करणारा ठरण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते एकाच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी पक्ष असलेल्या सेना-भाजपवर राजकीय नेम साधतील असे दिसते. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर अंकुश ठेवण्यात विरोधी पक्षाला आलेल्या अपयशावरून ते तोफा डागतील आणि विरोधी पक्षातच गोंधळ निर्माण करतील, असे मानण्यास जागा आहे. भाजपला देशात सत्ता आणायची आहे व त्यासाठी राज ठाकरे हे महायुतीत यावेत, अशी भाजपची धारणा आहे; तथापि फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडय़ात राज व उद्धव यांनी आखलेल्या महाराष्ट्र दौऱ्यावरून दोघांचीही वाट वेगळीच राहणार आहे हे स्पष्ट दिसत आहे.

Story img Loader