आरोपमुक्त होईपर्यंत मंत्रिमंडळात परतणार नाही या आपल्या वक्तव्यावर अजितदादा ठाम राहिले असते तर त्यांची प्रतिमा अधिकच उंचावली असती. पण ते परतले आणि त्यांच्यावरील शिक्का सध्या तरी कायम राहिला..
कोणीही राजीनाम्याची मागणी केली नसतानाही केवळ आरोप झाले म्हणून अजित पवार यांनी राजीनामा दिला आणि जे धक्कातंत्र राजीनाम्यासाठी अवलंबिले तसेच मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत झाले.  हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून परतले. त्यांना मंत्रिमंडळात परतण्याची घाई का झाली याबाबत वेगवेगळे मतप्रवाह ऐकू येऊ लागले. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात एकापेक्षा अधिक जनहित याचिका न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत. उद्या न्यायालयाने कदाचित चौकशीचा आदेश दिलाच तर मंत्रिपदाचे सुरक्षित कवच असावे म्हणून अजितदादांच्या मंत्रिमंडळ परतीची घाई करण्यात आल्याचे बोलले जाते. मंत्रिमंडळात परतले तरी अधिवेशन संपेपर्यंत बिनखात्याचे मंत्री. तूर्त बिनखात्याचे मंत्री का आहेत हे काका (शरद पवार) आणि पुतणेच जाणोत. मात्र यातून वेगवेगळ्या शंकाकुशंकांना ऊत आला. अजितदादांचा राजीनाम्याचा निर्णय मोठय़ा साहेबांना आवडला नव्हता हे जसे बोलले जाते, तसेच मंत्रिमंडळात परतण्याची घाईही काकांना पसंत नव्हती, अशी चर्चा ऐकू येते. एक मात्र झाले व ते म्हणजे राजीनामा आणि मंत्रिमंडळात परतण्याची केलेली घाई यातून अजितदादांच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला! राजीनामा दिल्यावर नगर जिल्ह्यातील पहिल्याच सभेत राजीनामा फेकून दिला, सत्तेची हाव नाही वगैरे टाळ्या मिळवणारी वक्तव्ये अजितदादांनी केली होती. पुढे ७२ दिवसांमध्ये काय घडले कोण जाणे, पण अजितदादा परत आले. राष्ट्रवादीकडेच असलेल्या जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत अजितदादांवर झालेल्या आरोपांबद्दल अवाक्षरही काढण्यात आलेले नाही. अर्थात, खात्याकडून स्वत:च्या विभागाच्या कामाची माहिती देणाऱ्या श्वेतपत्रिकेतून काही वेगळे बाहेर येईल ही अपेक्षाच नाही. तरीही अजितदादांना ‘क्लीनचिट’ मिळाली, अशी आवई राष्ट्रवादीतील अजितदादांच्या बगलबच्च्यांनी उठविली आणि त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. चौकशी निष्पक्षपणे व्हावी म्हणून राजीनामा देत असल्याचे अजितदादांनी राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा जाहीर केले होते. आता ७२ दिवसांमध्ये कोणती चौकशी झाली, हा प्रश्न काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीतील बुजुर्गाना सध्या पडला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये राजकीय नेतृत्वाबद्दल निर्माण झालेली तिडीक या पाश्र्वभूमीवर कोणत्याही घोटाळ्याचा शिक्का पाठीशी चिकटणे हे राजकीय नेत्यांसाठी तापदायकच.  घोटाळ्याचा शिक्का बसलेल्याने राष्ट्रीय पातळीवर वा राज्यात राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याची किंवा कायम शिक्का बसल्याची उदाहरणे आहेत. त्यातून स्वत:ची ताकद किंवा जनाधार असेल तरच नेता टिकू शकला. १९९०च्या दशकात झालेल्या विविध आरोपांमुळे अजितदादांचे काका शरद पवार यांना फटका बसला. अर्थात, राज्याच्या राजकारणावर असलेली पकड किंवा जनतेचे पाठबळ यामुळे पवार यांनी साऱ्यावर मात केली. कोर्टाने निर्दोष ठरविले तरीही बॅ. ए. आर. अंतुले यांची राजकीय कारकीर्दच संपली. चारा घोटाळ्यामुळे बदनाम झालेल्या लालूप्रसाद यादव यांना बिहारी जनतेने झिडकारले. बिहारमध्ये गेलेली पत परत मिळविण्यासाठी लालूंना गेली दहा वर्षे झगडावे लागत आहे. अलीकडेच कर्नाटकातील येडियुरप्पांनाही स्वत:च्या अस्तित्वासाठी वेगळी चूल मांडावी लागली. कोणत्याही घोटाळ्याचा आरोप झाल्यावर राजकीय पक्ष सहसा त्या नेत्याला दूरच ठेवतो. अशोक चव्हाण आणि येडियुरप्पा ही दोन उदाहरणे त्यासाठी देता येतील. सिंचन खात्यातील घोटाळ्याची ओरड सुरू होताच अजितदादांनी राजीनामा दिला. आरोपमुक्त होईपर्यंत मंत्रिमंडळात परतणार नाही या आपल्या वक्तव्यावर अजितदादा ठाम राहिले असते तर त्यांची प्रतिमा अधिकच उंचावली असती. पण आपल्याच पक्षाकडे असलेल्या खात्याने सादर केलेल्या आकडेवारीचा आधार घेत अजितदादा परतले आणि त्यांच्यावरील शिक्का सध्या तरी कायम राहिला.
अजितदादांची प्रतिमा ‘अँग्री यंग मॅन’सारखी. दिलेला शब्द पाळणारा नेता. काम होणार असेल तरच हो म्हणायचे अन्यथा नाही सांगून टाकायचे हा त्यांचा सरळ स्वभाव. अजितदादा कोणाची भीडभाड ठेवत नाहीत. काकांच्या तालमीत तयार झाल्याने तसे बाळकडूच त्यांना मिळालेले. खात्यावर प्रभाव, पक्षाची सारी सूत्रे जवळ असल्याने कोणताही निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी करण्याची मोकळीक. तशी धमक अनेकांकडे असते वा सध्याच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडेही आहे. पण नेतृत्वाकडून कधी मोडता घातला जाईल याची शाश्वती नसते. अजितदादांबाबत तसे नव्हते. त्यातूनच अजितदादांची महत्त्वाकांक्षा बळावत गेली. मुख्यमंत्रीपद हे एकच त्यांच्यासमोर लक्ष्य. एकत्रित काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांनी अनेक भल्याभल्यांना कात्रजचा घाट दाखविला, पण तो असा काही दाखविला की आपण कसे संपलो हे त्या नेत्यांनाही कळले नाही. अजितदादांनी आपल्या स्वभावामुळे हितशत्रू तयार केले. संधी येताच हेच हितशत्रू कामाला लागले. राजकारणात महत्त्वाकांक्षा ठेवूनच काम करावे लागते. पण अति महत्त्वाकांक्षा त्रासदायक ठरते, असे राजकारण्यांबाबत नेहमीच बोलले जाते. अजितदादांची रुखरुख तशी २००४च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालापासूनच सुरू झाली. सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला मिळूनही नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडला हेच मुळी अजितदादांच्या मर्मी लागले. पन्नाशीत आल्यावर नेतृत्वाचा आशीर्वाद घ्यायचा असतो, निर्णय आपणच घ्यायचे असतात हे अजितदादांनी केलेले वक्तव्य फारच मार्मिक आहे. २००९च्या निकालानंतर पक्षाने उपमुख्यमंत्रीपद सोपविले नाही हे अजितदादांच्या डोक्यात गेले होतेच. पुढील वर्षी संधी मिळताच अजितदादांनी हे पद मिळविलेच. उपमुख्यमंत्रीपद मिळताच त्यांनी राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण केले. पक्ष वाढविण्यावर त्यांनी भर दिला. कोठे ‘काही’ कमी पडणार नाही याची खबरदारी घेतली. अन्य पक्षांमधील ताकदवान पण नाराज असलेल्या नेत्यांना गळाला लावले. या साऱ्यांचे फळ गेल्या वर्षी आणि या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळाले. जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. शहरी भागांतही राष्ट्रवादीची ताकद वाढली. आता मुख्यमंत्री हे एकमेव ध्येय ठेवून अजितदादा कामाला  लागले. तेच त्यांना त्रासदायक ठरले. काँग्रेसने नियोजनबद्ध रीतीने अजितदादांच्या मागे फटाके लावण्याचे काम केले. सुमारे ७० हजार कोटी खर्चूनही सिंचनाच्या क्षेत्रात फक्त ०.०१ टक्के वाढ झाली हे चित्र बरोबर नाही, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुमारे दहा वर्षे सिंचन खाते सांभाळणाऱ्या अजितदादांबद्दल संशयाचे वातावरण तयार केले.
उपमुख्यमंत्री म्हणून लावलेला कामाचा धडाका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मिळालेला विजय यामुळे अजितदादांची वेगळी प्रतिमा तयार झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तुलनेत त्यांची कामाची धडाडी जनतेला आवडू लागली. अजितदादा राज्य पुढे घेऊन जातील अशी भावना व्यक्त होऊ लागली. शहरी तसेच मध्यमवर्गीयांमध्ये अजितदादांबद्दल आकर्षण वाढले. त्यांच्याबद्दल एक वेगळे वलय (ग्लॅमर) तयार झाले. राजकीय नेत्यांवर आरोप होणे हे काही नवीन नाही. नुसते आरोप होताच त्यांनी राजीनाम्याचे शस्त्र उगारले. हा धुरळा खाली बसण्यापूर्वीच ते परतल्याने सत्तेविना अजितदादांना करमत नाही हाच संदेश गेला. परिणामी, त्यांच्याबद्दल निर्माण झालेले आकर्षण आणि वलय वर्षभरातच हरपले. अजितदादा हार पत्करण्यांमधले नाहीत. पण स्वत:ची प्रतिमा उंचावून पुन्हा जुने वलय परत प्राप्त करणे हे त्यांच्यासाठी नक्कीच सोपे नाही.

Story img Loader