विकासाची कोणतीही संकल्पना प्रगतीकडेच गेली पाहिजे, या अपेक्षेचा अर्थ असा की, कोणत्याही विकासाला विनाश अभिप्रेत नाही. गेल्या चार-पाच दशकांत मुंबईचा वेग झपाटय़ाने वाढू लागल्यावर या महानगरीला जणू विकासाचे वेड लागले आणि पुढे तर महानगराच्या विकासाला वेगाची जणू नशा चढली. कमालीच्या वेगाने विकासाचा एक एक टप्पा ओलांडत या महानगरीने आपले बाहू अस्ताव्यस्त पसरले. एवढे की, कधी काळी भौगोलिकदृष्टय़ा दूरच्या अंतरावर असलेल्या शहरांच्या सीमा हाकेच्या अंतरावर येऊन थांबल्या. विकासाच्या या वेडय़ा वेगापायी आपण काय गमावत आहोत, याचा नेमका विचार मात्र या धामधुमीत फारसा कधी झालाच नाही. सेकंद काटय़ालाही मागे टाकण्याच्या ईष्र्येत वेगाने धावण्याची सवयच जणू महानगरीला लागून गेली आणि त्या सवयीमध्ये माणुसकी नावाची अंगभूत सवय कधी गायब झाली तेदेखील लक्षात आले नाही. प्रत्येक जण आपल्या पावलापुरता पुढचा रस्ता मोकळा करून घेण्याच्या घाईत पुढे सरकू लागला. या मोकळ्या जागेवर दुसऱ्याचे पाऊल पडू नये यासाठी धडपडू लागला आणि या धडपडीचे नकळत स्पर्धेत रूपांतर झाले. मुंबईतून पुणे आणि गोवा महामार्गाला पोहोचण्याचा वेळ कमी व्हावा यासाठी शीव-पनवेल रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, ही विकासाची एक संकल्पना गेली अनेक वर्षे मुंबईकराच्या मनात घर करून राहिलेली होती. अखेर ती प्रत्यक्षात उतरली आणि धावण्याच्या सवयीची कोंडी फुटली. वेडय़ा वेगाने वेळाला मागे टाकण्याची स्पर्धा या रस्त्यावरही तीव्र झाली. शीव-पनवेल रस्ता म्हणजे संकटांना निमंत्रण आहे, अशी ओरड गेले अनेक महिने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांकडून सुरू होती. या रस्त्यामुळे मुंबईबाहेर जाण्याचा आणि मुंबईत परतण्याचा वेग वाढला, पण अखेर वेगाच्या या नशेत माणुसकी मात्र हरवत चालली. नव्याने धावू लागलेल्या या रस्त्यावर जागोजागी संकटे दबा धरून बसली आहेत. अनेकांना त्याचा अनुभवही आला आहे. अशी एखादी भीषण घटना घडली की मग संकटांचा शोध घेऊन ती कायमची हटविण्याची गरज अधोरेखित होऊ लागते. या मार्गावर खारघरच्या उड्डाणपुलावर एका महिलेचा रस्त्यावर निपचित पडलेला मृतदेह लक्षात येण्याआधीच अनेक वाहने त्या छिन्नविच्छिन्न देहावरूनच वेगाने पुढे गेली. या घटनेकडे पाहताना, दोन अंगांनी विचार करणे गरजेचे आहे. त्या देहावरून वेगाने पुढे जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाने माणुसकीला काळिमा फासला होता, असे वाटणे साहजिक आहे. मात्र, ज्या रस्त्याला केवळ वेगाने वाहने चालविण्याचे बंधनच आहे, अशा रस्त्यावर वेगवान वाहनांच्या रांगा पुढे सरकत असताना अचानक एखादे वाहन थांबविले गेले तर कोणता अनवस्था प्रसंग ओढवेल हा विचारदेखील एका मृतदेहाच्या अभावित विटंबनेइतकाच असह्य़ ठरू शकतो. वेगाने वाहणारी सारी वाहने क्षणात थांबविण्याच्या प्रयत्नात होणारी संभाव्य दुर्घटना त्या क्षणी समोर दिसणाऱ्या प्रत्यक्ष दुर्घटनेहूनही भयानक ठरू शकली असती. त्यामुळे, दुसऱ्या बाजूने विचार केला, तर माणुसकी चिरडली असे म्हणण्याऐवजी, नाइलाजाने माणुसकी गुंडाळून ठेवणे भाग पडले, असे म्हणावे लागते. हे मान्य केले, तर ही परिस्थिती का ओढवली असावी त्याच्या मुळाशी जावे लागेल आणि अशा संभाव्य दुर्घटना विचारात घेऊन विकासाची आखणी करण्याची गरज अधोरेखित होईल. वेगाचे वेड म्हणजे विकास नाही, तर वेगाच्या वेडातून भासणारा विकास हा केवळ विनाशाचेच कारण ठरू शकतो, याची जाणीव ठेवूनच विकासाच्या योजना आखल्या पाहिजेत, ही बाब या दुर्दैवी घटनेमुळे अधिक स्पष्ट झाली. माणुसकी जिवंत ठेवायची असेल, तर विकासाच्या नकाशावरील एक कोपरा माणुसकीच्या विचारासाठी मोकळा ठेवावा लागेल.

Story img Loader