आपण स्वबळावर मंगळापर्यंतची मोहीम आखू शकतो हे जगाला दाखवणे हेच आपले माफक उद्दिष्ट मंगळयान मोहिमेमागे आहे. त्यामुळे आता आपण चीनशी स्पर्धा करू शकू असे म्हणणे हास्यास्पद आहे. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा पुतळा बांधल्याने आपण जसे त्यांच्यापुढे जात नाही तसेच मंगळापर्यंत जाण्याची क्षमता आल्याने थोर ठरत नाही..
रस्ते नीट नाहीत, एकतृतीयांश जनतेस अन्न नाही आणि त्याहूनही अधिकांना आरोग्याच्या सुविधाही नाहीत अशा अवस्थेत तब्बल ६८ कोटी किलोमीटर अंतरावरील मंगळावर यान पाठवण्याचा खर्च करण्यात काय हशील, अशा स्वरूपाचे प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ताज्या मंगळयान मोहिमेसंदर्भात उपस्थित केले जाणे साहजिक आहे. वस्तुत: या शंकासुरांना हे सांगावयास हवे की गुजरातेत देशाच्या माजी पोलादपुरुषाचा पोलादी पुतळा उभारण्यासाठी आजी पोलादी पुरुष जो खर्च करणार आहेत त्याचा फक्त एकचतुर्थाश खर्च आपल्या मंगळयान मोहिमेस येणार आहे. मुंबईत शाहरूख आदी खानांचे वा रणबीर आदी कपुरांचे दोन-पाच सिनेमे बनवण्यासाठी जेवढी रक्कम लागते त्याच्याही पेक्षा कमी रकमेत आपले यान मंगळापर्यंत पोहोचणार आहे. इतक्या काटकसरीत आखण्यात आलेली भारतीय अवकाश संस्थेची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी मंगळमोहीम मंगळवारच्या मुहूर्तावर सुरू झाली. त्या आधी इस्रोचे प्रमुख के राधाकृष्णन यांनी या मंगळयानास अमंगळाची बाधा होऊ नये म्हणून तिरुपती येथील बालाजीच्या मंदिरात पाद्यपूजा करून सुवर्णजडित बालाजीचे आशीर्वाद घेतले. या पूजेसाठी ते किती रुपयांच्या रांगेत उभे होते हे कळावयास मार्ग नाही. आपल्याकडे परमेश्वराचे व्यवस्थापक भक्ताच्या सामाजिक आणि राजकीय उंचीवरून त्यांच्या रांगेची लांबी ठरवितात. त्यामुळे राधाकृष्णन यांची ही उंची लक्षात घेऊन त्यांना थेट गाभाऱ्यात विनाविलंब प्रवेश मिळाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बालाजीचे आशीर्वाद कमी पडले तर मदतीला असावेत म्हणून राधाकृष्णन यांच्याशी संबंधितांनी मंगळाचा संबंध असल्याने प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या वा दक्षिणेतील मुरुगनाच्या आशीर्वादाची तजवीजही केलीच असणार. इस्रोचा अलीकडील वादग्रस्त इतिहास लक्षात घेता दिल्लीश्वराच्या आशीर्वादांची बेगमीही राधाकृष्णन यांनी केली असणार यात शंका नाही. बालाजी आदींच्या प्रार्थनेच्या बरोबरीने मंगळयानास अवकाशात घेऊन जाणाऱ्या क्षेपणास्त्राची शांत करण्यासही ही शास्त्रज्ञ मंडळी विसरली नसतीलच. तेव्हा इतक्या साऱ्या प्रार्थनासत्रांनंतर आपले मंगळयान मंगळवारी मंगळाच्या दिशेने झेपावले. या घटनेमुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर वगैरे भरून आलेला असल्याने या मोहिमेच्या औचित्याचा मुद्दा उपस्थित करणे अनेकांना आवडणार नाही. १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी सरकारने पोखरण येथे दुसऱ्या अणुचाचण्या केल्यावर जवळपास सर्व भारतीयांना महासत्ता झाल्याचा भास होऊन हर्षवायू होणेच तेवढे बाकी राहिले होते. मंगळयानाच्या मंगल यशाने तसेच काही होणार असल्याचे आणि आपण चीनशी बरोबरी करणार असल्याचे अनेकांना वाटू लागले आहे. परंतु या संदर्भात जागतिक परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यातून आपल्या मंगळयान मोहिमेचा आढावा घेणे गरजेचे ठरते.
तसा तो घेतल्यास सर्वात नजरेत भरणारी आपली बाब म्हणजे या मोहिमेचा खर्च. अमेरिकेस मंगळावर यान पाठवण्यासाठी जितका खर्च येतो त्याच्या एकदशांश रकमेत आपले यान मंगळावर जाणार आहे. आपली मंगळयान मोहीम फक्त साडेसात कोटी डॉलर्समध्ये होणार आहे तर अमेरिकेच्या पुढील महिन्यातील याच मोहिमेसाठी ६७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आखण्यात आला आहे. आपली मोहीम ही इतक्या कमी खर्चात होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे अभियंत्यांचे वेतन. अमेरिकेत अवकाशशास्त्रज्ञाच्या वेतनावर वर्षांला एक लाख पाच हजार डॉलर मोजावे लागतात तर भारतीय अवकाश अभियंता बिचारा २० हजार डॉलर्सच्या वेतनात वर्षभर घाम गाळतो. परंतु हे कारण वरवरचे. भारतीय मोहीम स्वस्तात होण्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण हे की या मोहिमेतून आपणास काहीच मिळवायचे नाही. म्हणजे आपण आपल्या हिमतीवर मंगळापर्यंतची मोहीम आखू शकतो हे जगाला दाखवणे हेच आपले माफक उद्दिष्ट या मोहिमेमागे आहे. मंडईत नुसते फिरून यावे आणि खरेदीची यादी रिकामी असावी तसेच आपले धोरण या मोहिमेबाबत आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या समजास पुष्टी मिळेल अशी बाब म्हणजे प्रत्यक्ष मंगळावरील संशोधनाच्या कामासाठी नेण्यात आलेली उपकरणे. या संशोधन उपकरणांचे वजन फक्त२५ किलो इतके आहे. याचाच अर्थ आपण प्रत्यक्ष मंगळावरील संशोधनासाठी म्हणून फार काही संशोधन साधने या मोहिमेतून पाठवलेली नाहीत. म्हणजेच अत्यंत माफक अपेक्षा ठेवूनच ही मंगळ मोहीम आपण हाती घेतलेली आहे. असे करण्यामागे कदाचित आतापर्यंतच्या मंगळ मोहिमांचा इतिहास असावा. तो पाहिल्यास ठसठशीतपणे समोर येणारी बाब ही की जगात एकाही देशास आपल्या पहिल्याच मंगळ मोहिमेत आतापर्यंत एकदाही यश आलेले नाही. अमेरिका, चीन, रशिया असो वा जपान. या सर्व देशांच्या पहिल्या मंगळ मोहिमा फसल्या. २०११ साली चीन-रशिया मोहिमेस मंगळाने दूरवर ठेवले तर २००३ साली जपानला. त्यामुळे आपल्याबाबतही याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्यास फार नुकसान नको, असा विचार यामागे असण्याची शक्यता आहे. दुसरे असे की या मोहिमेत आपले मंगळयान आणि मंगळ यांतील कमीत कमी अंतर असेल ते ३६० किमी आणि जास्तीत जास्त अंतर असणार आहे ते ८० हजार किमी. याचा अर्थ आपले यान मंगळाच्या सर्वात जवळ असेल तेव्हाही ते ३६० किमी इतक्या अंतरावर असेल. मंगळावर जीवसृष्टी आहे किंवा काय याचा जो काही आपला अभ्यास होणार आहे तो या अंतरावरून. हे म्हणजे रत्नागिरीतील परिस्थितीचे अध्ययन मुंबईतून करण्यासारखेच. (मुंबई ते रत्नागिरी हे अंतर ३४३ किमी इतके आहे.) यात अयोग्य असे काही नाही. परंतु मुद्दा इतकाच की आतापर्यंतच्या सर्व मंगळ मोहिमांनी नेमका हाच अभ्यास केला आहे. तेव्हा या संदर्भात आपण काही नवीन करीत आहोत असे नाही.
नेमकी हीच बाब आपल्या अनेक अवकाश संशोधकांनी मंगळवारच्या मंगळ मोहिमेसंदर्भात व्यक्त केली आहे. आपले मंगळयान अधिक वा नवीन असे काही करू शकेल अशी योजना आखावयास हवी होती, असे मत अनेकांनी नमूद केले ते याच उद्देशाने. काही जणांनी राष्ट्राभिमानाचा मुद्दा या संदर्भात उपस्थित केला असून आपण या मोहिमेमुळे चीनशी स्पर्धा करू शकू, असे मत व्यक्त केले आहे. ते केवळ हास्यास्पद म्हणावयास हवे. आपण अर्थव्यवस्थेबाबत चीनपेक्षा ११ वर्षे मागे आहोत आणि आपल्या साऱ्या अर्थव्यवस्थेच्या आकाराइतकी चीनची केवळ परकीय चलनाची गंगाजळी आहे, हे ध्यानात घ्यावयास हवे. भारतीय अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा गाठत असताना चीन नऊ ट्रिलियन डॉलर्सचा आकार ओलांडून पुढे गेला आहे. तेव्हा मंगळयान आणि चीन-भारत स्पर्धा यांचा काहीही संबंध नाही. अर्थात मंगळयानाच्या यशापयशाची चर्चा व्हायला हवी ती १ डिसेंबरनंतर. त्या दिवशी पृथ्वीच्या कचाटय़ातून हे यान सुटणे अपेक्षित असून त्यानंतर ते मंगळाच्या नजीक जाण्यास सुरुवात होईल. पुढील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ते मंगळाच्या अगदी जवळ जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत इस्रोच्या या मंगळाच्या प्रेमगीतात सहभागी होण्यास हरकत नाही.
परंतु ध्यानात ठेवायचे हे की अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा पुतळा बांधल्याने आपण जसे अमेरिकेच्या पुढे जात नाही तसेच मंगळापर्यंत जाण्याची क्षमता आल्याने थोर ठरत नाही. लहान-मोठेपणातील हा अमंगळ भेदाभेद ही खरी आपली समस्या आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा